मुरूड : प्रतिनिधी
येथील समुद्रकिनारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तेल वाहून आले असून या तेल तवंगामुळे समुद्रकिनारा विद्रुप झाला आहे.
मुरूड शहराला अडीच किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून या संपूर्ण किनार्यावर तेलाचे गोळे दिसत आहेत. ज्या ठिकाणी दगडी संरक्षक भिंत आहे, फक्त तिथे तेल दिसून येत आहे. खोल समुद्रातून वाहून आलेले तेल वाळूत मिसळल्यामुळे त्याचे गोळे तयार झाले आहेत. हे गोळे संपूर्ण समुद्र किनारी पसरले आहेत. स्थानिक मच्छीमारांसह नागरिक व पर्यटकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तेल तवंगामुळे चपल व बूट खराब होत असल्याने नागरिक व पर्यटक समुद्रात जाण्यास उत्सुक नाहीत. ते लांबूनच समुद्रकिनारा पहाताना दिसत आहेत.
खोल समुद्रात काही कंपन्यांच्या तेल विहिरी आहेत. या विहिरीतून गळती झाल्यास तेलाचे तवंग समुद्रकिनारी येत असतात. मुरूड समुद्रकिनारी चार ते सहा महिन्याच्या अंतराने तेल तवंग येतात. त्याची तातडीने चौकशी करण्यात यावी तसेच संबंधीत तेल कंपन्यांकडून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी मच्छीमार बांधवांकडून होत आहे.
रायगड जिल्ह्यातील काही समुद्रकिनारी दर तीन महिन्यांनी तेल तवंग येतो. त्याचा शोध घेऊन तो रोखण्याचा शासनाच्या मत्स्यविभाग, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड व अन्य यंत्रणांनी प्रयत्न करावा. अन्यथा हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला जनआंदोलन करावे लागेल. -अॅड. चेतन पाटील, अध्यक्ष, भाजप फिशर मॅन सेल