माथेरान ः रामप्रहर वृत्त
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अर्थात एनएचएआयने 10 हजार 560 कोटी रुपये माथेरान ट्वीन ट्यूब बोगद्यासह आठ लेनच्या मुंबई- वडोदरा एक्स्प्रेस वेची कामे प्रस्तावित केली आहेत. पुढील आठवड्यापासून या मार्गाचे काम सुरू होणार आहे. या एक्स्प्रेस वेमुळे जवाहरलाल नेहरु पोर्ट अथॉरिटी आणि वडोदरा विरारमार्गे प्रवासाचा वेळ तीन तासांनी कमी होण्यास मदत होईल. जेएनपीए आणि वडोदरा या 440 किमी मार्गावरील प्रवासाचा वेळ 7.30 तासांवरून 4.30 तासांवर, तर जेएनपीए आणि विरार यांच्यातील 100 किमीचे लांबचे अंतर सध्याच्या तीन तासांवरून एका तासावर येईल. अंबरनाथ, बदलापूरच्या रहिवाशांसाठीही हा मार्ग फायद्याचा ठरणार आहे. येथील प्रवासी नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीए येथून पुढे मुंबई व्हाया ट्रान्स हार्बर लिंक असा जलद प्रवास करू शकतील. हा मार्ग विरार- अलिबाग कॉरिडॉरचा भाग म्हणून रायगडमधील मुंबई पुणे ई-वे आणि पनवेल तालुक्यातील अलिबागशी जोडला जाईल. तो जून 2025पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती आहे.
- अशी आहेत वैशिष्ट्ये
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील भोज गाव आणि रायगड पनवेलमधील मोरबे गावादरम्यान चार किमी लांबीचा हा बोगदा असेल. या बोगद्याची उंची 5.5 मीटर आणि रुंदी 21.45 मीटर इतकी आहे. प्रत्येक बोगद्याला चार लेन असतील. ट्वीन ट्यूब त्यांच्या प्रत्येक सेंटर लाइनपासून 64 मीटर अंतरावर ठेवल्या जातील. टनलला अंतर्गत ड्रेनेज, व्हेंटिलेशन आणि लाईट्स असतील. या मार्गामुळे वसई, ठाणे, कल्याण-शिळफाटा आणि नवी मुंबईतील ट्रॅफिकची समस्या कमी होण्यासही मदत होईल.