Breaking News

हजारोंच्या साक्षीने रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

लहानग्यांपासून ज्येष्ठांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्रातील सुंदर बाग आणि आबालवृद्धांचे आकर्षण असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील रामबाग या उद्यानाचा पहिला वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी (दि.22) हजारो उद्यानप्रेमींच्या साक्षीने मोठ्या दिमाखदारपणे साजरा झाला. नयनरम्य वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, उत्तम नियोजन आणि लहानग्यांपासून ज्येष्ठांच्या उपस्थितीने रामबाग नंदनवनाप्रमाणे फुलले होती. त्यातच वीरभूमी इंटरटेंमेंट (घणसोलीकर) प्रस्तुत 70 कलाकारांचा संच असलेल्या पारंपरिक आगरी-कोळीगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने वातावरणात रंगत आणली. स्वतःच्या संपत्तीतून लोकांच्या सेवेसाठी उभारलेली रामबाग ही वास्तू न्हावे परिसरातील ग्रामस्थांच्या अभिमानाची ठरली आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हृदय सत्कार करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला.
या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, डेल्टाचे नितीन पटेल, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष राजेश्री वावेकर, माजी उपमहापौर सीता पाटील, प्रभाकर बहिरा, विश्वनाथ कोळी, गव्हाणचे उपसरपंच विजय घरत, प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, न्हावे सरपंच विजेंद्र पाटील, उपसरपंच राजेश म्हात्रे, माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, कृष्णाशेठ ठाकूर, अरुण ठाकूर यांच्यासह ठाकूर कुटुंबिय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी उपस्थित होते. श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीचे अध्यक्ष सी.एल. ठाकूर आणि रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर ठाकूर, स्वप्नील ठाकूर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी न्हावे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी भाषणात सांगितले की, माणूस जन्माला येतो, परंतु मृत्यूपश्चात कीर्ती करून जात असतो आणि त्याचे नाव हे इतिहासात अजरामर होत असते. त्याच रूपाने सच्चा सुपुत्र, कामाचे कर्तृत्व असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मनोभावे सेवेच्या माध्यमातून रामबागची निर्मिती झाली आहे. नावात त्यांच्या ’राम’ तसे कर्तृत्वात ’राम’ आहे. त्यांनी ज्ञानदानाचे काम केले आहे. वाशीला माझी शाळा आणि त्या शाळेत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. ते भाग्य आम्हाला मिळाले आणि मी त्यांचे काम कर्तृत्व स्वतः बघितले आहे. त्यांचे कर्तृत्व इतके झाले की, थेट दिल्लीत खासदार म्हणून गेले. काम करण्याचे धाडस लागते, तशी हिंमत लागते आणि तेवढे दातृत्वपण लागते. या ठिकाणी त्यांनी जी सेवा केली आहे त्याबद्दल आम्ही सर्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे ऋणी आहोत. आम्ही अशाच प्रकारचे एक सुंदर मंदिर बनवले होते, पण तांत्रिक अडचणीमुळे सुंदर वास्तूला सर्वच लोकं मुकली. त्यामुळे लोकांसाठी बनवलेली रामबाग ही सुंदर वास्तू अधिक फुलण्यासाठी लोकांनीही प्रयत्नशील राहिले पाहिजे. हा सोहळा यापुढे यापेक्षाही मोठा झाला पाहिजे.
मुंबई जवळ आली आहे. त्यामुळे तेथील लोकं येथे येणार आहेत. आज गुगलवर क्लिक केले तर या रामबाग या ठिकाणी येत असते आणि ही आपल्या सर्वांची, या परिसराची ओळख आहे. असे नमूद करतानाच ग्रामपंचायतीने रामबाग नावाचा ठराव करावा असे सूचित करून या ठिकाणी येण्याकरिता नवी मुंबई महापालिका परिवहन बससेवा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही डॉ.संजीव नाईक यांनी दिली तसेच काम करणार्‍यांवर नेहमी टीका होत असते, पण तुम्ही टिकेला न जुमानता जनतेसाठी सदैव काम करीत राहता हे तुमचे मोठेपण आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हटले की, देवाची कृपेमुळेच या जागेवर आपल्या सर्वांना चालता येत आहे. