Breaking News

इंदापूर रेल्वेस्थानकाची प्रवासी संख्या रोडावली

एकाच गाडीला थांबा ; स्थानक बनले क्रॉसिंग स्टेशन ; प्रवास जीवघेणा ठरण्याची भीती

माणगाव : प्रतिनिधी
गतिमान प्रवासासाठी कोकण रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत कोकण रेल्वे एकेरी ट्रॅक वरून दुपदरीकरणामुळे कोकण रेल्वेचा प्रवास अधिक गतिमान झाला. गोवा, साऊथ, मुंबई, कोकण प्रवास करणार्‍या पर्यटक प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने मोठी भरारी घेतली आहे. सन 2017 मध्ये माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी इंदापूर येथे कोकण रेल्वे क्रॉसिंग स्टेशनचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी त्यांनी या मार्गावरील देशातील रेल्वे मार्ग गतिमान करण्याबरोबरच कोकण रेल्वे मार्गही प्राधान्याने गतिमान करीत या मार्गांनी ज्यादा रेल्वे गाड्या सोडण्याबरोबरच अतिजलद गाड्याही या मार्गाने धावतील. त्यामुळे कोकणातील पर्यटनाला अधिक चालना मिळेल. या मार्गावरील अतिजलद गाडया सुरू करण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेचे अधुनिकिरण करण्याची गरज आहे. असे सांगितले होते. त्यानंतर इंदापूरसह अनेक रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण केले. मात्र इंदापूर येथे रेल्वे स्टेशनकडे जाताना रेल्वे ट्रॅक ओलांडून प्रवाशांना जीव मुठीत धरून जावे लागते. तसेच या स्टेशनवर पूर्वी अनेक गाड्यांना थांबा होता. आता या आधुनिकीकरणात एकच रेल्वे गाडी थांबत आहे. त्यांमुळे हे स्टेशन फक्त क्रॉसिंग स्टेशन बनले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास प्रवाशांना दुर्मिळ झाला असून प्रवाशांनी इंदापूर रेल्वे स्टेशनकडे पाठ फिरवली असून या अत्याधुनिकीकरणात रेल्वे प्रशासनाने आपले प्रवासीच हरवले आहेत.
इंदापूर रेल्वे स्टेशनवरील इमारत ठिकाणी जाण्यास रेल्वे रूळ ओलांडावा लागतो कारण तिकीट काढण्यासाठी जिन्याची सोय नाही तसेच मालगाडी उभी असल्यास प्रवाशांना 500 मीटर मागून अथवा पुढून तिकीट काढण्यासाठी जावे लागते. त्याचबरोबर कांही वेळेस स्टेशनवर अठवडाभर मालगाडी उभी असते. तेव्हा प्रवाशांची अधिकच गैरसोय होते त्याचबरोबर फ्लॅटफॉर्मची कमी उंची असल्यामुळे वयोवृद्ध इसम तसेच लहान बालके व महिला यांना चढ उतार करताना तारेवरची कसरत करावी लागते. 27 नोव्हेंबर 1993 पासून कोकण रेल्वेवर अवलंबून असणार्‍या तळा तालुक्यातील दुर्गम भागातील प्रवाशांना खर्चिक भुर्दंड मोजावा लागत असून माणगाव ते तळा 45 रु. बसचा भुर्दंड सोसावा लागतो. तर मिनीडोरने 60 रु खर्च सोसावा लागतो. तळा – इंदापूर रेल्वे स्टेशनवर गाडीच्या वेळेत बसची सुविधा उपलब्ध करावी असे तळा तालुक्यातील जनतेची मागणी आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणाचा फटका प्रवाशांना बसत आहे.
दिवा-सावंतवाडी-मडगाव व मडगाव-सावंतवाडी-दिवा कोकण रेल्वे 1 नोव्हेंबर 2021 पासून बंद आहे तर इंदापूर रेल्वे स्थानकात सकाळी 10.00 रत्नागिरी-दिवा गाडी थांबते. तर दिवा – रत्नागिरी जाणारी रल्वे सायंकाळी 6.00 वाजता रेल्वे स्थानकावर थांबते. मात्र या व्यतिरिक्त एकही रेल्वे गाडीला थांबा नाही. त्यामुळे हे रेल्वे स्थानक क्रॉसिंग पुरतेच मर्यादित राहिले आहे. हे रेल्वे स्टेशन सुसज्ज केले असून रेल्वे स्थानकालगत कर्मचार्‍यांसाठी निवासस्थान आहे. इंदापूर शहर व बाजरपेठेच्या विरुद्ध दिशेला रेल्वे स्थानक उभारल्यामुळे प्रवाशांना रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग करून जावे लागते. त्यामुळे हा प्रवास जीवघेणा ठरत आहे. या विविध समस्यांमुळे इंदापूर रेल्वे स्थानक नावापुरतेच उरले असून रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष चालवले आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply