पनवेल : वार्ताहर
पनवेल शहरी, ग्रामीण तसेच पनवेलच्या आजुबाजूच्या परिसरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या चोरांना कोणतेही भय राहिलेले नसल्याचे घडत असलेल्या घटनांवरून दिसत आहे. त्यामुळे या चोरीच्या घटनांना रोखण्यासाठी पोलिसांपुढे आव्हान आहे. फसवणूक, लबाडी, आमिष, घरफोड्या, हातचलाखी, हल्ला, अशा विविध प्रकारे ह्या चोर्या पनवेल परिसरात घडताना दिसत आहे. अशाच काही चोरीच्या घटना गेल्या दोन दिवसांत घडल्या आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकर्या गेल्या जलदरित्या पैसे कमविण्यासाठी काही बेरोजगार वर्ग चोर्यामार्या करू लागला आहे. परिणामी परिसरात चोरीच्या घटनांत वाढ होत आहे. पनवेलमध्ये गेल्या दोन दिवसांत चोरीच्या अनेक घटना घडल्या आहे. यामध्ये शहरातील दत्त इन हॉटेलच्या समोरील रस्त्यावर उभी करून ठेवलेली रिक्षा अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. राजा सुभाष विरगामिया (वय 26, रा. लक्ष्मी वसाहत झोपडपट्टी) याने त्याची 70 हजार रुपये किंमतीची रिक्षा (एमएच-46-एझेड-4636) दत्त इन हॉटेलच्या समोरील उभी करून ठेवली होती. या वेळी अज्ञात चोरट्याने ही रिक्षा चोरून नेल्याने याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दुसर्या घटनेत भाजी विकत घेत असताना मोटरसायकलवरून आलेल्या व्यक्तीने एका ग्राहकाच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचल्याचा प्रकार कामोठे येथे घडला. या प्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्मेंद्र कुमार गौरीशंकर वर्मा हे कामोठे, सेक्टर 36 मधून भाजी घेत होते. या वेळी मोटरसायकलवरून आलेल्या इसमाने धर्मेंद्र कुमार यांच्या गळ्यावर जोरात हात मारला व त्यांची सोन्याची चेन लांबवली. तिसर्या घटनेत एसटी बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने कापून पळवली असल्याची घटना पनवेल एस.टी.स्टॅण्ड परिसरात घडली आहे. शारदा नरहारी पाटील (वय 53, रा. कांदिवली) या त्यांच्या पती सोबत पनवेल बस एस.टी.डेपो येथे कांदिवली मुंबई येथे जाण्याकरिता बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत दोन ते तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या हातातील 50 हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी तीक्ष्ण हत्याराने कापून पळवली. याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सराईत गुन्हेगार अटकेत; खांदेश्वर पोलिसांची कारवाई
पनवेल : पनवेल परिसरासह धुळे या ठिकाणी गुन्हे करणार्या दोन सराईत गुन्हेगारास खांदेश्वर पोलिसांनी गजाआड केले असून, त्यांच्या अटकेमुळे नवीन पनवेल परिसरातील महत्वाचा गुन्हा उघडकीस आला आहे. कांताराम देवराम बाखे (वय 53, रा. नीलसागर सोसायटी, सेक्टर 23, उलवे) हे तेजोमय सोसायटीसमोर सेक्टर नं. 07, नवीन पनवेल, येथे नातेवाईकांकडे आले होते. तेथे रस्त्याचे कडेला उपस्थित दोन व्यक्तींनी ते बीएमसीचे कर्मचारी असुन रस्त्यावर का थुंकले? अशी विचारणा करून त्यासाठी 5000/- रुपये दंडाच्या रक्कमेची मागणी केली. परंतु कांताराम देवराम बारवे यांचेकडे रोख रक्कम नसल्याने कांताराम देवराम बारवे यांच्याकडुन त्यांचे एस बँकेचे एटीएम कार्ड व पिन नंबर घेवून एटीएम सेंटर येथे नेऊन 10,000 रुपये काढुन घेतले. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी दोन अनोळखी व्यक्तींविरुध्द खांदेश्वर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आजुबाजुचे तसेच एसबीआय बँकेचे एटीएम सेंटरमधील सीसीटिव्ही फुटेज प्राप्त केले. त्या आधारे व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी निलेश भटु दिघे (वय 36, धंदा – बेकार, रा. गोरेगाव, मुंबई) व एडवीन अरुण साळवे (वय 37, धंदा – बेकार रा. माटुंगा, मुंबई) यांना दिंडोशी येथुन अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांनी सदर गुन्हयात वापरलेला एक मोबाइल व एक सुझुकी कंपनीची स्कुटी (एमएच 47/बीडी 7206) असा एकुण 55 हजार रुपयाचा मुद्देमाल नमुद आरोपींकडुन हस्तगत करण्यात आला आहे. तपासात आरोपींवरवर यापुर्वी अन्य गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरुन आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे दिसुन येते. त्यांनी आणखी गुन्हे केले असल्याची शक्यता आहे त्याअनुषंगाने तपास सुरू आहे.
कारटेप चोरांची टोळी सक्रीय
पनवेल : परिसरात गाड्यांच्या काचा फोडून महागडे कारटेप चोरणारी टोळी सक्रीय झाली आहे. असून कामोठे वसाहतीमध्ये या घटनांमध्ये वाढत आहे. शहरातील नित्यानंद मार्ग रोडवर मिलींद गांगल यांनी त्यांची व्हॅगेनर गाडी उभी करून ठेवली होती. या वेळी अज्ञात चोरट्याने कारची पुढील काच तोडून गाडीमध्ये असलेले पाच हजार रुपये किमतीचा टेप व रिव्हर्स कॅमेर्याचा स्क्रिन असलेला कार टेप चोरून नेला. तर दुुसर्या घटनेत हुंडाई कंपनीची ऑरा गाडीच्या काचा फोडून सहा हजार रुपये किमतीचा कार टेप व फायबरची फ्रेम असलेला कारटेप चोरून नेला आहे. तर तिसर्या घटनेत व्हॅगेनार गाडीची काच फोडून पाच हजार रुपये किमतीचा कार टेप चोरून नेला आहे. अशाच प्रकारे कामोठे वसाहतीमधील से 35 आणि से 9 मधील स्वस्तिक राधा आणि विघ्नहर्ता सोसायटीच्या समोर उभ्या असलेल्या व्हॅगनार कारच्या काचा फोडून चोरट्यांनी गाडीतील कार टेप चोरून नेल्याचे घटना घडल्याचे उघड झाले आहे. अंधाराचा फायदा घेऊन हे चोरटे सध्या चोरीच्या घटनेला अंजाम देत आहे. कामोठे वसाहतीमध्ये चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे व कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आल्या आहेत.