Breaking News

…तर नुकसानभरपाई देणार

कोव्हॅक्सिन साईड इफेक्टबाबत भारत बायोटेकची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

जगातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरणाला भारतात आजपासून सुरुवात झाली. भारतात या लसीकरणासाठी सीरमच्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आजच्या लसीकरणादरम्यान काही केंद्रांवर कोव्हॅक्सिनच्या लशीला विरोध झाल्याचे दिसून आले. यापार्श्वभूमीवर कोव्हॅक्सिन लस निर्मिती कंपनी भारत बायोटेकने घोषणा केली की, या लसीचे जर काही साईड इफेक्ट्स जाणवले तर कंपनी याची नुकसान भरपाई देईन. कोव्हॅक्सिनला भारत सरकारकडून 55 लाख डोसची ऑर्डर मिळाली आहे.

कंपनीने एका पत्राद्वारे ही घोषणा करताना म्हटले की, कोणत्याही प्रतिकूल किंवा गंभीर प्रतिकूल घटनेदरम्यान सरकारच्यावतीने अधिकृत केंद्र आणि रुग्णालयांमध्ये चिकित्सिक स्वरुपात मान्यता प्राप्त मानकांनुसार, उपचारांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. जर लसीमुळे साईड इफेक्ट झाला तर कंपनीकडून याची भरपाई देण्यात येईल.

पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील ट्रायलमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनने कोविड-19 लसीविरोधात एंटीडोट उत्पन्न करण्याची क्षमता दाखवून दिली आहे. दरम्यान, कोव्हॅक्सिनच्या प्रभावीपणाची निश्चितता होणे अजून बाकी आहे. कारण, या लसीची तिसर्‍या टप्प्यातील ट्रायल अजूनही सुरू आहे.

दरम्यान, लसीकरणादरम्यानच्या फॉर्ममध्ये म्हटले आहे की, लस घेतली म्हणजे कोविड-19 पासून बचावासाठी निश्चित करण्यात आलेल्या नियमांचेपालन करणे बंद केले जाईल, असे कोणी समजून नये. याचबरोबर लस घेतलेल्यांना एक फॅक्टशीट आणि एक फॉर्म देण्यात आला आहे. ज्याला लसीमुळे साईड इफेक्ट झाला आहे त्याने सात दिवसांच्या आत हा फॉर्म भरुन देणे आवश्यक आहे.

डोस घेतल्यावर ताप, डोकेदुखी जाणवली तर घाबरू नका…

सरकारने जाहीर केलेल्या दिशानिर्देशांनुसार, एखाद्या व्यक्तीला लस घेतल्यानंतर हलका ताप, डोकेदुखी किंवा अंगदुखी जाणवू शकते. पण अशावेळी घाबरून न जाता नागरिकांनी काय करावं, हेदेखील जाहीर करण्यात आले आहे. साधारणत: कोणतीही लस घेतल्यानंतर अशी लक्षणे जाणवू शकतात. परंतु, यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, असं आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलंय. कंपनीकडून जाहीर करण्यात आलेल्या फॅक्टशीटनुसार, 10 टक्के लोकांना असा त्रास जाणवू शकतो. लशीचा डोस घेतल्यानंतर पहिला अर्धा तास सेंटरवरच राहावे लागेल. लसीकरणानंतर कोणत्याही पद्धतीच्या साईड इफेक्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगळे सेंटर बनवण्यात आले आहे. सरकारच्या प्रोटोकॉलनुसार इथे आवश्यक ते उपचार दिले जातील. मदतीसाठी लाभार्थी 18001200124 या क्रमांकावर 247 संपर्क साधू शकतात.

Check Also

भाजपच्या दणक्याने रूबी मिल्स कंपनी व्यवस्थापन नरमले

15 दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांना पत्र खोपोली, चौक : प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील …

Leave a Reply