Breaking News

कर्नाळा बँकेचे संचालक तांबोळी, दाखवे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

पनवेल ः प्रतिनिधी
कर्नाळा नागरी सहकारी बँकेत केलेल्या 512.50 कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी भालचंद्र रामभाऊ तांबोळी, डॉ. अरिफ युसुफ दाखवे यांना अटक करण्यात आली. त्यांना पनवेलचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांनी 20 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
एका बाजूला ईडीची कारवाई सुरू असून त्यात कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना सुमारे तीन वर्षांपूर्वीच अटक केली गेली आहे. त्याचप्रमाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक शाखेकडूनही या आर्थिक घोटाळ्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त मिना जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कर्नाळा बँकेचे संचालक तांबोळी आणि डॉ. दाखवे यांना बुधवारी एसीपी मिना जगताप यांनी अटक केली. यापूर्वी त्यांनी बँकेच्या सीईओ अपर्णा वडके व दुसरे सीईओ हेमंत सुताने यांना अटक केली होती, तर विवेक पाटील यांचे चिरंजीव व बँकेचे संचालक अभिजीत विवेकानंद पाटील यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज पनवेलचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांनी तसेच उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळात घबराट निर्माण झाली. आपल्याला केव्हाही अटक होऊ शकते या भीतीने संचालक सुभाष मधुकर देशपांडे व रवींद्र श्रावण चोरघे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तोही फेटाळण्यात आला. कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात 76 जणांची नावे आहेत. हे आरोपी पोलिसांना सतत गुंगारा देत आहेत. आरोपी क्रमांक 3 भालचंद्र तांबोळी व क्रमांक 6 डॉ. अरिफ दाखवे लोकसभा निवडणुकीच्या काळात पनवेल परिसरात आल्याची माहिती मिळाली. तेव्हा एसीपी मिना जगताप आणि त्यांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांचा ठावठिकाणा शोधून त्यांना अटक केली. गुरुवारी (दि. 16) त्यांना पनवेलचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांचे समोर हजर केले असता सरकारी वकील यशवंत भोपी यांनी या आरोपींनी संचालक म्हणून कर्ज प्रकरणावर सह्या केलेल्या आहेत तसेच एका आरोपीने बँकेकडून कर्ज घेतले होते. ते एनपीए झाले आहे. याची चौकशी करणे अत्यावश्यक आहे, असे न्यायालयाला सांगितले. आरोपी राहत असलेले घर हे विवेकानंद पाटील यांच्या नावे आहे. त्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी वकिलांनी केली. आरोपीच्या वकिलांनी मात्र विरोध केला, परंतु न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी दिली आहे.

विवेक पाटील यांचा तुरूंगवास कायमच
‘कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी ईडीने अटक केलेले विवेकानंद पाटील यांना उच्च न्यायालयात जामीन मिळेल आणि विधानसभा निवडणुकीत ते सहभाग घेतील’, असा प्रचार शेकापचे काही नेते करीत आहेत, मात्र 20 जून रोजी ईडीच्या केसमध्ये जरी त्यांना जामीन मिळाला तरी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळाल्याशिवाय ते कोठडीबाहेर येऊ शकत नाहीत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply