पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेने वडाळे तलावाचे सुशोभीकरण नुकतेच केले आहे. सुंदर परिसर, रम्य वातावरण, समोर अथांग असे तळे पाहून पनवेलकर नागरिक हा मोकळा श्वास घेत सुखावत असतो, परंतु काही नागरिक हे त्याच तळ्यामधील माश्यांना खायला घालायला म्हणून येतात आणि नको नको त्या गोष्टी त्या तळ्यात टाकत असतात. त्यामुळे माश्यांना असे पदार्थ खायला टाकू नका आणि तलाव स्वच्छ ठेवा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वडाळे तलाव या ठिकाणी अनेक नागरिक येथे माश्यांना काही पदार्थ खायला टाकतात. यामध्ये शिळे अन्न, पाव, चपाती, बिस्किटे, बर्थडेचा उरलेल्या केक, पिझ्झाचे तुकडे, कुरमुरे आणि असे बरेच काही असते. येथील सुरक्षा रक्षक व काही सुजाण नागरिक हे त्यांना हटकण्याचा प्रयत्न करतात, पण थोड्या वेळाने परिस्थिती पुन्हा जैसे थे! त्या अनुषंगाने ज्यादा सुरक्षा रक्षक व कर्मचारी अथवा अधिकारी हे गर्दीच्या वेळेत गस्त घलण्यासाठी तिथे असावेत यासाठी पालिकेसोबत पाठपुरावा करीत आहोत, परंतु प्राथमिक स्वरूपात काय करता येईल असा विचार करता आम्ही मित्रांनी मिळून काही डिझाईन्स अथवा व्हॉट्सअॅप फ्लायर बनवले आणि त्यात पुणेरी पट्टयांच्या शैलीमध्ये कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे, असे भाजप सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी सांगितले.
पनवेलमधील सोशल मीडियावर हे डिझाईन्स व्हायरल केले आणि तळ्याच्या परिसरात त्याचे छोटे बॅनर लावून घेतले आहेत तसेच एक पाऊल पुढे म्हणून संध्याकाळच्या वेळेस आम्ही मित्र मिळून तिथल्या नागरिकांना तळ्यामध्ये अन्न टाकू नका व त्याचे काय दुष्परिणाम आहेत हे समजवण्याचा प्रयत्न करीत आहोत. एक पनवेलचा नागरिक म्हणून जे आम्ही करतोय ते प्रत्येकाने केले तर हे वडाळे तलावासोबतच संपूर्ण पनवेल शहर हे अधिक गतीने स्वच्छ होण्यास मदत होईल, असेही अभिषेक पटवर्धन म्हणाले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …