Breaking News

नवी मुंबईत वर्षभरात 301 सायबर गुन्हे

साडे चार कोटी रुपयांची फसवणूक; 30 आरोपींना अटक

नवी मुंबई : प्रतिनिधी

इंटरनेटच्या वापरात वाढ होत असतानाच सायबर गुन्ह्यांशी संबधित गुन्ह्यांच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात गेल्या कॅलेंडर वर्षामध्ये याप्रकारचे 301 गुन्हे घडले असून यातील फक्त 46 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणून 30 आरोपींना अटक केली आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये सायबर गुन्हेगारांनी तब्बल चार कोटी 48 लाख 32 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

सायबर भामटे फसव्या लिंक अथवा मेसेज पाठवून फसवणूक करत असल्याचे आढळून आले आहे. त्याशिवाय पेटीएम केवायसी किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने नागरिकांकडून बँक खाते क्रमांक व त्यांच्या मोबाइलवर आलेला ओटीपी मिळवून अथवा यूपीआय पिनची मागणी करून त्यांच्या बँक खात्यातून परस्पर रक्कम काढण्याचे प्रकार घडत आहेत. त्याचप्रमाणे खरेदी, विवाह, खाद्यपदार्थ यांची माहिती देणार्‍या संकेतस्थळांवर बनावट कस्टमर केअर क्रमांक टाकून त्याद्वारेदेखील फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन मैत्री करून विशेषत: एकाकी, घटस्फोटित अशा महिलांना प्रामुख्याने लक्ष्य करून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकारही निदर्शनास आले आहेत. काही प्रकारात हे सायबर गुन्हेगार व्हॉट्सअ‍ॅपवरून एनी डेस्क, क्विक सपोर्ट, टीम व्ह्यूवर अशा अ‍ॅपची लिंक पाठवून ते डाऊनलोड करण्यास सांगून समोरच्या व्यक्तीच्या मोबाइल फोनवर ताबा मिळवतात व त्यांच्या बँक खात्यातील सर्व रक्कम काढून घेत असल्याचे प्रकारही घडले आहेत.

गेल्या वर्षीच्या गुन्ह्यांमध्ये सोशल मीडियाशी संबंधित 59 तर ऑनलाइन फसवणुकीसंबंधात 242 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी यातील केवळ 46 गुन्ह्यांची उकल केली असून 30 आरोपींना अटक केली आहे. सोशल मीडियाशी संबंधित असलेल्या फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्सअ‍ॅप, यूटयुब, इन्स्टाग्राम व इतर सोशल मीडियाशी संबंधित 33 गुन्हे घडले असून यातील 16 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणून 10 आरोपींना अटक केली आहे. तर, महिलांशी संबंधित घडलेल्या 26 सायबर गुन्ह्यांपैकी 18 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणून 8 आरोपींना अटक केली आहे.

सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन

सध्या बहुतांश आर्थिक व्यवहार हे ऑनलाइन होत आहेत. मात्र बहुतांश लोकांना हे व्यवहार कसे केले जातात याची माहिती नसल्याने सायबर गुन्हेगार याचा गैरफायदा घेतात. त्यामुळे नागरिकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करूनच ऑनलाइन बँकिंग, फेसबुक, इन्स्टाग्राम यासह इतर ऑनलाइन अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply