माणगाव : प्रतिनिधी
दरवर्षी होळी सणासाठी चाकरमानी कोकणातील आपल्या मूळ गावी मोठ्या संख्येने जातात. यंदा या होळी सणाला लागून चार दिवस सुट्या आल्याने लोक मिळेल त्या वाहनाने गावी निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव बाजारपेठेत वाहनचालक व प्रवाशांना वाहतूक कोंडीची सामना करावा लागत आहे.
कोकणातील गणेशोत्सवानंतरचा सर्वांत मोठा सण होळी असून यासाठी मुंबई, सुरत, पुणे येथून नागरिक आपल्या मूळ गावी आवर्जून येतात. यंदा 6 मार्चला होळी, 7 मार्चला धुलिवंदन असल्याने विविध भागातून नागरिक शनिवारीच (दि. 4) आपल्या मूळ गावी निघाले. त्यामुळे मुंबई बाजूकडून माणगावकडे येताना सुमारे तीन किमी अंतरावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तसेच पुणे बाजूकडून येणार्या पर्यटक प्रवासी वाहनांच्या रांगा सुमारे दीड किमी अंतरावर लागल्या होत्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांना पाण्यासाठी हाल झाले.
चार दिवस सलग सुट्या आल्याने मुंबई-गोवा महामार्गावर प्रवासी नागरिकांच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे दिसून आले. महामार्गावर मुंबई बाजूकडून वाहनाने कोकणात होळीसाठी जाताना दिसत होत्या, तर पुणे बाजूकडून समुद्र व पर्यटनास्थळावर मौज मजा करण्यासाठी कुटुंब व मित्रांसह ग्रुप सहलीसाठी मोठ्या प्रमाणात जात आहेत. त्यामुळे सर्वांनाच या वाहतूक कोंडीचा फटका बसला.
मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर, माणगाव येथील बायपासचे काम पूर्ण झाल्यास माणगावमध्ये होणार्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटेल, अशी आशा नागरिकांना आहे. ही वाहतूक सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस तसेच महामार्ग पोलीस व माणगाव पोलीस विशेष प्रयत्न करीत आहेत.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …