Breaking News

अधिकारी, कंत्राटदाराला धरले धारेवर

रस्त्याचे काम निकृष्ट ; ग्रामस्थांचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना साकडे

सुधागड : रामप्रहर वृत्त
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येत असलेल्या नांदगाव ते गोमाशी रस्त्याचे काम अतिशय दर्जाहिन होत असल्याची तक्रार गोमाशी ग्रामस्थांनी माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्याकडे केली होती. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून मंगळवारी (दि.11) धैर्यशील पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन या कामाची पाहणी केली. यावेळी पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, अधिकारी व कंत्राटदाराला चांगलेच धारेवर धरले. त्यांची खरडपट्टी काढली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी धैर्यशील पाटील यांना ज्या ज्या ठिकाणी निष्कृष्ट दर्जाचे काम झाले आहे ते काम निदर्शनास आणून दिले. यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की नांदगाव ते गोमाशी या रस्त्याचे काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षांनंतर दुरवस्था झालेल्या या रस्त्याच्या कामास सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे हे काम दर्जेदार व्हावे, ज्या ठिकाणी निष्कृष्ट दर्जाची कामे झाली आहेत ती कामे तात्काळ दुरुस्त करून घ्यावी. पावसाळ्याच्या आतमध्ये रस्त्याचे काम पूर्ण व्हावे अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी धैर्यशील पाटील यांच्याकडे केली. धैर्यशील पाटील यांनी यावेळी संबंधित अधिकार्‍यांना कामाचा योग्य तो दर्जा राखण्याचे व ग्रामस्थांना अपेक्षित असलेले काम करून घेण्याचे निर्देश दिले. तसेच या कामांमध्ये चालढकल व वेळकाढूपणा सहन केला जाणार असे देखील संबंधित अभियंते, अधिकारी व कंत्राटदाराला बजावण्यात आले. यावेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, आलाप मेहता, ऍड. सुभाष पाटील, रोहन दगडे, संजोग शेठ, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने गोमाशी पंचक्रोशीतले ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गोमाशी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी धैर्यशील पाटील यांचे आभार मानले.

संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे आम्ही सतत पाठपुरावा करून निधी आणतो. यासाठी अथक परिश्रम घेतो. मात्र जेव्हा रस्ता बनतो तेव्हा आमच्याकडे कोणीही रस्ता चांगला झाला हे सांगण्यासाठी येत नाही. कारण रस्ता चांगला होतच नाही. त्यामुळे संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांनी चांगले ठेकेदार निवडावेत व कामावर योग्य देखरेख ठेवावी आणि दर्जेदार काम करून घ्यावे. तसेच जे ठेकेदार चांगले काम करत नाहीत त्यांच्याकडे काम देऊच नये. मी कधीही कोणताही ठेकेदार घ्या म्हणून सांगत नाही.
-धैर्यशील पाटील, माजी आमदार, पेण सुधागड रोहा मतदारसंघ.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply