Breaking News

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले लक्ष

पनवेल : रामप्रहर वृत्त
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांतून होणार्‍या रासायनिक वायू प्रदूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 20) लक्षवेधी सूचनेद्वारे शासनाचे लक्ष वेधले, तसेच दूषित वायू सोडणार्‍या कारखान्यांवर संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचनेत म्हटले की, पनवेलच्या तळोजा औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांमार्फत रात्री तसेच पहाटेच्या वेळीत सोडण्यात येणार्‍या रासायनिक वायूमुळे पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे, खारघर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून ही बाब सभागृहात वारंवार शासनाच्या निदर्शनास आणूनसुद्धा शासनाच्या दुर्लक्षामुळे संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांकडून ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे अनेक नागरिक आपली घरे सोडून अन्यत्र स्थलांतर होत असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांची या कारखान्यांबरोबर मिलीभगत असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे दूषित वायू सोडणार्‍या कारखान्यांवर तसेच या परिसरातील संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई करण्याची गरज असून याबाबत शासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सूचनेवर दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले की, तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये 405 प्रदूषणकारी उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे उद्योग स्थापन करणे व चालवण्यासाठी ठराविक कालमर्यादेसाठी संमतीपत्र दिले जाते. यामध्ये हवा व जल प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक ती सयंत्रणा उदयोगांकडून बसविण्यात आले आहे की, नाही हे तपासले जाते. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे वेळोवेळी उद्योगांना भेट देऊन यंत्रणा कार्यरत असल्याचे तपासले जाते व तसे न आढळल्यास त्यांच्यावर मंडळातर्फे हवा व जलप्रदुषण कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई केली जाते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास नोव्हेंबर व डिसेंबर-2023मध्ये नागरिकांकडून रात्रीच्या वेळेस वास येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रात्रीच्या वेळी गस्त घातली जाते, तसेच सप्टेंबर ते डिसेंबर 2023 मध्ये सतत वातावरणीय हवा गुणवत्ता तपासणी केंद्र तोंडरे तळोजा व कळंबोली अहवालावरून हवेची गुणवत्ता खराब व अती खराब श्रेणीमध्ये आढळून आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. हिवाळ्यात रात्रीच्यावेळी तापमानात होणारी घट यामुळे उत्सर्जित वायुंचे विसर्जन होण्यास अडथळा निर्माण होत असल्याने नजिकच्या परिसरात रासायनिक वास काहीवेळा जाणवल्याचे या कार्यालयाच्या रात्रीच्या गस्ती दरम्यान निदर्शनास आले आहे. तक्रारीच्या अनुषंगाने डिसेंबर 2023मध्ये सेंट्रलपार्क सेक्टर-21, खारघर येथे मोबाईल एअर मॉनिटरींग व्हॅनद्वारे हवेची गुणवत्ता मोजण्याचे काम 6 डिसेंबरपासून चालू आहे. या अहवालावरून हवेच्या गुणवत्तेमध्ये केमिकल घटकांचे प्रमाण विहित मर्यादेत असल्याचे तसेच हवा गुणवत्ता निर्देशांक हा मध्यम स्वरुपाचे असल्याचे निदर्शनास आले आहे.
राजीव सिन्हा यांनी लोकआयुक्तांच्याकडे 2/05/2022 रोजी हवा प्रदूषणाची तक्रार केली होती. लोकआयुक्तांच्या आदेशान्वये विशेष तपास पथकाची स्थापना करून त्यांनी तळोजा औद्योगीक वसाहत व बाजूच्या परिसरामध्ये हवेची गुणवत्ताची तपासणी केली, तसेच कंपन्याचे स्रोत निरीक्षण केले. याबाबतचा अंतिम अहवाल लोकआयुक्तांकडे सादर केला आहे. अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे तळोजा औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या एकूण 64 उद्योग तसेच महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ, तळोजा विभाग यांना सुधारणा करण्याविषयी निर्देशित केले आहे.
लोकायुक्तांच्या आदेशान्वये तळोजा हवा प्रदूषणाबाबत प्रगती आढावा अहवाल तपासण्यासाठी देखरेख समिती गठीत करण्यात आली. जिल्हाधिकारी, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कार्यकारी अभियंता एमआयडीसी, आयआयटीचे तज्ज्ञ सदस्य, पनवेल महानगरपालिका व सिडकोचे अधिकारी, पोलिस निरीक्षक तळोजा एमआयडीसी व उद्योजक संघटना हे या समितीचे सदस्य असून समितीची प्रथम बैठक डिसेंबर 2023 च्या अंतिम आठवड्यात होणार आहे. खराब वास हा मुख्यत: हिवाळ्यात रात्री व पहाटे जाणवल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. या अनुषंगाने सामाईक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेतून वाघवली खाडीत सोडण्यात येणार्‍या प्रक्रियायुक्त सांडपाण्याच्या विल्हेवाटीची वेळ बदलून ती फक्त भरतीच्या वेळेत सोडण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला सूचित केले आहे. त्यामुळे रोडपाली, कळंबोली व कामोठे या परिसरात वास कमी होण्यास मदत होईल. ब्रोमीन हाताळणी उद्योगांना उत्पादनाची वेळ सकाळी 6 ते संध्याकाळी 6 अशी निश्चित करून संमतीपत्र प्रदान करण्यात आले आहे. फिश मील (खराब माशांवर प्रक्रिया करणारे उद्योग), सॉलवंट डिस्टिलेशन व हाताळणी, औषध निर्मिती उद्योग, किटकनाशक, रासायनिक खते निर्माण करणारे उद्योग यांना हवा प्रदूषणासंदर्भात उपाययोजना करण्याबाबत निर्देशित केले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास फिश प्रोसेसिंग करणार्‍या उदयोगांतून निर्माण होणारे सांडपाण्यावर सम्प-2 परिसरात अन एरोबीक बायोडायजेस्टर उभारण्याबाबत निर्देशित केले आहे. सामायिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेच्या विल्हेवाटीचे ठिकाण हे तीन किमी पुढे वाढवण्याचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने हाती घेतले आहे व काम प्रगतीपथावर असून अशाप्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, तसेच लोकायुक्तांकडे दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरोग्य अधिकारी, पनवेल महानगरपालिका व तसेच वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय यांच्याकडून नजीकच्या रहिवाशांच्या आरोग्यावर झालेल्या परिणामाबाबतचा अहवाल मागविला होता. त्यांच्या अहवालानुसार तळोजा औद्योगिक वसाहतीतून निर्माण होणारे वायू व जल प्रदूषणामुळे सभोवतालच्या परिसरातील रहिवासी संकुल क्षेत्रातील लहान मुले प्रदुषणामुळे मृत होणे, लहान मुलांच्या वाढीवर परिणाम होणे या बाबतची नोंद रुग्णालयातील अहवालानुसार दिसून येत नाही, असे कळविले आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply