पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व डॅशिंग युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या शनिवारी (दि. 18) कामोठे येथे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी पनवेल 2024’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने आयोजित करण्यात आले आहेत. सेक्टर 11मधील नालंदा बुद्धविहाराच्या बाजूला असलेल्या मैदानावर सायंकाळी 4 वाजता हे जंगी सामने होणार आहेत.
या वेळी विशेष आकर्षण म्हणून नेपाळमधील पैलवान देवा थापा आणि हिमाचल प्रदेशमधील पैलवान नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार आहे. तसेच महिला आणि पुरुष या प्रकारात आणि विविध गटांत सामने होणार असून विजेत्यांना एकूण पाच लाख रुपयांच्या रोख रकमेचे पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
कुस्ती हा खेळ आपल्या भारतात प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. प्राचीन काळी जत्रा, मेळावे यांचे आयोजन असताना गावोगावी कुस्त्या भरवल्या जात असत. मैदानी आणि मर्दानी असलेल्या या मातीतल्या खेळाला जागतिक स्तरावरही मान-सन्मान आहे आणि आपली कुस्ती ऑलिम्पिकमध्येही खेळली जात आहे. त्यामुळे कुस्तीचे आकर्षण मोठ्या प्रमाणात असून कुस्ती सामने भव्य होण्यासाठी कामोठ्यातील मैदान आकर्षकपणे सजत आहे.