अलिबाग : प्रतिनिधी
ई चलन पध्दतीमुळे दंड थकविण्याचे प्रमाण वाढले आहे. रायगड जिल्ह्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांकडून दंडाचे 7 कोटी 45 लाख रुपये थकीत आहेत. ते वसूल करण्याचे आव्हान रायगड पोलीस दलाच्या वाहतूक विभागासमोर आहे. ही सर्व थकीत दंडाची प्रकरणे न्यायालयात नेण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.
रायगड जिल्ह्यात 2022 या वर्षात 1 लाख 48 हजार 594 जणांना वाहतुक नियम मोडल्या प्रकरणी चलन जारी करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 9 कोटी 57 लाख 29 हजार रुपयांचा दंड वसूल होणे अपेक्षित होते. यापैकी 2 कोटी 11 लाख 48 हजार 200 रुपयांचा दंड प्रत्यक्ष जमा झाला आहे. 7 कोटी 45 लाख 81 हजार 750 रुपयांची दंड वसूली शिल्लक आहे.वाहतूक पोलिसांच्या कारवाईत पारदर्शकता यावी, तसेच नियम मोडणार्यांकडून तातडीने दंड वसूल न करता ई चलन पध्दतीने व्हावी. दंड थेट बँक खात्यात जमा व्हावा यासारख्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. मात्र या सुधारणाच आता वाहतूक पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरू लागल्या आहेत. ई चलन पध्दतीमुळे दंड थकविण्याचे प्रमाण वाढले आहे.ई चलन पध्दतीमुळे वाहतूक नियम मोडणार्यांमध्ये बेपर्वाई वाढली असून दंड भरला नाही तरी काही होत नसल्याची मानसिकता तयार होत असल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे ही सर्व प्रकरणे न्यायालयात नेण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.चलन मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आत दंडाची रक्कम भरणे आवश्यक असते. मात्र ती भरली जात नसल्याने पुढील कारवाईसाठी ही प्रकरणे न्यायालयात दाखल केली जात आहेत. त्याचबरोबर लोकन्यायालयातही या प्रकरणांचा निपटारा करण्याच्यादृष्टीने पोलिसांनी तयारी सुरु केली आहे.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …