पूल बांधकामामुळे माणगाव नगरपंचायतीचे 25 लाख जाणार पाण्याता
माणगाव : प्रतिनिधी
मुंबई – गोवा महामार्गावरील माणगाव काळ नदीवर असणारा ब्रिटीश कालीन पूल हा वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने या पुलालगत दुसरा नवीन पूल शासनाकडून बांधण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे या पुलाच्या विस्तारीकरणात पुलालगत असणारा माणगावकरांचा गणपती विसर्जनाचा घाट 10 सप्टेंबर 2018 रोजी माणगाव नगरपंचायतीने 24 लाख रुपये खर्चून बांधला होता. महामार्गाच्या या पुलाच्या बांधकामाआड येत असल्याने या गणपती विसर्जन घाटावर महामार्गवाल्यांचा हातोडा पडणार आहे. यामुळे माणगाव नगरपंचायतीचे लाखो रुपये पाण्यात जाणार आहेत. हा गणपती विसर्जन घाट गणेशभक्त व ग्रामस्थांचा गणेश उत्सवात गणपती विसर्जनासाठी मोठा मानला जातो. मुंबई – गोवा महामार्गावर माणगाव बाजारपेठेत गणेश उत्सव, होळी तसेच सण उत्सव लग्न सराई, सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये प्रवासी नागरिकांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागतो. त्यातच पर्यटकांची वर्दळ यामुळे मुंबई बाजूकडून कोकणात जाणार्या पर्यटक प्रवासी नागरिकांना माणगाव रेल्वे स्थानकापासून बाजारपेठेतून काळ नदीवरील पुलापर्यत वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. तसेच कोकण व तळ कोकणातून येणार्या वाहनांना काळ नदी पुलापासून ते रेल्वे स्थानकापर्यत वाहतूक कोंडीत तासनतास अडकून पडावे लागते. यामुळे प्रवाशांचा वेळ, पैसा वाया जातो. तसेच हालही होतात. माणगाव काळ नदीवरील पूल हा ब्रिटीशकालीन शेकडो वर्षापासून बांधलेला असून त्या पुलावर अनेक वेळा छोट्या मोठ्या दुरुत्या झाल्या आहेत. मात्र हा पूल वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने या पुलावर वाहतूककोंडी सतत होते. त्यांमुळे प्रवासी, नागरिक व ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून या पुलालगत नवीन दुसरा पूल बांधण्यात येत आहे. या नवीन पुलाचे बांधकाम शासनांनी एका ठेकेदारामार्फत सुरु केले असून हा पूल 105 मीटर लांब व 16 मीटर रुंदीचा असणार आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील कळमजे गावचे फाट्यावर गोद नदीवरील ब्रिटीशकालीन पूल हा कमकुवत झाल्याने व पावसाळ्यात या पुलावर पुराचे पाणी वाहते यामुळे हा पूल नव्याने बांधण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच रत्नागिरी जिल्हाच्या बॉर्डरवर असणारा महत्वाचा पूल असे तीन पुलांच्या बांधकामासाठी 21 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. माणगाव काळ नदीवरील पुलाचे काम डिसेंबर 2023 पूर्वी संबंधित ठेकेदारामार्फत पूर्ण करावयाचे आहे. या पुलाचा पाया काळ नदीत खोदकाम करून संबधित ठेकेदाराकडून सुरु करण्यात आला आहे. मात्र या पुलाच्या बांधकामाआड गणपती विसर्जन घाट येत असल्याने तो तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी गणेश उत्सवात गणेशभक्तांना काळ नदीत गणपती विसर्जन करताना गणपती विसर्जन घाटाची उणीव भासणार आहे. माणगाव नगरपंचायतीला हा गणपती विसर्जन घाट तुटणार की नाही ? याबाबत महामार्ग विभागाने कोणतीही पूर्वसूचना वा लेखी नोटीस दिली नाही. यामुळे सर्वच अनभिज्ञ आहेत.
माणगाव नगरपंचायतीने नागरिकांच्या मागणीचा विचार करून काळ नदीत गणेश उत्सवात गणपती विसर्जनासाठी येणार्या गणेशभक्तांना महिला व वृद्धांसाठी निवारा व बैठकीसाठी गणपती घाटाची सोय करण्यात आली होती. विसर्जनावेळी गणेशभक्तांना आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी हा गणपती विसर्जन घाट 2018 रोजी सुमारे 24 लाख रुपये खर्च करून बांधला होता. हे बांधकाम तुटणार आहे की नाही? याबाबत नगरपंचायतीला संबंधित खात्याने कळविलेले नाही.
– ज्ञानदेव पवार, नगराध्यक्ष माणगाव.
काळ नदीवर नव्याने बांधण्यात येणार्या पुलालगत असणारा माणगाव नगरपंचायतीने बांधलेला गणपती विसर्जन घाट तुटणार की नाही याचे सर्वेक्षण केले जाईल व हा घाट बाधित झाल्यास त्याचे नव्याने मूल्यांकन करून नगरपंचायतीला मोबदला शासनाच्या नियमाप्रमाणे वाटप केला जाईल.
– श्री. महाडकर, महामार्ग विभाग महाड