खोपोली : प्रतिनिधी
माझ्या बाबतीत कोणी काही बोलतात त्यांच्याशी मला काहीही घेणेदेणे नाही. मी भाजपमध्ये एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पक्षप्रवेश केला. भाजपत देव, देश आणि धर्म यांचा विचार केला जातो आणि तो मी स्वीकारलेला आहे. भाजप माझ्यासाठी विचार आहे, अशा शब्दांत कर्जत-खालापूरचे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी त्यांच्या शिवसेना ठाकरे गटात परतण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. ते सोमवारी (दि. 16) चौक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजप नेते देवेंद्र साटम पुढे म्हणाले की, शिवसेनेत मी अनेक वर्षे काम केले आहे, पण जे विचार स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षात रूजविले ते विचार आजच्या शिवसेना ठाकरे गटात मला दिसत नाहीत. माझ्या मागे काही बोलले जाते याचा मी कधीच विचार करीत नाही. आज माझ्याबाबत असे बोलले जाते की मी शिवसेनेत प्रवेश करणार आहे. मी ज्या शिवसैनिकांना घडविले आहे त्यांना वाटत असेल की आता त्यांना सक्षम नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या मते मी शिवसेनेचे नेतृत्व करावे. त्यांना तसे वाटणे स्वाभाविक आहे, मात्र मी ज्या शिवसेनेला कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात यशाचे शिखर दाखविले तो पक्ष माझ्या पडत्या काळात कुठे होता? मला राजकारणातील कोणतेही पद उपभोगण्याची आशा शिल्लक नसल्याने मी आता असलेल्या भाजपमध्येच कायम राहणार असून कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे ठामपणे सांगत साटम यांनी त्यांच्याबद्दल वावड्या उठविणार्यांची बोलतीच बंद केली आहे.
मकारसंक्रांतीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा खालापूर तालुक्यातील नढाळ येथील पंचायतन मंदिरात झाला. या वेळी बोलताना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांनी, येत्या 23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुखांची जयंती असल्याने या दिवशी माजी आमदार देवेंद्र साटम शिवसेनेत दाखल होणार आहेत, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे चर्चा सुरू झाली होती. या चर्चेला स्वतः देवेंद्र साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.
या वेळी साटम यांनी आपला पूर्वाश्रमाचा इतिहास पत्रकारांसमोर मांडला. स्व. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेचे विचार बदलले आणि हेच बदललेले विचार मला न पटल्याने मी भाजपमध्ये आलो आहे. मला लोकांनी खूप प्रेम दिले आहे. चौक ग्रामपंचायतीचे 16 वर्षे सरपंच दिले. पुढे कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचा मी आमदार झालो. शिवसेनाप्रमुखांनी मला या मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी पाच वेळा संधी दिली, मात्र आपल्याच शिवसेना पक्षातील हितशत्रुंमुळे माझा या पाच वेळच्या संधीत दोनदा पराभव झाला. असे असले तरी मी जनताजनार्दनाची सेवा हीच खरी ईश्वरसेवा समजून आजही काम करीत आहे, असे त्यांनी नमूद केले.
पत्रकार परिषदेस देवेंद्र साटम यांच्यासमवेत भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, ज्येष्ठ नेते अॅड. राजेंद्र येरूणकर, खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे आदी उपस्थित होते. चौकट
वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
कर्जत-खालापूरचे माजी आमदार देवेंद्र साटम यांच्यावर आजही या मतदारसंघातील लोकांचे, कार्यकर्त्यांचे अपार प्रेम असल्याचे चित्र सोमवारी त्यांच्या वाढदिवशी दिसून आले. त्यांना भाजपसह शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्व पक्षांतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Check Also
The member group is always indeed there to aid when needed
Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …
RamPrahar – The Panvel Daily Paper