माणगाव तालुक्यातील नांदवीचे ग्रामदैवत ; खालूबाजाच्या तालावर पालखी नाचवली
अलिबाग : प्रतिनिधी
माणगाव तालुक्यातील नांदवीचे ग्रामदैवत श्री बापूजी महाराज यांचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. यानिमित्ताने पंच क्रोशीतील हजारो भाविकांनी श्री बापूजी महाराज यांचे दर्शन घेतले.
उत्सवानिमित्त मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तर मूर्तीला वस्त्रालंकारानी सजवण्यात आले होते. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. मुंबई पुणे किंवा अन्यत्र काम धंद्यानिमित्त स्थायिक झालेले चाकरमानी दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी आवर्जून आले होते.संध्याकाळी श्री बापूजी देवाच्या भगिनी देवता पालखीतून त्यांच्या भेटीला आल्या. गावशेजारी असलेल्या श्री जाखमाता देवीला मानाने मंदिरात आणण्यात आले. या सर्व देवतांचा योग्य मानपान करून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सकाळी त्यांना निरोप देण्यात आला.
रात्री पालखी नाचवण्याची प्रथा पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी केली होती. पालखी नाचवण्यात महिलाही अग्रेसर होत्या. खालूबाजाच्या तालावर गिरकी घेत पालखी नाचवताना पाहणे डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.
सर्व जातीधर्माचे लोक यात सहभागी होत असतात. गावोगावच्या उंच आणि सजवलेल्या जत्तरकाठ्या, पारंपारिक कोकणी खालूबाजा हे या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.
लाट फिरवण्याची वर्षानुवर्ष सुरू असलेली परंपरा ग्रामस्थानी आजही कायम ठेवली आहे. लाटेच्या वतनदार मानकरी मंडळींना योग्य मान देण्यात आला.जत्रेनिमित्त विविध प्रकारच्या वस्तू, खाद्यपदार्थ, मिठाई, प्रसाद,खेळणी यांची दुकाने सजली होती. मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने मोठी आर्थिक उलाढाल झाली. अगदी पहाटे पर्यंत हा
सोहळा रंगला.
छबिना उत्सवाने सांगता
जात्रेनिमित्त येणार्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीने सर्व व्यवस्था केली होती. सकाळी छबिना उत्सवाने जत्रेची सांगता झाली.