Breaking News

चौकमधील दोन चिमुरड्यांचा धावरी नदीत बुडून मृत्यू

चौक, खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
मोरबे धरणाची उपनदी असलेल्या धावरी नदीत दोन चिमुरड्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून संपूर्ण जांभिवली गावात दुःखाची सावट पसरली आहे.
जांभिवली गावातील संजय गावडे यांची चार वर्षांची मुलगी आराध्या आणि विजय गावडे यांचा चार वर्षाचा मुलगा आरोह ह्या दोन सख्ख्या चुलत भावा बहिणीचा धावरी नदीत बुडून मृत्यू झाला. दोन्ही भावंड सकाळी घरापासून जवळच असलेल्या नदीवर आई व काकीबरोबर नेहमीप्रमाणे कपडे धुण्यास गेले होते. आई व काकी कपडे धूत असताना या दोघांनी पाण्यात अंघोळ केली, कपडे धुवून झाल्यावर आई काकीसोबत घरी आले. काही वेळांनी ते घरी किंवा शेजारी, अथवा कुठे खेळत नसल्याचे दिसल्यावर शोध सुरू झाला. दोन्ही मुल न आढळून आल्याने गावात शोध घेतला, परंतु तपास लागला नाही. त्यावेळी ते पुन्हा नदीवर गेले का? ही शंका संजय यांची पत्नी यांना आल्यावर त्या पुन्हा नदीवर आल्या. तेव्हा त्यांना आराध्याची चप्पल तरंगताना दिसली. लागलीच आरवचा शोध पाण्यात घेतला असता, तो पाण्यात चिखलात अडकल्याचे निदर्शनास आले. आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ मदतीला आले. पाण्यात शोध घेतला असता दोघे आढळून आले. दोघांनाही चौक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. ही दुर्दैवी घटना समजताच परिसरातील नातेवाईक, मित्र परिवार, ग्रामस्थ यांच्यात हळहळ व्यक्त होत होती, दोघेही निरागस बालकांचा मृत्यू झाल्याने घरातील वातावरण शोकात बुडाले आहे.
ही नदी अतीशय घातकी असून खोल आहे, नदीच्या दोन्ही बाजूला उतार असून सर्व भाग खडकाळ आहे. घटनेचा तपास चौकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सुर्यवंशी वरीष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply