Breaking News

अखेरच्या टप्प्यात 60.21 टक्के मतदान ; बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी काल झालेल्या मतदान प्रक्रियेत सायंकाळी सहा वाजेपर्यंत 60.21 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. या वेळी 7.27 कोटी नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 3.47 कोटी महिला तसेच तीन हजार 377 तृतीयपंथीयांनीही मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार बिहारमध्ये 49.92 टक्के, तर हिमाचल प्रदेश (66.18 टक्के), मध्य प्रदेश (69.38 टक्के), पंजाब (58.81 टक्के), उत्तर प्रदेश (54.37 टक्के), पश्चिम बंगाल (73.05 टक्के), झारखंड (70.5 टक्के) आणि छत्तीसगडमध्ये 63.57 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. काही किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. अखेरच्या टप्प्यात 918 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापूर्वीच्या सहा टप्प्यांत सरासरी 66.88 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशीदेखील पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळल्याचे दिसून आले. बंगालच्या भाटपाडा मतदारसंघात काल मतदान प्रक्रिया सुरू होण्याअगोदरच हिंसा भडकली. या ठिकाणी काही गाड्यांना आग लावण्यात आली, तसेच गोळीबार व बॉम्बही फेकण्यात आल्याची घटना घडली.भाजप सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी बंगाल पोलिसांसह तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हिंसाचार घडवल्याचा आरोप केला आहे. बारासात लोकसभा मतदारसंघातील कदम्पुकुर भागातही हिंसाचाराची घटना घडली. या प्रकरणी टीएमसीचे उमेदवार सुभाष बोस यांना ताब्यात घेण्यात आले. बंगालमध्ये पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यातील मतदानापर्यंत टीएमसी व भाजप कार्यकर्त्यांत मोठा वाद पाहायला मिळाला. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बंगालमध्ये नऊ जागांसाठी मतदान पार पडले. कोलकाता उत्तर, कोलकाता दक्षिण, दमदम, बारासात, बशीरहाट, जादवपूर, डायमंड हार्बर, जयनगर (एससी) व मथुरापूर (एससी) या लोकसभा मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे. हिंसाचाराच्या घटना पाहता येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

– पंतप्रधान नरेंद्र मोदींची अशीही चाहती

नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने प्रेरित होऊन एक महिला युरोपमधून थेट उत्तर प्रदेशातील महू या ठिकाणी पोहचली. महूच्या घोसी लोकसभा जागेसाठी प्रिया नावाची महिला युरोपातून मतदान करण्यासाठी आली. मतदानानंतर तिने माध्यमांशी साधलेल्या संवादात मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मी भारतात आल्याचे सांगितले.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply