अलिबाग ः प्रतिनिधी
रोजगार हमी योजनेत रायगड जिल्ह्याला देण्यात आलेले मनुष्य दिवस रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट 90 टक्क्यांपर्यंत पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले. यंदा दोन लाख 38 हजार 993 मनुष्य दिवस रोजगारनिर्मिती करण्यात आली. फळबाग लागवड योजनेसह अन्य योजनाही ‘रोहयो’त जोडल्यामुळे रायगडात ‘रोहयो’ला चांगला प्रतिसाद लाभला आहे.
जिल्ह्यात ‘रोहयो’ अंतर्गत 2018-19 साठी जिल्ह्याला दोन लाख 47 हजार मनुष्य दिवस रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या तुलनेत यावर्षी दोन लाख 38 हजार 993 मनुष्य दिवस रोजगारनिर्मिती करण्यात प्रशासनाला यश आले. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या 90 टक्के आहे. जिल्ह्यात 13 हजार 265 मजुरांनी रोजगाराची मागणी केली होती. त्यापैकी 12 हजार 656 मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.
औद्योगिकीकरणामुळे रायगडात मजुरांना कामाच्या चांगल्या संधी उपलब्ध असतात. अकुशल कामकारांनाही 400-500 रुपये मजुरी उपलब्ध होते. याउलट जिल्ह्यात ‘रोहयो’तून मजुरांना दिवसाला 200 ते 250 रुपये एवढीच मजुरी मिळते. त्यामुळे रायगडात ‘रोहयो’बाबतची कामे करण्यासाठी मजूर मिळत नव्हते. परिणामी त्यासाठीचा निधी तसाच पडून राहत होता.
‘रोहयो’ला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद पाहता घरकुल योजना, सिंचन विहीर योजना, गाळ काढणे अशी कामे ‘रोहयो’शी जोडण्यात आली. रोपवाटिकांची कामेही करण्याचा निर्णय घेतला. अल्पावधीतच याचे
सकारात्मक परिणाम कोकणात दिसू लागले. शोषखड्डे, शेती खाचर, संरक्षक बंधारे, जलसंधारण यांसारखी कामे रोजगार हमी योजनेतून घेण्यात आली. त्यामुळे एकंदर चित्र बदलताना दिसत आहे.
-शेतकर्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड मोहीम राबवण्यात आली. याअंतर्गत आंबा, काजू, नारळ, चिकू आणि बांबू लागवड करण्यात आली. याचाही सकारात्मक परिणाम रोजगार हमी योजनेत दिसू लागला. जिल्ह्यात रोजगार हमी योजनांना चांगला प्रतिसाद लाभण्यास सुरुवात झाली आहे. फळबाग लागवड योजना, घरकुल योजना, शोषखड्डे, अंतर्गत रस्ते यांसारखी कामे योजनेत समाविष्ट झाल्याने रोजगार हमी योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-लता गुरव, नायब तहसीलदार,
रोजगार हमी योजना