Breaking News

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती!

राज्य सरकारचा शेतकर्‍यांना दिलासा

मुंबई : प्रतिनिधी
शिंदे-फडणवीस सरकारने शेतकर्‍यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करून शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय बुधवारी (दि. 5) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकर्‍यांना मदत देण्यात येईल.
अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये 24 तासांत 65 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात. शेतीपिकांचे नुकसान 33 टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकर्‍यांना मदत देण्यात येते, मात्र महसूली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसतानाही मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होऊ शकते तसेच काही गावांमध्ये सलग काही दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळेदेखील शेतीपिकांचे नुकसान होऊ शकते. अशा वेळी शेतकर्‍यांना मदत देणे आवश्यक आहे. ती आता दिली जाणार आहे. त्यानुसार सलग पाच दिवसांच्या कालावधीत प्रत्येक दिवशी किमान 10 मिमी पाऊस झाल्यास आणि त्याच महसूल मंडळात या कालावधीत मागील 10 वर्षाच्या (दुष्काळी वर्ष वगळून) सरासरी पर्जन्यामानच्या तुलनेत 50 टक्के (दीडपट) किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास मदत दिली जाणार आहे. या निर्णयामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची चिंता दूर झाली आहे.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply