Breaking News

कचर्‍यातून रोजगाराची संधी

स्वच्छ भारत अभियान 2021 अंतर्गत महापालिकेचा तीन आर तत्वावर आधारित स्वच्छता रथ सध्या  पनवेलमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. शहरातील वीस प्रभागातील कचर्‍यात टाकून देण्यात येणारे परंतु वापरण्यायोग्य जुने कपडे, ई-कचरा, जुनी पुस्तके, जुनी भांडी, जुने चप्पल, बुट, प्लॅस्टिक, इतर वस्तू या रथातून गोळा करून त्यांचे वर्गीकरण करून पुनर्वापर करण्यात येणार असल्याने नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. या कचर्‍यातून महिला बचत गटांना  पनवेल  महापालिका रोजगाराची संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. पनवेल नगर परिषदेची ओक्टोंबर 2016मध्ये महानगरपालिका होताना शासनाने पुर्वीच्या ग्रामपंचायत हद्दीतील काही गावे आणि स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या खारघरसह सिडको वसाहतींचा त्यामध्ये  समावेश केला. त्यामुळे या नव्या महानगरपालिकेची 10 लाखांपेक्षा जास्त  लोकसंख्या आणि  110चौ.की.मी. क्षेत्रफळ झाले आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणात मागील वर्षी  पनवेल महापालिका देशात  20व्या आणि राज्यात पाचव्या स्थानावर आली. महापालिकेतील सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गाने हातात हात घालून एकदिलाने काम केल्यानेच हे यश साध्य झाले आहे. पनवेल महापालिकेने ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची नागरिकांना सवय लावल्यास महापालिका खर्‍या अर्थाने स्मार्ट सिटी बनेल, पण एवढ्या मोठ्या क्षेत्रात स्वच्छ भारत अभियान राबविणे सोपे नसल्याने आजपर्यंतच्या महापालिका आयुक्तांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी अनेक प्रयोग राबविले. यावर्षीही महापालिकेने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत नवनवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. देशातील सर्व नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे महात्मा गांधीजी यांचे मत होते. महात्मा गांधीजींना श्रद्धांजली सोबत स्वच्छतेची कार्यांजली अर्पण करायची असा निश्चय करत स्वच्छ  भारत अभियाना अंतर्गत पनवेल महापालिकेच्या स्वच्छता विभागाने तीन आर (रिड्यूस, रियुझ, रिसायकल) तत्वावर आधारित स्वच्छता रथ तयार केला आहे. या रथाद्वारे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना स्वच्छतेचे तसेच घनकचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी स्वच्छ भारत अभियान 2021अंतर्गत विविध उपाय योजनांची अमंलबजावणी पनवेल महापालिका क्षेत्रात सुरू आहे. हे रथ वीस प्रभागांतील कचर्‍यात टाकून देण्यात येणारे परंतु वापरण्यायोग्य जुने कपडे, ई-कचरा, जुनी पुस्तके, जुनी भांडी , जुने चप्पल, बुट, प्लॅस्टिक, इतर वस्तू गोळा करणार आहेत. त्यानंतर त्याचे विलगीकरण करून त्यांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. या स्वच्छता रथाचे महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेता परेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते नुकतेच उदघाटन करण्यात आले. या कचर्‍यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, यासाठी  महानगरपालिका प्रयत्न करीत असून, त्यांना मालाच्या  विक्रीसाठी प्रभागातच विक्री केंद्र उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शहरातील सार्वजनिक भिंतीवर स्वच्छतेचे संदेश रंगविले जात आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी,  या हेतूने स्वच्छतेचे महत्व या चित्रांतून पटवून दिले जात आहे. नागरिकांनी घनकचर्‍याचे ओला आणि सुका वर्गीकरण करावे, मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा, हात स्वच्छ धुवा, माझी  वसुंधरा अभियान, वृक्षारोपण करा, कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडीचा वापर करा, माझे कुटूंब माझी जबाबदारी, कोरोना योध्दांना सलाम असे अनेक संदेश या भिंती चित्रातून दिले जात आहे. ‘स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल’ चा नारा या संदेशातून नागरिकांपर्यत पोहचवला जात आहे.  अनेक सोसायटीत ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात आहे. पण संपूर्ण महानगरपालिका हद्दीत त्याची नागरिकांना सवय लावण्याची गरज असून त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

स्वच्छता रथाद्वारे गोळा झालेले चांगले कपडे झोपडपट्टीत वाटप करण्यात येतील. कापडी पिशव्या तयार करण्यासाठी फाटलेल्या साड्या बचत गट किंवा गरजू महिलांना देण्यात येतील. या पिशव्या विकून त्यांना उत्पन्न मिळेल. झोपडपट्टीतील मुलांना पुस्तके देण्यात येणार असून, उरलेली पुस्तके वाचनालयांना देण्यात येतील. गोळा झालेले प्लास्टिक एक कंपनी रिसायकल करण्यासाठी घेणार आहे.

-मधुप्रिया आवटे, वरिष्ठ सल्लागार,स्वच्छ भारत अभियान

-नितीन देशमुख 

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply