Breaking News

कर्नाळा बँकेचे चेअरमन विवेक पाटलांनी फसवणूक केली

महाड : प्रतिनिधी

आर्थिक संकटात सापडलेल्या कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांनी बुधवारी (दि. 13) बँकेच्या महाड शाखेत जाऊन अधिकार्‍यांना घेराव घातला आणि आपल्या ठेवी परत देण्याची मागणी केली. जर ठेवी परत दिल्या नाहीत, तर सर्व ग्राहकांना एकत्र करून बँकेविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. ‘आम्ही बँकेच्या सप्टेंबरमधील वार्षिक सभेसाठी गेलो होतो. बँकेचे चेअरमन विवेक पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून वेळप्रसंगी माझी स्वतःची प्रॉपर्टी विकून मी ठेवीदारांचे पैसे देईन, असे वचन दिले होते. नंतर मात्र त्यांनी हात वर करून आम्हा ठेवीदारांना वार्‍यावर सोडले. ही आमची फसवणूक आहे,’ अशा शब्दांत या बँकेचे ठेवीदार असलेले संजय परांजपे यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

कर्नाळा सहकारी बँकेच्या महाड शाखेतील आर्थिक व्यवहार गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प झाले आहेत. या शाखेत सुमारे 30 कोटी रुपयांच्या ठेवी असून, मुदत संपलेल्या ठेवींचीही रक्कम परत मिळू शकलेली नाही. बँकेचे चेअरमन विवेक पाटील यांनी बँकेची मालमत्ता

विकून ठेवी परत करण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारली होती, मात्र आता तुम्हाला काय करायचे ते करा, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे संयम सुटलेल्या महाडमधील व्यापार्‍यांनी बुधवारी बँकेच्या शाखेत जाऊन अधिकार्‍यांना जाब विचारला.

कर्नाळा बँकेचा व्यवहार हा शाखा स्थापनेपासूनच संशयास्पद होता. या बँकेने व्यापार्‍यांना अवास्तव सुविधा आणि प्रलोभने देऊन आकृष्ट केले. आठ दिवसांत याबाबत ठोस निर्णय न झाल्यास बँकेचे महाडमधील ठेवीदार आणि ग्राहक आंदोलन छेडतील, असा कडक इशारा उपस्थित ठेवीदारांनी या वेळी दिला. (पान 2 वर..)

ठेवीदारांचा आक्रमक पवित्रा पाहून बँकेच्या अधिकार्‍यांनी जसजशी वसुली होईल, तसतशा ग्राहकांना रक्कम परत करण्यात येईल असे उत्तर देऊन वेळ मारून नेली. मेडिकल इमरजन्सी असल्यास त्या ग्राहकाला ठेव परत देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांनाही ठेवी परत मिळत नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला. या वेळेस संजय परांजपे, पप्पूशेठ मुंदडा, बाळू दोशी, डॉ. राजन तलाठी यांच्यासह बँकेचे शेकडो ग्राहक उपस्थित होते.

ठेवीदार लढा देणार

कर्नाळा बँकेने ठेवींचे विम्याचे 0.7 टक्के पैसेच भरलेले नाहीत, तसेच जोपर्यंत बॅक लिक्विडीशनमध्ये जात नाही तोपर्यंत ठेवींच्या विम्याचे पैसे मिळणार नाहीत. महाडमधील 2200 ग्राहकांमध्ये करंट अकाऊंटच्या फॅसेलिटी आणि जास्तीचे व्याज दिल्यामुळे व्यापार्‍यांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर छोटेे व्यावसायिक, निवृत्त व्यक्ती आणि सर्वसामान्यांचेही पैसे या बँकेमुळे आज तरी डुबले आहेत. यापुढे आम्ही पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचा लढा देणारे नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुढील लढा देणार आहोत. लवकरच आम्ही कमिटी स्थापन करून सहकार आयुक्त, रिझर्व बँक आणि न्यायालय या तीन पातळीवर लढाई लढणार आहोत, असे ठेवीदार संजय परांजपे यांनी बोलताना सांगितले.

Check Also

पनवेलमध्ये शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली …

Leave a Reply