Breaking News

विवेकदीप उजळी

दिवाळीच्या निमित्ताने शहरे आणि महानगरांमधील व्यापारपेठा, मॉल लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले आहेत. दिवाळीची मौजमजा करताना आपण हेदेखील लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या वस्तीमध्ये दिव्यांचा लखलखाट असला तरी काही वस्त्या-पाड्यांवरील झोपड्यांमध्ये अजूनही अंधार बाकी आहे. आपल्या दारापाशी लागलेल्या आकाशकंदिलाचा उजेड तिथपर्यंत पोहचायला हवा.

दारासमोरची एक इवलीशी पणती काळोखाला रोखून धरते, तिच्या उजेडाच्या मर्यादित परिघात काळोखाला प्रवेश नाही. अशा इवल्या-इवल्या पणत्या लाखोंच्या संख्येने जेव्हा तेवू लागतात, तोच आपला दीपोत्सव. यंदाच्या दिवाळीची नांदी गुरुवारच्या वसुबारसेला गोधनाची पूजा करून झाली. शहरांमध्ये गोधनाची पूजा कशी करणार? शहरी नागरिकांची दिवाळी खर्‍या अर्थाने नरकचतुर्दशीच्या दिवशीच सुरू होते. पहिल्या आंघोळीच्या वेळी सुगंधी उटणे, सुवासिक तेल यांच्या मर्जनानंतर मोती साबणाचा गंध दरवळू लागला की मनाची खूणगाठ पटते ती दिवाळी खरोखर आपल्या घरी आली. पूर्वीच्या काळी दिवाळीच्या दिवसांत चांगलीच थंडी पडत असे. इतकी की डोक्यावर लावलेले तेल थिजून जात असे. गेल्या काही वर्षांत ही थंडी कुठे पळून गेली कोण जाणे! पहाटेच्या अंधारात अभ्यंग स्नान उरकून नवे कोरे कपडे घालून बाहेर फेरफटका मारण्याची परंपरा होती. आजही थोड्याफार प्रमाणात ही परंपरा कायम आहे. नव्या कोर्‍या कपड्यांचा तो वास फक्त दिवाळीच्या दिवसांतच हवाहवासा वाटतो. खिडकी किंवा सज्जात शानदार आकाशकंदिल दीपावलीचे स्वागत करताना दिसतो. ही लक्ष लक्ष दिव्यांची उधळण मनाला अननुभूत अशी शांतता देते. दीपावलीच्या सणाचे प्रयोजनच ते आहे. कृषी संस्कृतीतून आलेला हा महत्त्वाचा हिंदू सण. शेतीप्रधान देशातील बहुतेक सारेच सण कृषी संस्कृतीतूनच आलेले आहेत. दोन शेती हंगामांच्या बरोबर मधोमध दीपावलीचे आगमन होते. पीकपाणी मायंदाळ आल्यानंतर शेतकर्‍याच्या खिशात थोडीफार ऊब येते. या समृद्धीमुळे जिवाला थोडाफार तरी दिलासा मिळतो. दिवाळीच्या दिवसात लक्ष्मीपूजन सर्वाधिक उत्साहाने केले जाते. कारण शेतकर्‍याला सुगीचे दिवस आलेले असतात आणि व्यापारीवर्गाला लक्ष्मीच्या पाऊलखुणा दिसू लागलेल्या असतात. शहरी नोकरदारांच्या खिशात बोनसच्या रूपाने थोडाफार आधार वाटू लागलेला असतो. एकंदर वातावरण सकारात्मक असते. या सकारात्मकतेचा उत्सव म्हणजे दीपावली!
मी अविवेकाची काजळी। फेडूनि विवेकदीप उजळी। तै योगिया पाहे दिवाळी। निरंतर॥
श्रीज्ञानेश्वर माऊलीने ‘भावार्थदीपिके’च्या माध्यमातून शब्दफुलांची दिवाळी अशी साजरी केली. विश्वातील अविवेकाची काजळी झटकून टाकण्याचा ज्ञानेश्वर माऊलीचा इरादा आजही वंदनीय आणि तितकाच महत्त्वाचा आहे. ‘आओ फिरसे दिया जलाएं, बुझी हुई बाती सुलगाये’ असे आदरणीय स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या एका कवितेत म्हटले होते. त्यांनादेखील ज्ञानेश्वर माऊलींसारखेच काहीसे म्हणायचे होते. दिवाळीचा सण हा मनोमिलनाचा असतो. लोक एकमेकांकडे जातात, त्यांना शुभेच्छा देतात. जगण्याच्या धकाधकीत वर्षभरात मनामध्ये बरेच मळभ साचलेले असते. दिवाळीच्या निमित्ताने ते दूर होते. मनातील वेडेवाकडे विचार, मालिन्य, अग्निबाणाच्या फटाक्याप्रमाणे दूरवर आभाळात भिरकावून द्या असाच संदेश दीपावली आपल्याला देत असते. मनावरील ताणतणावांची जळमटे या दिवसांत दूर होतात. हिंदी भाषेत दिव्याला ‘दिया’ असे म्हणतात तसेच ‘दिले’ या अर्थाचे क्रियापद म्हणूनदेखील हाच शब्द वापरला जातो. आपल्याकडील शुभेच्छांची ओंजळ दुसर्‍याला देण्याची संधी दिवाळीच्या सणातच मिळते.

Check Also

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री आदिती तटकरे

माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन विधानसभा …

Leave a Reply