Breaking News

नया दिन नयी रात @ 50

संजीवकुमारची नऊ रूपे केवढी तरी कौतुकाची

माणसाच्या आयुष्यातील नवरस आपणासही माहीत आहेत. आश्चर्य अथवा अद्भूत, भयानक, करुणा, क्रोध, रौद्र, बिभत्स, शृंगार, वीरता आणि आनंद वा हास्य. त्या त्या प्रसंगानुरूप ते भाव व्यक्त होत असतात. आणि याच सर्व भाव भावनाना एकाद्या कथा व पटकथेत गुंफले तर? चित्रपट कशावरही असू शकतो.
ही मूळ कल्पना दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटातील. तेथे 1966 साली नवरात्री या नावाने तेलगू व तमिळ अशा दोन भाषेतील चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्यावरूनच हिंदीत दिग्दर्शक ए. भीमसिंग यांनी नया दिन नयी रात (मुंबईत प्रदर्शित 10 मे 1974) पडद्यावर आणला त्याला पन्नास वर्ष पूर्ण झालीदेखील… एव्हाना रसिकांची एक पिढी फ्लॅशबॅकमध्ये रमलीही असेल. चित्रपट व क्रिकेट अनेक भारतीयांना हमखास जुन्या आठवणीत नेतेच.
त्या काळात नवीन चित्रपटाचे पोस्टर ही त्याची पहिली ओळख असे. ते पाहून चित्रपट रसिकांचे विचारचक्र सुरू होई, या चित्रपटात काय बरे पहायला मिळेल, याची गोष्ट काय असेल? सामाजिक असेल की सस्पेन्स? की आणखी एखादी. ’नया दिन नयी रात’च्या पोस्टरवरील संजीवकुमारची एक दोन नव्हे; तर चक्क नऊ रूपे (विविध मुखवटे) पाहून माझ्यासारख्या अनेक चित्रपट रसिकांच्या मनात प्रश्न आला, एखाद्या हीरोच्या डबल रोलच्या चित्रपटांची पोस्टर पाहिली (चाणक्य दिग्दर्शित राम और श्याम’मधील दिलीपकुमार, मनमोहन देसाई दिग्दर्शित सच्चा झूठा वगैरे), अगदी नायकाच्या तिहेरी भूमिकेचे पोस्टर पाहिले (असित सेन दिग्दर्शित ‘बैराग’मधील दिलीपकुमार), पण नऊ रूपातील संजीवकुमार आणि जोडीला जया भादुरी. काय असेल बरं या चित्रपटात?
रस्त्यावरची पोस्टर्स, होर्डींग्स, रेडिओ विविध भारतीवर या चित्रपटाचा रेडिओ कार्यक्रम यातून चित्रपट जवळ येत होता आणि आता ’नऊ भूमिकेत संजीवकुमार’ हे चित्र स्पष्ट झाल्याने मुद्रित माध्यमातील बातम्यात वगैरे हा चित्रपट चर्चेत आणि म्हणूनच तर विशेष कुतूहल. विजय आनंद दिग्दर्शित जॉनी मेरा नाम (1970) आय.एस. जोहरची धमाल तिहेरी भूमिका. रामन्ना दिग्दर्शित ’हमजोली’ (1970)मधील मेहमूदने पृथ्वीराज कपूर, राज कपूर व रणधीर कपूर या तीन पिढ्यांची धमाल नक्कल करीत रसिकांचे केलेले मनोरंजन. ही वेगळीच तिहेरी भूमिका असे काही संदर्भ समोर येत गेले, पण चक्क नऊ भूमिका?
मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर शालिमारला थिएटर डेकोरेशनवर ही नऊ रूपे लक्ष वेधून घेणारी होती. (त्या काळात असे थिएटर डेकोरेशन पाहत पाहत एक प्रकारचे थिएटर पर्यटन हादेखील आनंदाचा भाग असे. अशाच लहान लहान गोष्टीतील आनंदाने आपल्या देशात अगदी खालच्या माणसांपर्यंत चित्रपट नेला आणि रूजवला. त्यांची आठवण हवीच.)
‘नया दिन…’ची मूळ गोष्ट ए.पी. नागराजन यांची, त्यावर ए. भीमसिंग यांनी पटकथेत माणसाच्या आयुष्यातील नवरस मांडलेत. नायिका सुषमा (जया बच्चन) हिच्या आयुष्यातील एकेका अडथळ्यात विविध रूपात तिला एकेक जण मदत करतो. त्या विविध व्यक्तीरेखा म्हणजेच संजीवकुमारची नऊ रूपे. त्यात वेडा डॉक्टर, रंगभूमीवरील कलाकार, कुष्ठरोगी, आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेणारा डाकू अशी ती विविध रुपे आहेत. यांची नावे आनंद, स्वामी रहस्यानंद, सारंग, सेठ धनराज, शेरसिंग फुलकुमार वगैरे. संजीवकुमार कायमच अष्टपैलू व मेहनती कलाकार म्हणून ओळखला गेला. त्याला हा चित्रपट म्हणजे आपल्यातील गुणवत्ता दाखवायची खूपच मोठी संधीच मिळाली. खरंतर सुरुवातीस दिलीपकुमारला हा चित्रपट ऑफर झाला होता. दिलीपकुमारने एस.एच. रवैल दिग्दर्शित संघर्ष (1967)मध्ये संजीवकुमारसोबत भूमिका साकारताना त्याच्या गुणवत्तेचा अनुभव घेतला होता आणि त्याच कामाची जणू शाबासकी म्हणून दिलीपकुमारने ’नया दिन नयी रात’साठी संजीवकुमारचे नाव सुचवले आणि या चित्रपटाच्या सुरुवातीस आपल्या नेहमीच्या शैलीत निवेदनही दिले. (यश चोप्रा दिग्दर्शित त्रिशूल, नासिर हुसेन दिग्दर्शित जबरदस्त हेही चित्रपट सुरुवातीस दिलीपकुमारलाच ऑफर झाले होते. त्याच्या नकारानंतर संजीवकुमारला त्या व्यक्तीरेखा साकारायला मिळाल्या. एकाची भूमिका दुसर्‍याला, कधी तिसर्‍यालाच हे होतच असते. ती एक वेगळी रंगत.) ’नया दिन नयी रात’ दिलीपकुमारने साकारला असता तर नायिका कोण? बहुतेक सायरा बानूच असती. नायिकेच्या अडचणीच्या प्रवासात विविध ठिकाणी नायक नवीन रूपात मदत करतो हे या थीममध्ये ही जोडी फिट्ट बसली असती.
संजीवकुमार व जया भादुरी (ती नंतर बच्चन झाली हो) यांनी भिन्न नात्यांतील व्यक्तीरेखा साकारलीय. गुलजार दिग्दर्शित ’परिचय’मध्ये वृद्ध पिता व त्यांची मुलगी, गुलजार दिग्दर्शित ’कोशिश’मध्ये पती व पत्नी, रघुनाथ झालानी दिग्दर्शित ’अनामिका’मध्ये प्रियकर व प्रेयसी (तरी तिची चार रूपे), रमेश सिप्पी दिग्दर्शित ’शोले’मध्ये वृद्ध सासरे व सून, ईस्माईल मेमन दिग्दर्शित ’नौकर’मध्ये नायक व नायिका, यश चोप्रा दिग्दर्शित ‘सिलसिला’मध्ये संजीवकुमार डॉक्टर असून रेखाला त्याच्याशी लग्न करावे लागते. याचं कारण पतीचे (शशी कपूर) विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला (जया बच्चन) आपल्या दीरासोबत (अमिताभ बच्चन) लग्न करावे लागते त्यातून हा दीर व त्याची प्रेयसी (रेखा) दुखावतात आणि दुरावतात. संजीवकुमार व जया बच्चन यांचा एकत्र काम करण्याचा रूपेरी पडद्यावरील प्रवास असा विविध नातेसंबंधाचा. ’नया दिन नयी रात’मध्ये अखेरीस ते विवाहबद्ध होतात तेव्हा संजीवकुमारची सहा रूपे या लग्नात हजर असतात. या चित्रपटात फरिदा जलाल, सुंदर, ललिता पवार, टूनटून, मनोरमा, श्यामा, डेव्हिड, नाझनीन व ओम प्रकाश यांच्याही भूमिका. चित्रपटाचे छायाचित्रणकार जी. विठ्ठल राव, तर आनंद बक्षी यांच्या गीतांना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत.
नऊ या आकड्यास खूप महत्त्व आहे. नवरात्रीत देवीची नऊ रूपे, तर आईच्या पोटात मुलं मोठे होण्यास नऊ महिने लागतात आणि त्यात ’नया दिन नयी रात’ची ही बहुचर्चित नऊ रूपे. या कॉमेडीच्या अंगाने खुललेल्या ’नया दिन नयी रात’ला सर्वसाधारण स्वरूपाचे यश लाभले. त्यापेक्षा जास्त रंजक चर्चा संजीवकुमारच्या नऊ भिन्न मुखवटा आणि व्यक्तीरेखांची झाली… तेच तर महत्त्वाचे असते. संजीवकुमार कधी नायक, तर कधी सहनायक रंगवत रंगवत वाटचाल करीत होता. महेश भट्ट दिग्दर्शित ’विश्वासघात’मधील पिता व पुत्र या दुहेरी भूमिकेतील टेलिफोनवरील संभाषणाचे दृश्य त्याच्या अभिनय वाटचालीतील सर्वात बहुचर्चित व सर्वोत्कृष्टही. संजीवकुमार स्टार नव्हे तर अ‍ॅक्टर. वयाची पर्वा न करता अनेक प्रकारच्या व्यक्तीरेखा साकारल्यात… मॅटीनी शो, मग व्हिडीओ, त्यानंतर मनोरंजन उपग्रह वाहिनी, आता यू ट्यूबवर ’नया दिन नयी रात’चा प्रवास सुरू आहेच, पण एकदा एन्जॉय करू शकता.
एकाच चित्रपटात एक नायक नऊ भूमिकेत असे मोहन सैगल दिग्दर्शित ’वो मै नहीं (1974)मध्येही होता (आचार्य अत्रे लिखित तो मी नव्हेच या बहुचर्चित नाटकाचे हे माध्यमांतर… अर्थात न जमलेले) यात नवीन निश्चल अशीच नऊ रूपे घेतो, पण त्यात रंगत नव्हती. तेथे संजीवकुमारच हवा. उगाच नाही हो ’नया दिन नयी रात’मधील संजीवकुमारची आजही उगाच चर्चा करीत नाहीत… पन्नास वर्ष पूर्ण होऊनदेखील संजीवकुमारची नऊ रूपे कौतुकास प्राप्त होताहेत हे उल्लेखनीय.

-दिलीप ठाकूर – चित्रपट समीक्षक

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply