अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच भविष्यात टंचाई जाणवू नये, यासाठी प्रत्येक तालुक्यात किमान 50 गावतलावांचा गाळ काढावा. प्रत्येक तालुक्यात प्री-वॉटर कप स्पर्धा आयोजित करावी, या करीता प्रत्येक तालुक्यांतील 5 गावे निवडावी, असे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
प्रत्येक तालुक्यात किमान 50 गावतलावांचा गाळ काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून विहिरीतील गाळ काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे व कामे तातडीने सुरु करावीत. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानमध्ये समाविष्ट गावांत अधिकाधिक कामे सुरु करावी. या करीता ग्रामस्थांना श्रमदानासाठी प्रवृत्त करावे व या वेळी त्या तालुक्यातील अधिकार्यांनीदेखील श्रमदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
प्रत्येक तालुक्यात प्री – वॉटर कप स्पर्धा आयोजित करावी. या गावांत वनराई बंधारे, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, सीसीटी यांची कामे करावीत. त्याचप्रमाणे मनरेगातून जास्तीत जास्त कामे घेऊन शेतकर्यांना लाभ होईल, असे पाहण्याचे निर्देश डॉ. सुर्यवंशी यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात पाणीटंचाई असलेली गावे व ग्रामपंचायतीमध्ये विशेष लक्ष देण्याच्या सूचना देऊन टँकर चालू असलेल्या गावांत बोअरवेलची कामे आठ दिवसांत पूर्ण करुन तात्काळ हातपंप बसवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. ज्या गावांना, वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे, अशा ठिकाणी टँकर वेळेवर व नियमीत पोहोचतो की नाही व आवश्यक तेवढे पाणी घेऊन जातो की नाही याबाबतची खबरदारी घेण्याचे यंत्रणांना सांगण्यात आले आहे.
गवंड रस्त्यांसाठी निधीची तरतूद
शेतकर्याला शेतावर तसेच नदी अथवा विहिरीवर जाण्याकरीता आवश्यक असलेला शेतरस्ता, गवंड रस्ता तयार करण्याचे काम पालकमंत्री शेतरस्ता अभियान अंतर्गत करण्यात येत असून, या करीता शासनाने निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गवंड रस्ते तयार करण्याचे काम लवकरच सुरू होईल, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत मागील वर्षी रायगड जिल्ह्यात धरण, तलाव, नदीनाले यामधून एकूण तीन लाख 39 हजार 807 घनमिटर गाळ काढण्यात आला आहे. या वर्षीदेखील जास्तीत जास्त धरणांचा व तलावांचा गाळ काढण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलली असून, त्यासाठी लोकांचे सहकार्य घेतले जात आहे.
-डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड