Breaking News

महायुती 45 जागा जिंकणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा दावा

मुंबई ः प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या देशाचे लक्ष निकालांकडे लागून राहिले आहे. यंदाच्या निवडणुकीत बाजी मारून केंद्रात कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता जनतेला आहे. त्यातच विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवलेले अंदाज एनडीएसाठी विशेषत: भारतीय जनता पार्टीसाठी सुखावणारे आहेत. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युती 45 जागा जिंकेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.

पत्रकारांशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, देशातील आणि राज्यातील मतदारांनी मोदींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवला त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो. एक्झिट पोलच्या माध्यमातून जी काही आकडेवारी येत आहे त्यावरून भाजप बहुमतात येणार आणि 300चा आकडा पार करणार असा विश्वास आहे. देशातील जनतेने विरोधकांना नाकारले आहे हे सिद्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच महाराष्ट्रात शिवसेना-भाजप महायुतीला 45 जागा मिळतील. काँग्रेस-राष्ट्रवादीला दोन आकडी संख्याही पार करता येणार नाही. जे चित्र लोकसभा निवडणुकीत दिसले तेच विधानसभा निवडणुकीतही दिसेल. निवडणुकीत मोठा भाऊ अथवा छोटा भाऊ असे काही नाही. शिवसेना-भाजप महायुतीमुळे 48 मतदारसंघांत मोदीच उभे आहेत असे समजून मतदारांनी मतदान केले आहे. आमची मने मिळाली आहेत आणि हेच विधानसभेत पुन्हा दिसेल, असा दावाही रावसाहेब दानवे यांनी केला.

दरम्यान, उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीमुळे मतांमध्ये फूट पडेल, पण जास्त परिणाम होणार नाही. एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून देशातील जनतेचा कौल मोदींनाच दिसत असल्याचेही रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply