एक ठार, पाच जण जखमी
खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील खोपोली बायपासजवळ ढेकू गावाच्या हद्दीत एका ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने पुढे जाणार्या सहा कारना धडक दिल्याची घटना सोमवारी (दि. 22) रात्री घडली. या अपघातात एकाचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले आहेत.
पुणे येथून मुंबईमार्गे राजस्थानकडे जाणार्या एका कंटेनर (आरजे 19-जीएच 4497)चा सोमवारी रात्री 11च्या सुमारास एक्स्प्रेस वेवर ढेकू येथील तीव्र उतारावर ब्रेक फेल झाला. या अनियंत्रित कंटेनरची इको कार (एमएच 03-डीए 8233) क्रेटा कार (एमएच 43-बीएन 911), टाटा जेस्ट कार (एमएच 14-ईयू 3521), हुंडाई कार (एमएच 47-के 611) किया कार (एमएच 03-ईबी 9777) आणि स्विफ्ट कार (एमएच 02-बीएच 9022) यांना धडक बसली.
या अपघातात अनेक प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या. यातील सुभाष पंढरीनाथ चौगुले (वय 45, रा. वाशी) यांचा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला, तर चंद्रकला सुभाष चौगुले (43, वाशी), अमित कुमार हरिराम तठेर (30, भांडूप), कौसर अलि शाह (40, भांडूप), आफताब समीउल्ला आलम (19, भांडूप), अफसर अली मोहम्मद (36, वडाळा, मुंबई) जखमी झाले आहेत.
अपघात घडताच आयआरबी यंत्रणा, महामार्ग व स्थानिक पोलीस यंत्रणा, अपघातग्रस्त मदत टीम घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात रवाना करण्यात आले, तसेच अपघातातील वाहने युद्धपातळीवर बाजूला करण्यात आली.
अपघातानंतर कंटेनरचालक पळून गेला, तर क्लिनरला महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक योगेश भोसले व टीमने त्याचा पाठलाग करून कंटेनरसह खोपोली पोलीस ठाण्यात आणले. या घटनेबाबत खोपोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.