Breaking News

कणखर, सक्षम नेतृत्व नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार -आमदार महेश बालदी

खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाचाही विश्वास

उरण ः प्रतिनिधी
देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेले कार्य कणखर आणि सक्षम असेच आहे. त्यामुळे मोदीजीच पुन्हा पंतप्रधान होणार तसेच मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे पुन्हा खासदार होतील, असा विश्वास उरणचे आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केला आहे. ते उरणकरांसोबत विकासाचा जनसंवाद या कार्यक्रमात बोलत होते.
मावळ लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 13 मे रोजी मतदान होत आहे. या निमित्ताने शुक्रवारी (10) सायंकाळी उरण येथील नगरपालिकेच्या तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक शाळेच्या मैदानावर आमदार महेश बालदी यांनी उरणकरांसोबत विकासाचा जनसंवाद साधला. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तेव्हापासून मोदी सरकारने व महाराष्ट्र सरकारने विकासाचा धडाका या तालुक्यात लावला. हे मी जबाबदारी सांगतो की, अख्या महाराष्ट्रात कुठे विकास झाला नाही एवढा विकास या ठिकाणी झाला.
या कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष भोईर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पिंगळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष रवि भोईर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष परिक्षित ठाकूर, मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार महेश बालदी म्हणाले की, आठ वर्षांपूर्वी आपण उरणहून पनवेलला जायचो, तेव्हा जीव मुठीत असायचा हे सर्वांनी अनुभवलंय. रेल्वेचे काम आम्ही हाती घेतले. पाठपुरावा केला. फॉरेस्टची सर्व प्रकरणे सोडवली आणि रेल्वे सुरू केली. मला अभिमान आणि गर्व वाटतो की, साडेबावीस हजार ते पंचवीस हजार प्रवासी आज उरण ते नवी मुंबई असा रेल्वेचा प्रवास करीत आहेत. उरणहून सरळ सीएसएमटीपर्यंत रेल्वे सुरू करायला पाहिजे हेही आपले स्वप्न लवकरच पूर्ण होईल. जात, धर्म, पंथ भाषा हे कधी बोलतात, जेव्हा त्यांच्याकडची विकासाची हत्यारे संपतात, परंतु आपल्याकडे विकासावर बोलण्यासारखे भरपूर आहे.
उरण नगरपालिकेसाठी 100 कोटी आणले. यांनी दहा कोटी तरी आणायचे होते. यांचे मुख्यमंत्री होते, सत्तेत आमदार होते, पण काही आणायचे नाही आणि काही करायचे नाही, फक्त टीका टोमणे मारायचे हीच यांची नीती व पद्धत राहिली आहे. विरोधक भाषणात विकासाचा एक शब्द बोलत नाहीत. फक्त भाजप कसा वाईट आहे अशा टीका, टोमण्यांणी भाजपवर प्रहार करीत राहतात. आपल्याला एक समृद्ध, संपन्न भारत बनवायचा आहे. आताच चौकला आदिवासी पट्ट्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना ऐकण्यासाठी सुमारे 12 हजार लोक उपस्थित होत. एअरपोर्टला मोदीजी आले तेव्हा दीड लाख लोक होते. ही आमची ताकद आहे. जिथे आम्हाला आमची ताकद दाखवायची आहे, तिथे आम्ही दाखवतो.
नरेंद्र मोदींनी आपल्याला काय दिले आणि त्यांना आपण काय देणार आहोत या अनुषंगाने उरणकरांसाठी हा विकासाचा जनसंवाद आहे. अबकी बार चारसो पार आणि या चारसोमध्ये खासदार श्रीरंग बारणे असायला हवेत. यासाठी खासदार बारणे यांना निवडून देण्याची जबाबदारी आपली आहे, असेही आमदार महेश बालदी यांनी सांगितले.
दरम्यान, लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, उरणकरांच्या स्वप्नातील रुग्णालय, उरण बायपास रस्ता, पीरवाडी समुद्र किनार्‍याचे सुशोभीकरण, चारफाटा येथील मच्छी मार्केटची उभारणी, केगाव-दांडा रस्ता, त्याचबरोबर उरण नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या विकासकामांमध्ये पालिकेची नवीन शासकीय इमारत, शहरातील रस्त्याचे काँक्रीटीकरण, फुल मार्केट, समाजमंदिर, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स थेटर आदी विकासकामे सुरू असल्याचा उल्लेख आपल्या भाषणातून केला. या वेळी महायुतीच्या पदाधिकार्‍यांनीही विचार मांडून खासदार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

Check Also

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी …

Leave a Reply