मुरूड : प्रतिनिधी
अतिवृष्टीमध्ये मुरूड-मुंबई रस्त्यावरील विहूर पुलाजवळ मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे या पुलावरून एकेरी वाहतूक सुरु आहे. सततच्या पावसामुळे येथील खड्डा मोठा होत आहे, मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत आहे. प्रवासी मात्र येथून जीव मुठीत धरून प्रवास करताना दिसत आहेत. मुरूड येथून मुंबईकडे जाणार्या महत्त्वाच्या मार्गावर विहूर गावानजीक पुल आहे. जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे या पुलाच्या संरक्षक भिंतीमधील मातीचा भराव वाहून गेल्याने मोठा खड्डा तयार झाला आहे. त्यावेळी तातडीने पुलाची डागडुगी करून सदरचा भराव पूर्वस्थितीत आणला गेला होता. मात्र 8 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीत त्याच जागेतील माती वाहून गेल्याने पुर्वीपेक्षा मोठा खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे विहूर पुलावरून सध्या एकेरी वाहतूक सुरु आहे. या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे हा खड्डा अधिक मोठा होत चालला आहे. दरम्यान, भाजप जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी विहूर पुलाचे मजबुतीकरण करण्याची मागणी केली होती. मात्र बांधकाम खाते त्याकडे लक्ष देत नसल्याने पुलाचा धोका वाढत आहे.
मुरूड परिसरात सतत पाऊस पडत असल्याने रस्त्याची कामे करताना समस्या निर्माण होत आहेत. पावसाने विश्रांती घेताच विहूर पुलानजीक पडलेला खड्डा तातडीने बुजविण्यात येईल.
-एस. गणगणे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुरूड