पनवेल : प्रतिनिधी
कष्टकरी नगर येथील कामगार वस्तीमध्ये गरजू अपंग, विधवा, वयोवृद्ध तसेच इतर नागरिकांना रेशनिंग किटचे वाटप पनवेलच्या गुंज आणि स्पर्श फाऊंडेशनच्या मार्फत गुरुवारी (दि. 13) करण्यात आले. विविध सामाजिक, आदिवासी, शैक्षणिक हक्क, महिला सक्षमीकरण, तंबाखू नियंत्रण कायदा, नाका कामगार तसेच घरेलू कामगार, बाल हक्क, आदी विषयावर काम करण्यासाठी सचिन दाभाडे यांनी स्पर्श फाऊंडेशनची स्थापना 2021 जानेवारीला केली. कोरोनामुळे नाका कामगार, घरेलू कामगार आणि आदिवासींची रोजगार नसल्याने उपासमार होत आहे. त्यामुळे गुंज आणि स्पर्श फाऊंडेशन, पनवेल यांच्यामार्फत कष्टकरी नगर येथील कामगार वस्तीमध्ये गरजू अपंग, विधवा, वयोवृद्ध तसेच इतर नागरिकांना 150 रेशनिंग किटचे वाटप करण्यात आले. या वेळी स्पर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन दाभाडे, जीवन पोटफोडे, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ गायकवाड इतर उपस्थित होते. गुंज संस्थेचे समन्वयक राहुल, किशोर बनकर यांनी ही मोलाचे सहकार्य केले. सामान वाटप करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून राहुल, प्रमोद, नंदू यांनी सहकार्य केले. भविष्यात विविध समस्यांवर संस्था काम करणार असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष दाभाडे यांनी सांगितले.