Breaking News

माथेरानच्या दस्तुरीत पर्यटकांची फसवणूक

पालिका आणि पोलिसांनी घोडेवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी

कर्जत : बातमीदार – माथेरानचे प्रवेशव्दार असलेल्या दस्तुरी नाक्यावरील   काही घोडेवाल्यांकडून पर्यटकांची फसवणूक आणि दिशाभूल होत असून, याबाबत सोशल मीडियावर तक्रारीही झाल्या. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. काही घोडेवाले पर्यटकांची फसवणूक, दिशाभूल हे करतात. पण नाव अश्वपाल संघटनेचे खराब होत आहे. त्यामुळे संघटनेच्या अध्यक्षा आशाताई कदम यांनी प्रशासन अधिकार्‍यांची भेट घेऊन दोषी घोडेवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात चर्चा केली.

17 मार्च रोजी लॉक करण्यात आलेले माथेरान 2 सप्टेंबर रोजी पर्यटकांसाठी खुले झाले. त्यानंतर पर्यटक थोड्या फार प्रमाणात माथेरानला येऊ लागले. माथेरानमध्ये येणार्‍या पर्यटकांची सुरुवातीलाच दस्तूरी येथे घोडेवाल्यांशी गाठभेट होते. पर्यटकाला माथेरान विषयी काही माहिती नसते. त्यामुळे घोडेवाला जे बोलेल ते गृहीत धरून पर्यटक घोडेवाल्यावर विश्वास ठेवतात. पण काही घोडेवाले त्याचा गैरफायदा घेत अव्वाच्यासव्वा पैसे घेऊन पर्यटकांना फसवतात. याबाबाबत अनेक तक्रारी नगरपालिकेच्या तक्रार वहीत पर्यटकांनी नोंद केल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून दस्तुरीवरील घोडेवाल्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. फसवणूक करणार्‍या घोडेवाल्यावर प्रशासनाने कारवाई करावी, यासाठी संघटनेच्या अध्यक्षा आशाताई कदम यांनी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, गटनेते प्रसाद सावंत यांची नगरपालिका कार्यालयात भेट घेतली.

दस्तुरी येथे माथेरान बाहेरील घोडेवाले व्यवसाय करतात. त्यांना फक्त पैसा हवा आहे. यापुर्वी दस्तुरीवरून फक्त बाजारपेठ किंवा रेल्वे स्टेशनपर्यंत पर्यटकांना घोड्यावर आणले जायचे मात्र आता हॉटेलला जरी जायचे असेल तर पाच पॉईंट फिरूनच जावे लागेल, असे या घोडेवाल्यांकडून सांगितले जाते. व महत्वाचे पॉईंट न दाखवता जवळचे पॉईंट दाखवून पर्यटकांची दिशाभूल केली जाते. मात्र त्या घोडेवाल्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. परिणामी त्यांचे साहस आणखी वाढून फसवणुकीच प्रमाण वाढत आहे. त्यासबंधी नगरपालिका प्रशासन आणि पोलीस यांनी ही फसवणूक रोखून पर्यटकांना समाधान द्यावे, असे आशाताई कदम यांनी यावेेळी सांगितले.

पर्यटकांची दिशाभूल व फसवणूक करणार्‍या  घोडेवाल्यावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही, तर दीपावली पर्यटन हंगामात आम्ही घोडे बंद करून आंदोलन करू, असा इशारा आशाताई कदम यांनी यावेळी दिला.

दस्तुरी पार्किंगमधून सर्वांना हटविले जाईल व घोडा स्टँडवरच घोडेवाला उभा राहील, असे नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी यावेळी सांगितले. तर माथेरान रेल्वे स्थानकासमोर जे घोडे उभे असतात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर न्यावेत, अशी सूचना प्रशासनाने करताच संघटनेच्या अध्यक्षांनी त्यास सकारात्मकता दाखवली.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply