Breaking News

‘त्याची’ आपली स्वतंत्र ओळख होती…

चित्रपटसृष्टीतील भटकंती, निरीक्षणे, लहान मोठ्या भेटीगाठी आठवणींचा एक मोठा ठेवाच ठरतात आणि अशाच काही आठवणीत मन रमते…
बासू भट्टाचार्य दिग्दर्शित ‘आस्था’ (1997)च्या मुहूर्ताच्या वेळची अशीच एक विशेष आठवण. वांद्य्राच्या कार्टर रोडवरील आपल्या बंगल्यावरच बासुदानी या चित्रपटाच्या मुहूर्ताचे आणि पहिल्या चित्रीकरण सत्राचे आयोजन केले होते. त्या काळात अशा प्रकारचा नवीन चित्रपटाचा मुहूर्त म्हणजे एक प्रकारचा लहान मोठा इव्हेन्टस असे आणि आम्हा सिनेपत्रकारांना आवर्जून बोलावले जाई. ’आस्था’मध्ये ओम पुरी आणि रेखा अशी अगदी वेगळी जोडी असल्याने मुहूर्ताला जाणे अगदी स्वाभाविक होतेच. रेखा म्हणजे बातमी आणि ओम पुरी म्हणजे वेगळेपण अशी ही भन्नाट केमिस्ट्री जमून आली होती. चित्रपटसृष्टीतील वेगळेपणाच्या गोष्टी अशाही असतात. रेखाने या चित्रपटात मध्यमवर्गीय स्त्रीची भूमिका साकारलीय, तर ओम पुरी तिच्या पतीच्या भूमिकेत आहे. कौटुंबिक आर्थिक चणचणीवर मात करण्यासाठी हीच नायिका एक धाडसी पाऊल उचलते आणि एकूणच परिस्थिती पाहता पती तिला समजून घेतो अशा आशयाचे कथानक या चित्रपटात आहे. मुहूर्ताच्या वेळी फारसे अधिक तपशील मिळणे शक्यही नसते आणि सेटवर रेखा असेल तर तिचं एकूणच वागणं, पाहणं, असणं यावर ’फोकस’ ठेवायचा असतो. (फिल्मी मुहूर्ताचा तो माहौल अनुभवायचा असतो, फारसं काही न बोलता).
या मुहूर्ताच्या वेळी बासूदांची नवप्रवाहाची दिग्दर्शन मानसिकता आणि रेखाचे ग्लॅमर अशा विचित्र स्थितीत ओम पुरी सापडल्यासारखा असेल-दिसेल असे वाटले, पण तसे काहीही न होता तो नेहमीप्रमाणे नॉर्मल होता. तो नट वाटत नव्हता. ’स्टार’ असणं तर दूरच. आपण या माध्यमात काम करायला आलो आहोत ते आपल्या पद्धतीने करूयात. दिग्दर्शक आपल्याकडून उत्तम कामगिरी करून घेईलच असा त्याला विश्वास असल्याचे दिसले. हे अनुभवातून येते, पण अनेक प्रकारचे बरे वाईट अनुभवणे अंगिकारणे हे स्वभावातही असावे लागते. मुहूर्त दृश्यानंतर ओम पुरीच्या औपचारिक भेटीची संधी मिळाली आणि मी तेच बोलून दाखवताच तो सूचक हसला. त्यात काय ते उत्तर मिळाले. फार न बोलताही बरेच काही सांगणे हेही परिपक्वतेचेच एक लक्षण असते. ओम पुरीत ते मला दिसले.
अशा ओम पुरीच्या यशस्वी कारकिर्दीतील सर्वांत लक्षणीय गोष्ट कोणती? हिंदी चित्रपटसृष्टीत स्टार होण्यासाठी चिकना चुपडाच चेहरा हवा असे अजिबात नव्हे, तर व्यक्तिरेखेचा चेहरा महत्त्वाचा आहे. आपलं मूळ व्यक्तिमत्व कसेही असो, कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिरेखेशी आपण एकरूप व्हायला हवे. विशिष्ट चेहरा नसणे हेदेखील एक वैशिष्ट्य आहे आणि सत्तरच्या दशकातील नमस्कार समांतर चित्रपट अथवा नवप्रवाहातील चित्रपटांचे ते एक देणे आहे. कालांतराने म्हणजे या शतकाच्या या दशकात ते व्यावसायिक चित्रपटातही दिसतेय.
नसिरुद्दीन शहा, अनंत नाग, नवाजुद्दीन सिद्दीकी यांचीही हीच खासियत. त्या गुणांवरच तेही स्टार झाले. त्यांनीही आपला ठसा उमटवला. या सगळ्यांनी आपलं ’दिसणं’ जणू बाजूला ठेवून आपण थीमनुसार व्यक्तीरेखेत ’असणं’ महत्वाचं मानलं. अभिनय क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा घटक.
सत्तरच्या दशकात गिरीश कर्नाड, नसिरुद्दीन शहा, कुलभूषण खरबंदा, सांधु मेहेर यांच्या पठडीत ओम पुरी आला आणि आपला ठसा उमटवत यशस्वी ठरला. 6 जानेवारी 2017 रोजी सकाळी जेव्हा अतिशय अनपेक्षितपणे ओम पुरीच्या निधनाची बातमी आली तेव्हा डोळ्यांसमोर त्याच्या रूपेरी नायिका, गाणी, सुपर हिट्स, अफेअर, गॉसिप्स हे नव्हे तर त्याचे चित्रपट आणि भूमिका आठवल्या. ओम पुरीचा जन्म 18 ऑक्टोबर 1950चा. म्हणजेच त्याला 67 वर्षांचे आयुष्य जगता आले.
हरयाणातील अंबाला येथे जन्मलेल्या ओम पुरीची वाटचाल पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतल्यावर सुरू झाली. सत्तरच्या दशकात पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमधून प्रत्येक बॅचसह अनेक जण हिंदी चित्रपटसृष्टीत आले. जया भादुरी, डॅनी डेन्झोपा, असरानी, विजय अरोरा हे पहिल्याच बॅचचे विद्यार्थी. ओम पुरीने वेगळ्या प्रवाहातील चित्रपटांना प्राधान्य देणे स्वाभाविक होते, कारण त्याच्या अभिनयाची पठडी तशी होती आणि त्यात त्याला मानसिक समाधान मिळत होते. ’घाशीराम कोतवाल’ या मराठी चित्रपटापासून त्याने सुरुवात केली. या चित्रपटाचे विशेष म्हणजे, विजय तेंडुलकर यांच्या याच नावाच्या नाटकावर आधारित हा चित्रपट आहे. ओम पुरी त्या वेळी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेत असताना तेथील काही पदवीधरांनी एकत्र येऊन मुक्त फिल्म को-ऑपरेटीव्ह सोसायटी स्थापन करून या चित्रपटाची निर्मिती केली. ओम पुरीने त्यात घाशीरामची भूमिका साकारली, पण त्याला एकही संवाद नव्हता. त्यानंतर भवनी भवई, सदगती, आक्रोश अशा काही चित्रपटानंतर गोविंद निहलानी दिग्दर्शित ’अर्धसत्य’ (1983)मधील कर्तबगार पोलीस इन्स्पेक्टर अनंत वेलणकरच्या भूमिकेने ओम पुरीला पहिली ओळख मिळाली. श्री. ना. पानवलकर यांच्या ’सूर्या’ या कथेवर आधारित या चित्रपटाची पटकथा विजय तेंडुलकर यांची आहे, तर संवाद वसंत देव यांचे आहेत. या चित्रपटात सत्यवचनी अनंत वेलणकर आणि झोपडपट्टी दादा रामा शेट्टी (सदाशिव अमरापूरकर) असा कडवा संघर्ष होता. रामा शेट्टीला राजकीय पाठबळ आहे. याउलट अनंत वेलणकरला आपल्याच पोलीस खात्यातील गटबाजी, भ्रष्टाचार यांच्याशीही सामना करायचा आहे. अनंत वेलणकरची चारही बाजूंनी झालेली कोंडी, त्याची हतबलता विचित्र आहे. ओम पुरीच्या काही सर्वोत्तम भूमिकेपैकी ही एक आहे.
’अर्धसत्य’ अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण! या चित्रपटाचे प्रथमदर्शनी स्वरूप नवप्रवाहातील चित्रपट, पण प्रदर्शन एकाद्या व्यावसायिक चित्रपटाप्रमाणे झाले (मुंबईत मेन थिएटर नॉव्हेल्टीत दिवसा तीन खेळ याप्रमाणे हा चित्रपट प्रदर्शित झाला. अन्यथा समांतर चित्रपट म्हणजे त्याचे प्रमोशन आणि रिलीज दक्षिण मुंबईत फोकस्ड ठेवून व्हायचे). ’अर्धसत्य’ने समांतर आणि व्यावसायिक चित्रपटातील अंतर कमी केले. याच्या यशाने ओम पुरी व सदाशिव अमरापूरकर या दोघांच्याही नावाला वलय प्राप्त झाले. ते फारच आवश्यक असते आणि नेमक्या याच टप्प्यावर नसिरुद्दीन शहा, स्मिता पाटील, ओम पुरी हेदेखील दोन्ही प्रकारच्या चित्रपटात भूमिका साकारू लागले. समांतर चित्रपटात वास्तववादी व्यक्तिरेखा आणि अभिनय, तसेच अनेक महोत्सवात असे चित्रपट दाखल होतात आणि मानाचे पुरस्कार प्राप्त होतात, तर मसालेदार मनोरंजक चित्रपटात अनेकदा तरी (काही वेळा अपवाद) भडक व्यक्तिरेखा खोट्या अभिनयाने साकाराव्या लागतात, अनेकदा तरी दिग्दर्शकाचे म्हणणेच पटत नाही, पण चांगल्या मानधनासाठी अशा चित्रपटात भूमिका साकारत वाटचाल करावी लागते. ओम पुरीने हे दोन्ही मार्ग स्वीकारले आणि तेच योग्य होते.
कालांतराने म्हणजे या दशकात हिंदी चित्रपट खूपच बदलला, त्यातही ओम पुरीला स्थान मिळाले. याचे कारण म्हणजे एव्हाना ओम पुरीकडे दीर्घानुभव होता. बुद्धिमान अभिनेता अशी त्याची ओळख झाली होती. आणि त्याची हीच खरी मिळकत आहे आणि हे सगळे होत असताना ओम पुरीला ब्रिटिश, अमेरिकेन, पाकिस्तानी चित्रपटातही भूमिका साकारण्याचा योग आल्याने तो आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहचला. ही त्याची वाटचाल विशेष उल्लेखनीय होती. चाकोरीबाहेरील दृष्टिकोन ठेवल्यानेच त्याची ही घोडदौड झाली. अर्थात, आपली गुणवत्ता व क्षमता त्याने योग्यरित्या वापरली. ग्लॅमरच्या मोहात न अडकल्याचा हा सुपरिणाम होता. जगभरातील अनेक भाषांतील चित्रपट पाहणे आणि भरपूर वाचन करणे यावरचा त्याचा फोकस या प्रवासात त्याने कायम ठेवला. त्याची भूमिका असलेल्या समांतर चित्रपटात आक्रोश, अरविंद देसाई की अजब दास्तान, स्पर्श, होली, गोधुली, पार्टी, दिशा, अंधेर नगरी, मंडी, गिध्द, तरंग, देबशिशू, मिर्च मसाला, तसेच भवनी भवाई (हा गुजराती चित्रपट). ओम पुरीने दूरदर्शन निर्मित चित्रपट सत्यजित रे दिग्दर्शित ’सदगती’मध्ये भूमिका साकारलीय. यात डॉ. मोहन आगाशे आणि गीता सिद्धार्थ यांच्याही भूमिका आहेत. यातील काही चित्रपट फक्त बुद्धिवादी प्रेक्षकांपर्यंतच पोहचले. असे असले तरी ओम पुरीचे ’स्कूल’ अर्थात जडणघडण वेगळ्या पठडीतील आहे हे स्पष्ट आहे. अगदी रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्या ’गांधी’ या चित्रपटातही त्याची भूमिका आहे, पण या वेगळ्या प्रवाहातील चित्रपटातच अडकून पडणे म्हणजे आपल्या प्रतिभेला एकाद्याच विश्वात उपयोगात आणणे अथवा फारसा वाव न देणे असेही असतेच. ओम पुरीसारखा कसलेला अभिनेता अशा वेळी अस्वस्थ होतो, खरंतर अशा चित्रपटांचे, त्यातील अभिनयाचे समिक्षक व जाणकार रसिकांकडून भरपूर कौतुक होते, दादही मिळते. जगभरातील अनेक चित्रपट महोत्सवात त्याचे चित्रपट दाखवले गेले. अनेकदा त्यात तोही सहभागी झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील शोभनशिप, पार्टी कल्चर यात तो कधीच दिसला नाही, रमला नाही. ते आपले फिल्ड नाही असेच त्याने मानले. श्याम बेनेगल, गोविंद निहलानी अशा जाणकार दिग्दर्शकांकडे भूमिका साकारताना बरेच काही शिकता येते. अनेक प्रकारचे पुरस्कारही प्राप्त होतात, पण त्यातूनच अधिक चांगल्या कामाची भूक वाढत वाढत जाते. कधी त्यात समांतर चित्रपटात भूमिका साकारायला मिळते, तर कधी व्यावसायिक चित्रपटात आणि अशी दुहेरी वाटचाल एक सातत्याची संधी असते.
ओम पुरीच्या व्यावसायिक चित्रपटांची नावे बरीच घेता येतील. अगदी सुरुवातीला ’राम की गंगा’ अशा चित्रपटात छोटी भूमिका साकारत ओम पुरीने मसालेदार मनोरंजक चित्रपटाकडे वळणे पसंत केले. या चित्रपटाच्या गोरेगावच्या फिल्मीस्तान स्टुडिओतील सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी जाणे झाले होते. कालांतराने दुल्हन हम ले जाऐंगे, प्यार तो होना ही था, मालामाल विकली अशा तद्दन मनोरंजक चित्रपटात भूमिका साकारत या चित्रपटांच्या कार्यशैलीशीही त्याने व्यवस्थित जुळवून घेतल्याचे दिसते. एखाद्या कलाकारामधील अंतर्गत बदल हा अशा पातळीवरही होत जातो. इतका की, नंतरच्या काळातील व्यावसायिक चित्रपटातील त्याच्या अभिनयात खूप सहजता येत गेल्याचे दिसते. मूळ कलाकारात गुणवत्ता असली तरी त्याचा नेमका कुठे आणि कसा वापर करायचा याच्याशी जुळवून घेणे गरजेचे असते. यात महत्त्वाचा असतो तो दिग्दर्शक. त्याला वाटले पाहिजे की, आपल्या चित्रपटात ओम पुरीला स्थान आहे आणि आपण त्याच्यासोबत कन्फर्टपणे काम करू शकतो. सिनेमाच्या जगात एकाद्या कलाकाराचे वागणे खूप महत्त्वाचे तर असतेच. तसेच त्याची पटकन बातमी पसरते, चर्चा होते. ओम पुरी यातही यशस्वी ठरला. त्याने काही बड्या दिग्दर्शकांच्या चित्रपटातून भूमिका साकारल्याचे प्रगती पुस्तक सांगायचे, तर एन. चंद्रा (नरसिंहमधील ओम पुरीचा खलनायकी राजकारणी सूरज नारायण सिंह खूप गाजला), सुभाष घई (किसना), राजकुमार संतोषी (घायल, चायना गेट), राकेश ओमप्रकाश मेहरा (रंग दे बसंती, दिल्ली 6), राजीव रॉय (गुप्त), अनिल शर्मा (गदर एक प्रेमकथा), कमल हसन (चाची 420), मेहुलकुमार (मरते दम तक), जॉनी बक्षी (रावण) वगैरे वगैरे बरेच व्यावसायिक चित्रपटात ओम पुरीने लहान मोठ्या भूमिका साकारल्या. ओम पुरीने भूमिका साकारलेल्या व्यावसायिक चित्रपटांची यादी प्रेमग्रंथ, जोर, चुपके से अशी बरीच आहे. त्या सेटअपमध्ये ओम पुरी फिट बसला हेही महत्त्वाचे आहे. त्यानुसार कलाकाराला मानसिकता घडवावी लागते.
समांतर आणि तद्दन व्यावसायिक यांच्यामधील चित्रपटातही ओम पुरीने भूमिका साकारत आपल्या वाटचालीला एकसुरीपणा येऊ दिला नाही. राजन कोठारी दिग्दर्शित ’पुरुष’ (जयवंत दळवी यांच्या ’पुरुष’ या कादंबरीवर आधारित या हिंदी चित्रपटाच्या दादरच्या ब्रॉडवे मिनी थिएटरमधील प्रेस शोच्या वेळी ओम पुरी आणि अश्विनी भावे हे दोघेही आवर्जून हजर राहिले आणि त्यांनी सिनेमा संपल्यावर आम्हा काही सिनेपत्रकारांशी आवर्जून संवाद साधत या चित्रपटाबाबतची मते जाणून घेतली. ओम पुरीच्या या गुणाचा खास उल्लेख हवाच), प्रकाश झा दिग्दर्शित ’मृत्युदंड’ (यात एकाच वेळेस ओम पुरीने शबाना आझमी, माधुरी दीक्षित आणि शिल्पा शिरोडकर यांच्यासोबत भूमिका साकारली), गोविंद निहलानी दिग्दर्शित ’देव’ (खरंतर ओम पुरी गोविंद निहलानी यांचा फेव्हरेट, पण ’देव’साठी त्यांनी अमिताभ बच्चन आणि ओम पुरी असा अभिनयाचा सामना प्रेक्षकांसमोर आणला. परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओत ’देव’च्या मुहूर्ताला ओम पुरीचा सहज वावर अनुभवायला मिळाला.) विशाल भारव्दाज दिग्दर्शित ’मकबूल’, मणि रत्नम दिग्दर्शित ’युवा’ इत्यादी इत्यादी.
असा बहुगणी अभिनेता भाषेच्या चौकटीत अडकून पडत नाही आणि ज्या भाषेतील चित्रपटात भूमिका साकारतो तेथेही आपला ठसा उमटवतो. याचे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे, ’ए.के. 47’ या कन्नड चित्रपटातील त्याची भूमिका हे आहे आणि असा अष्टपैलू अभिनेता माध्यमाच्या चौकटीत अडकून कसा पडेल? दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावरही त्याने मोठा प्रभाव दाखवला. भारत एक खोज, काकाजी कहीं, मिस्टर योगी यातून त्याने आपल्या अभिनयाची व्याप्ती स्पष्ट केली. हे एक प्रकारचे झपाटलेपण असते, कामाची सवय असते आणि माध्यमाची मर्यादा नकोशी वाटू लागते.
ओम पुरी हा अभ्यासू आणि चिंतनशील अभिनेता असा विविध पठडीतील दिग्दर्शकांच्या चित्रपटातून अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत तर पोहचलाच तसेच तेवढ्याच प्रमाणात त्याला अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली.
चिकना चुपडा चेहरा असण्यापेक्षा अभिनय क्षमता असणे आणि शांतपणे करियर मार्गी लावणे महत्वाचे असते हे ओम पुरीच्या या गुणांवरुन अधोरेखित होत आहे. त्याच्या पत्नीने नंदिता पुरीने ’अनलीली हीरो-द स्टोरी ऑफ ओम पुरी’ या पुस्तकात या सगळ्यावर फोकस टाकताना ठळकपणे जाणवते ते हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुरंगी संस्कृतीत ओम पुरी मूळात जसा आपल्या कामाशी बांधिलकी ठेवून होता तसाच कायम राहिला. संघर्षाच्या दिवसांत त्याला दिलेल्या चटक्यांमुळेच तसे झाले असावे आणि त्यात खाजगी आयुष्यातील चढउतारांची भर पडली असावी. आपल्या शैली व क्षमतेनुसार त्याने अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला हे नक्की. तेच तर महत्त्वाचे असते. ओम पुरीच्या जन्मशताब्दीनिमित्त हा फोकस.

– दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री आदिती तटकरे

माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन विधानसभा …

Leave a Reply