खोपोली : प्रतिनिधी
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देताच राज्यात शिंदे गटाने जल्लोष साजरा केला. या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यासह खोपोली शहरातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील जागेत एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करीत मिठाईचे वाटप केलेयावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पदाधिकार्यांनी पुष्पहार अर्पण करीत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. या जोरदार घोषणा दिल्या. घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्याचवेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
हातात धनुष्यबाणाचे चिन्ह असलेले भगवे ध्वज घेत कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धर्मवीर आनंद दिघे, कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्याही जय जय काराच्या घोषणा दिल्या. यावेळी जिल्हा सल्लागार मंडळाचे गोविंद शेठ बैलमारे, तालुकाप्रमुख संदेश पाटील, शहर प्रमुख संदीप पाटील, यासह पदाधिकारी तात्या रिटे, हरेश काळे, संतोष माळकर, मंगेश मोरे, तसेच इतर प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहर प्रमुख संदीप पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह शिवसेना शिंदे गटाला दिल्याने त्यांचे विशेष आभार व्यक्त केले. यापुढेही कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …