पनवेलः प्रतिनिधी/बातमीदार
पनवेलमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने 40हून अधिक जणांचा चावा घेतल्यानंतर निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्याची सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार निर्बिजीकरण केंद्र व त्याचबरोबर निर्बिजीकरण प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्यासाठी नव्याने कंत्राटदार नेमण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया पार पाडली. निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद न आल्यामुळे तीन वेळा निविदा प्रसिद्ध करावी लागली. तिसर्यांदा दोन निविदा आल्यामुळे निविदा उघडण्यात आल्या. त्यापैकी आयडिया संस्थेला निर्बिजीकरणाचे काम देण्यात येणार आहे. कामगार, निर्बिजीकरण औषधे, केंद्रासाठी वीज, पाणी याचा खर्च म्हणून महापालिका प्रत्येक श्वानासाठी 1310 रुपये खर्च करणार आहे.
वर्षाला तीन हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचे उद्दिष्ट कंत्राटदाराला देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत निविदेच्या दराला मंजुरी देण्याचा विषय ठेवण्यात आला होता, मात्र काही कारणास्तव ही निविदा मंजूर करण्यात आली नाही.
आचारसंहिता संपल्याने येत्या स्थायी समिती बैठकीत दराला मंजुरी देण्यासाठी निविदा ठेवण्यात येईल. 3 नोव्हेंबरपर्यंत महापालिकेचे श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू होण्याची शक्यता अधिकार्यांनी व्यक्त केली.