Breaking News

माडभुवनवाडीचे लवकरच पुनर्वसन करणार

आमदार महेश बालदी यांचे ग्रामस्थांना आश्वासन
प्रक्रिया जलद राबविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई माडभुवन या आदिवासी ठाकूर वस्तीलाही इर्शाळवाडीप्रमाणे दरडींचा धोका निर्माण झाला. त्यामुळे आमदार महेश बालदी यांनी प्रशासनाला सूचना केल्या. त्यानुसार प्रशासनाने तत्काळ दखल घेत माडभुवनवाडीचे स्थलांतर करण्यात आले. यानंतर आमदार महेश बालदी यांनी रविवारी (दि. 30) या आदिवासी बांधवाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले.
सारसई माडभुवनवाडीलगत असलेल्या डोंगराला तडे जात असल्याची बाब येथील ग्रामस्थांनी माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत आणि आमदार महेश बालदी यांच्या निदर्शनास आणून दिली. या वेळी आमदार महेश बालदी यांनी तत्काळ दखल ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे सूचित केले. यानंतर दुसर्‍याच दिवशी माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना घेऊन डोंगरावर चढून नैसर्गिक पडलेल्या भेगांची पाहणी केली. लगेचच जवळच असलेल्या कर्नाळा गार्मेंटचे रिकाम्या इमारतींमध्ये सुव्यवस्था करून सारसई माडभुवन आदिवासीतील सर्व कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले. यानंतर आमदार महेश बालदी यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह या आदिवासी बांधवांना भेट दिली. त्यांच्याशी संवाद साधला. सारसई माडभुवन परिसरातच वैतागवाडी येथे त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे असे वाडीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे, परंतु काही जागा वनखात्याच्या तर काही जागा ह्या सरकारच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे या जागांचा सर्व्हे करून तेथे योग्य सुविधायुक्त पूनर्वसन करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी दिले.
या वेळी ते म्हणाले की, तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी उद्या शासनासोबत चर्चा करणार आहे. तुम्ही निवडेल्या जागा, त्याचा सर्व्हे नंबर इत्यादीबाबत राज्य शासनाकडे या आठवड्यात प्रस्ताव सादर करण्यात येणार येईल. पुनर्वसन होणार्‍या ठिकाणी सरकारने मुलभूत सोई सुविधा द्याव्यात. याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मी हा प्रस्ताव सादर करून तो लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दोन महिन्यांत आपण कागदोपत्री पुर्तता करून ऑक्टोबरमध्ये जर घरांचे काम सुरू झाले तर पुढच्या पावसाळ्याच्या आतमध्ये राहायला जागा देऊ. आमदार महेश बालदींसोबत या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, माजी पंचायत समिती सदस्य तनुजा टेंबे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी कराडे खुर्द माजी सरपंच विजय मुरूकुटे, केळवणे सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत, कराडे खुर्द माजी सरपंच किरण माळी, सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवाजी माळी, आपटा माजी सरपंच दत्ता पाटील, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर भोईर, मनिषा वाघे, संदिप पाटील, केळवणे पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष सुशिल ठाकूर, कर्नाळा माजी सरपंच राजू पाटील, शेखर कानाडे, केळवणे भाजप नेते रवींद्र माळी, ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, दत्ता भोईर, योगेश मुरूकुटे आदी उपस्थित होते.

मदतीचे राजकारण करू नका!
आमदार महेश बालदी यांनी या वेळी मदतीचे राजकारण करणार्‍यांना फटकारले. गंभीर घटना घडलेली असतानाही राजकारण करणारे बॅनर काढून टाका. आता राजकारण नाही, तर या आदिवासींना मदत करण्याची वेळ आहे. ही सर्व मदत शासकीय माध्यमातून होत आहे. 530 कोटी रुपये खाऊन भ्रष्ट पैशातून बनवलेली ही जागा सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे येथील सर्व बॅनर काढा, असे आमदार बालदी या वेळी म्हणाले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply