Friday , September 22 2023

शिवराय, डॉ. आंबेडकर ऐक्यासाठी लढले

ना. रामदास आठवले यांचे प्रतिपादन; कोकण भवनात संयुक्त जयंती कार्यक्रम
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे, शिक्षणाशिवाय मनाचा विकास होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणाशी नाते होते. ते केवळ दलितांच्या मुक्तीसाठी लढले नाही, तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचा लढा होता. तर छत्रपती शिवाजी महाराज मराठी माणासाला न्याय देण्यासाठी गनिमी काव्याने लढले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशातील ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी लढले होते, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव नवी मुंबईतील कोकण भवन येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास कोंकण पदवीधर मतदार संघाचे आ. निरंजन डावखरे, महा मुंबई मेट्रोचे संचालक निखील मेश्राम, आगरी कोळी समाज, शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे उपस्थित होत्या. तसेच नगररचना विभागाचे सहसंचालक जितेंद्र भोपळे, माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, वैद्यकिय अधिकारी डॉ. गणेश धुमाळ, स्माईल्स फाऊंडेशन्सच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. उमा अहूजा आणि डॉ. धीरज अहुजा यांची विशेष उपस्थिती होती.
जयंती महोत्सवाच्या प्रारंभी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेला पूष्प अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी श्री. आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांच्या मुक्तीसाठी लढले नाही, तर समाजाला दिशा देण्यासाठी लढले. त्यांनी जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी काम केले. जातीपेक्षा देश मोठा आहे म्हणूनच देशासाठी लढा हि भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली. आंबेडकरांनी दामोधर व्हॅलीत पाच धरणे बांधली या मागील संकल्पना म्हणजे जलसाठे वाढविणे जेणे करुन जनतेचा, प्राणी, पशुपक्ष्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल त्याचबरोबर जलसंधारण वाढेल. पाणीपत युद्धासाठी छत्रपती शिवाजी महाराज मावळे दिल्लीला घेऊन गेले आणि तेथे ते स्वराज्यासाठी लढले. त्यांनीदेखील जाती व्यवस्थेला आळा घालण्याचे काम केले असल्याचे श्री. आठवले यांनी यावेळी सांगितले.
या वेळी आमदार निरजंन डावखरे, आगरी कोळी समाज, शेतकरी प्रबोधिनी राजाराम पाटील यांनी देखील समायोचित भाषणे केली. आमदार डावखरे यांनी आमदार निधीतून डिजीटल लायब्ररीसाठी कोणी संस्था पुढे आल्यास त्या संस्थेस दहा लाख रुपये देण्याचे जाहिर केले. केंद्रिय राज्यमंत्री श्री. आठवले यांच्या हस्ते आनंद गुप्ता, मृणाली राजपक्षे, राधा साफी, मिताली वाघे या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. स्माईल्स फाऊडेशनच्या वतीने इयत्ता 4 थी ते 12 वी पर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांना बायजूजचे तीन वर्षा करिता मोफत सदस्यत्व देण्यात आले.
सकाळी 10.00 ते दूपारी 2.00 या वेळेत मेडीकव्हर हॉस्पिटल खारघर नवीमुंबई यांच्यावतीने सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी ऐतिहासिक शस्त्रे व नाणी यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. नगररचना विभागाचे सहसंचालक जितेंद्र भोपळे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारीत झी हिंदी वाहिनीवरील एक महानायक या हिंदी मालिकेचे दिग्दर्शक विनोद माणिकराव, या मालिकेत डॉ. बाबासाहेबांची मुख्य भूमिका साकारणारे अभिनेता अथर्व कर्वे, यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिनेता श्री. कर्वे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भुमिका साकारताना आलेले अनुभवन सांगितले. तसेच श्री. संदीप जठारी यांनी काढलेली रांगोळी यावेळी आकर्षण ठरली.
या वेळी अधिकारी व कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते. यानंतर मराठी पाऊल पडते पुढे या कलामंचाने छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत शिव-भीम गीतांचा जल्लोष भिम वंदना हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात नागरीक उपस्थित होते. हा जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी समितीचे उपाध्यक्ष नरेश वाघमारे, सचिव प्रविण डोंगरदिवे, सहसचिव अजित न्यायनिर्गुणे, कोषाध्यक्ष मंगेश येलवे, खजीनदार अपर्णा गायकवाड, सदस्य वनिता कांबळे, मनोज राजपक्षे, विनोद वैदू, कमलेश वानखडे, बाळासाहेब मोगले, जनाबाई साळवे, बाबूराव बनसोडे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

खारघरमध्ये भाजपतर्फे सिग्नलचे लोकार्पण

खारघर ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून …

Leave a Reply