कर्जतकरांनी घेतले कपालेश्वराचे दर्शन; तालुक्यातही महाशिवरात्री साजरी
कर्जत : प्रतिनिधी
महाशिवरात्री असल्याने कर्जत तालुक्यातील महादेवाच्या प्रत्येक मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तालुक्यातील प्रत्येक मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. बहुतांश मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी कपालेश्वराची पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री नऊ वाजेपर्यंत कर्जतकरांनी पालखीतील कपालेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले.
कर्जत शहरातील श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासुनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त मंदीरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात ह. भ. प. दिलीप बुवा राणे यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. महाशिवरात्री निमित्त पहाटे पुणे येथील महादेव तुपे बंधू यांचे सनईवादन, श्री कपालेश्वराची महापुजा करण्यात आली. लघुरुध्द अभिषेक त्यानंतर सामुहिक शिवलिलामृत पारायण झाले. पहाटेपासून श्री कपालेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सायंकाळी श्री कपालेश्वराची पालखी मिरवणुक ढोल ताशा पथकाच्या गजरात काढण्यात आली. दीपकबुवा करोडे आणि सहकार्यांचे भजन झाले. आरतीने मिरवणुकीची सांगता करण्यात आली. सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी करण्यात आली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुद्रेश्वर मंदिरातही दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. तेथे किशोर कदम व कविता कदम या उभयतांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. रात्री महाप्रसाद देण्यात आला.
कर्जत तालुक्यातील पांडवकालीन वैजनाथ येथील मंदिरात शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. वैजनाथ येथील मंदिरात शिवभक्तांसाठी यात्रा तेथे भरली होती. दिवसभर कर्जत तालुक्याबरोबर अन्य तालुक्यातील भाविक यांची दर्शनासाठी वर्दळ सुरु होती. कोल्हारे येथे त्रिवेणी संगमावर असलेल्या पांडवकालीन शिवमंदिरामध्ये शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी सकाळी प्रचंड गर्दी झाली होती. याशिवाय कर्जत तालुक्यातील सर्वच शिवमंदिरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली.
तालुक्यातील विविध कार्यक्रमांना भक्तांची गर्दी
कोषाणे, साळोख, तमनाथ, माथेरान, मानिवली, बिरदोले, शेलू, धामोते येथील धनेश्वरी, नेरळमधील कुसुमेश्वर मंदिर, निर्माण नगरी येथील शिवमंदिर, मोहाचीवाड़ी, भड़वळ, कळंब,पोही, खांडस, देवपाड़ा, वंजारपाडा, गुढवण, कशेळे, वारे, कोठींबे, आंबिवली, मांडवणे, लाखरन, चांदई, कडाव, बीड, देऊळवाड़ी,आदी ठिकाणी असलेल्या शिव मंदिरात सर्वत्र भक्तांची गर्दी होती.माथेरान येथील पिसरनाथ महाराज तसेच कर्जत शहरातील धापया आणि कपालेश्वर येथील मंदिरात शिवरात्रीनिमित्त असंख्य धार्मिक कार्यक्रम यांची रेलचेल सुरु होती.
Check Also
मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …