Breaking News

आपत्ती व्यवस्थापनावर भर

मेट्रोचे जाळे प्रत्यक्षात येईपर्यंत संबंधित भागांमध्ये पाणी साठल्यास वा वाहतुकीची कोंडी झाल्यास तेथे प्रसाधनगृहांची, खानपानाची व वेळ पडल्यास तात्पुरत्या निवार्‍यांची सोय कुठे होऊ शकेल हे हेरून समाजमाध्यमांच्या साह्याने अडकलेल्या लोकांना या पर्यायांकडे वळवणेच योग्य ठरेल. कमी वेळात होणार्‍या अतिवृष्टीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांनी अशा पर्यायी व्यवस्थांचा विचार करण्याची नितांत गरज आहे.

सप्टेंबरचा चौथा दिवस यंदा अनपेक्षितपणे मुंबई व आसपासच्या परिसरात अतिवृष्टी घेऊन आला. अवघ्या सहा तासांच्या काळात सलगपणे झालेला मुसळधार पाऊस व त्याचदरम्यान आलेली 4.18 मीटर इतक्या उंचीच्या लाटांची भरती यामुळे मुंबईतील मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि मुंबापुरीला पुन्हा एकदा 26 जुलैच्या त्या प्रलयाची आठवण यावी अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागले. यात कुठल्याही यंत्रणेकडून कोणताही गलथानपणा झाला नव्हता. परंतु या पावसाचे स्वरुपच कितीअनपेक्षितपणे निराळे होते हे लक्षात घ्यावे लागेल. सप्टेंबरमध्ये सर्वसाधारणपणे सरासरी 341 मिमी पाऊस पडतो. पण यंदा मात्र सप्टेंबरच्या पहिल्या चार दिवसांतच सुमारे 281 मिमी इतक्या पावसाची नोंद मुंबईमध्ये झाली. बुधवारी सकाळपासूनच शहरभरात धुवांधार पाऊस सुरू होता. नेहमीप्रमाणे निव्वळ काही सखल भागांत पाणी साचेल अशा कयासाने लोक कामाधंद्यासाठी घराबाहेर पडले. परंतु दुपारपर्यंत तिन्ही उपनगरीय रेल्वेंची सेवा पुरती कोलमडली. रस्त्यांवर प्रचंड पाणी तुंबले. निव्वळ मुंबईच नव्हे तर वसई-विरारपासून पनवेलपर्यंत अशीच परिस्थिती ओढवली. अवघ्या रायगड जिल्ह्यात बुधवारी सलग दुसर्‍या दिवशी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री, अंबा, कुंडलिका व पाताळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. महाड आणि नागोठणे शहरात पुराचे पाणी घुसले. मुंबई परिसरात गेल्या काही वर्षांत सप्टेंबर महिन्यातील पावसाचे स्वरुप बदलते आहे. 2016 आणि 2017 या दोन्ही वर्षांमध्ये सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. 2016 मध्ये 756 मिमी तर 2017 मध्ये 603 मिमी पावसाची नोंद आहे. एकीकडे या परिसरातील यंत्रणा स्वत:ला अद्ययावत करण्याचे प्रयत्न जोमाने करीत आहेत. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे विणून रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेमार्गालगतच्या गटारे व नाल्यांची सफाई योग्य रीतीने व्हावी याची काळजी घेतली जाते आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचा धोका ओळखून सरकारने त्याविरोधातही मोहीम उघडली आहे. अर्थात यास जनतेकडूनही तितकाच जोमदार प्रतिसाद मिळाला तरच हे प्रयत्न यशस्वी ठरतील. मेट्रोच्या निरनिराळ्या मार्गांची कामे पूर्ण होईपर्यंत त्या-त्या भागांत पाणी साठणे वा रस्ते अधिकच अरुंद झाल्याने वाहतुकीची कोंडी होणे आदी त्रास होणारच आहेत. परंतु तशात अकस्मात होणार्‍या अतिवृष्टीची भर पडल्यावर मात्र परिस्थिती गंभीर स्वरुप धारण करताना दिसते. बुधवारी अखेर स्टेशनांनजीकच्या महापालिका शाळांमध्ये लोकांची सोय करण्याचे पाऊल प्रशासनाला अचलावे लागले. अनेक ठिकाणी कार्यालयांनीही कर्मचार्‍यांची रात्रीची राहण्याची सोय केली. हवामान विभागाने गुरुवारकरिताही अतिवृष्टीचा इशारा दिल्याने शिक्षणमंत्र्यांनी शाळा-कॉलेजांना सुटी जाहीर केली. पावसाचे बदलते स्वरुप लक्षात घेऊन यंत्रणा अधिक अद्ययावत होण्याच्या या संक्रमणाच्या काळात आपल्याला आपत्ती व्यवस्थापनाच्या अशा पर्यायांचाच विचार करावा लागणार आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply