नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्रीय एव्हिएशन विभागाकडे पाठविला होता. त्या विभागाकडून हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी (दि. 8) वाशी येथे दिली. ते लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत बोलत होते. त्यामुळे विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यासाठी एक पाऊल पुढे पडले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासंबंधीचा ठराव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला होता. शासकीय प्रकियेनुसार राज्य शासनाला याबाबतचा ठराव मंजूर करून तो केंद्र शासनाकडे पाठवावा लागतो. त्यानुसार कॅबिनेटमध्ये ठराव मंजूर झाला, मात्र हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला नसल्याची चर्चा होती. याबाबत कृती समितीने सातत्याने बैठका घेत राज्य शासनाकडे पत्रव्यवहार सुरू ठेवला. त्यास यश आले असून हा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठवला आहे.
वाशीत झालेल्या बैठकीस कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार राजू पाटील, माजी खासदार संजीव नाईक तसेच दशरथ भगत यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि विविध सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यापुढे केंद्र शासनाकडे कशा पद्धतीने पाठपुरावा करायचा याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली.
Check Also
उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …