पनवेल : वार्ताहर
कॉर्पोरेट कंपनी व हॉटेलमध्ये कार भाडेतत्वावर लावण्यासाठी घेवुन ती वाहने परराज्यात परस्पर विक्री करून वाहन मालकांची फसवणुक करणार्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखा ने पर्दाफाश केला असून, दोन कोटी दोन लाख रुपये किंमतीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. या टोळीतील मुख्य आरोपी अटक केल्याने मोठ्या प्रमाणात अजून वाहने पोलीस हस्तगत करतील असा विश्वास नवी मुंबईचे आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी व्यक्त केला आहे.
नेरूळ, नवी मुंबई येथे म ट्रॅव्हल्स पॉईट कंपनीच्या नावाने ऑफिस सुरू करून तेथे भाडे करार करून भाडेतत्वावर मुळ कागदपत्रासह वाहने घेवुन ती परस्पर विक्री करून वाहन दोन तिन महिन्यामध्ये ऑफिस बंद करून फिर्यादी व साक्षीदार यांची फसवणूक केल्याबाबतच्या तक्रारीवरून नेरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानुसार गुन्ह्याचा तपास सुरू केला असता गुन्ह्यातील आरोपी हे अतिशय सराईत असल्याने ते त्यांचा ठावठिकाणा व मोबाइल क्रमांक वारंवार बदलुन अस्तीत्व लपवुन राहत असल्याने त्यांचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान होते.
आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी सत्यप्रकाश वर्मा उर्फ बाबू हा भोईसर परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने तेथे जावुन आरोपी राहण्याचे ठिकाणाचा शोध घेवुन त्याचे घराची पाहणी केली तेथे त्याची पत्नी राहत होती तो घरी येताच त्यास ताब्यात घेण्यासाठी तो राहत असलेल्या इमारती मध्येच एक रूम भाडयाने घेवुन तेथे पोलीस पथक थांबवुन ठेवले होते.
दिवसरात्र पाळत ठेवली असतांना सातव्या दिवशी तो त्याचे घराजवळ येताच त्यास शिताफीने ताब्यात घेतले व त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची माहिती दिल्याने व त्याचा गुन्ह्यांतील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये त्याचे साथीदार आशिष पुजारी व अॅन्थोनी पॉल हे बेंगलोर येथे असल्याची माहिती दिल्याने तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक गज्जल व पथक बेंगलोर येथे जावुन ताब्यात घेतले व त्यास अटक करण्यात आली आहे.