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव या मंदिराला रस्ता झाला आणि मधल्या कालावधीमध्ये काही डेब्रिज विकणार्‍यांनी या ठिकाणी भराव केला. या ठिकाणी मंदिर परिसरातील उधाणाचे पाणी नियमित नाही, पण पौर्णिमा, अमावस्येच्या वेळी यायचे. देवाने प्रेरणा दिली, म्हणून या ठिकाणी सुंदर मैदान, तलाव, बाग झालेली आहे. माझ्या आयुष्यामध्ये सर्वांत महत्त्वाचे काम शाळा-महाविद्यालयांची निर्मिती, राज्यातील अनेक जिल्ह्यातील शाळांना मदत अशी कामे झाली असली तरीसुद्धा त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे काम जिथे आपला जन्म झाला, आपली जन्मदाती आई जशी असते तशी ही मातृभूमी आहे ती प्यारी आहे आणि तिच्यासाठी काही काम करू शकलो त्याचा मला मोठा आनंद आहे. येथे भेट देणार्‍यांना समाधान आणि त्यांच्या चेहर्‍यावर मनमुराद आनंद दिसतो यात आपल्याही आनंद होतो. टीका करणारे करीत राहतील, पण येथे भेट देणारी सगळी लोकं हे चांगले आहे की वाईट हे सांगतील. सिडकोने या बागेच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करायला पाहिजे होते. या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी लेखी पत्र दिले आहे. ही बाग आमच्याकरिता बनवलेली नाही ही सिडकोच्या नावावर आहे आणि त्यांच्याच नावावर राहणार आहे. सिडकोची इच्छा असेल, तर ही बाग सिडकोने विकसित करावी करावी. ही बाग माझी नाही, माझ्या मालकीचा उल्लेख नाही. रामबाग हे नाव मंदिर कमिटीचे अध्यक्ष सी. एल. ठाकूर यांनी दिलेले आहे. साहजिकच जो काम करतो त्याचे नाव लावले जाते, तशा प्रकारे नाव देण्यात आले, पण बाकी त्याच्यामध्ये एक टक्काही मालकी हक्क नाही आणि ही रामबाग या गावाचे लौकिक वाढवणारी असून भविष्यकाळामध्ये प्रेक्षणीय स्थळ करण्याच्या दृष्टीने या रामबागचे व्यवस्थापन ताब्यात घेऊन अधिक सुंदर करावी. जर सिडको तयार होत नसेल तर न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील यांनी सांगितले आहे की, ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्या, आम्ही बाग सांभाळतो. त्या दृष्टीने एखाद्या सामाजिक संस्थेच्या ताब्यात देऊन ती देखभाल-दुरुस्ती व विकसित करेल. ग्रामपंचायत स्वतः करेल किंवा ती संस्था करून घेईल, पण सिडकोवर बोजा टाकणार नाही. त्या अनुषंगाने ही प्रॉपर्टी न्हावे ग्रामपंचायतीची आहे. ती त्यांच्याच ताब्यात राहील. माझ्याकडे जे काही आहे ते मी सर्व द्यायला तयार आहे. आयुष्याच्या सुरुवातीला काबाडकष्ट करून जीवन जगलो. त्यामुळे मला पैशाची गरज नाही, देवाने भरपूर दिले आहे. तुम्ही लोकं येथे येतात व आनंदित होऊन जाता त्यातच आपले समाधान आहे, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अधोरेखित केले.
माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जे काम केले आहे ते इतिहासात कोरीव असे लिहण्यासारखे आहे. माणूस कितीही मोठा असला तरी मन मोठे असले पाहिजे आणि हे मन मोठे करणारे फक्त एकच या देशात रामशेठ ठाकूर आहेत. त्यांच्यामुळे न्हावेखाडीत रामबागच्या रूपाने कमळ उमलले आणि याचा उपयोग संपूर्ण परिसराला होत आहे. त्यांचे वडील मचव्यावर काम करायचे. माझा आणि त्यांचा परिचय होता. मुंबईला असताना त्यांच्याशी गप्पागोष्टी व्हायच्या. चांगला स्वभाव, चांगले व्यक्तिमत्व आणि बोलण्यात कुठलेही अपशब्द नाही असे ते होते. त्याच्या पोटी हे नररत्न जन्मले. या नररत्नाने फक्त या परिसरालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला सुगंध दिला. रामशेठना मी प्रत्यक्ष जेव्हा बघितले तेव्हा खरा माणुसकीने ओतप्रोत व्यक्तिमत्व अधोरेखित झाले. मुंबई दहा मिनिटांवर आली आहे. त्यामुळे येणार्‍या काळात रामबागमुळे या विभागाचे नाव मोठे होणार आहे. परमेश्वररूपी माणूस जन्माला आला म्हणून या न्हावाखाडीचे नाव जगात पसरले असून त्यांनी कोट्यवधी रुपयांची वास्तू जनतेला निर्माण करून दिली आहे आणि या वास्तूचा फायदा परिसराला होत आहे. लोकांसाठी काम करण्याचे काळीज लागते आणि ते मोठे काळीज त्यांच्याकडे आहे, सत्कार्यरूपी कार्य त्यांचे आहे. त्यामुळे ते दानशूर व्यक्तिमत्त्व आहेत, असेही ते म्हणाले.

एक राजा होता. त्याने वस्तूला हात लावल्यावर सोने व्हायचे. आपण ते कुणी बघितले नाही, पण एक खाजण होते. त्या जमिनीला हात लावल्यावर त्याचे सोने होते हे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रामबागच्या निर्मितीतून दाखवले आहे आणि हे सर्व त्यांनी लोकांकरिता केले आहे. स्वतःकरिता नाही. मुंबईमध्येसुद्धा असा सुंदर प्रकल्प नाही, तो रामशेठ ठाकूर यांनी उभारला आहे. हा प्रकल्प लोकांसाठी आहे. जे चांगले आहे त्याला चांगले म्हणण्याची दानत महाराष्ट्राला आहे. त्यामुळे मी रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन करतो की, त्यांनी पुढच्या पिढीला सुंदर वास्तू आणि मोकळ्या हवेत आणण्याचे काम केले आहे. तुमचे काम चांगले आहे व ते तुम्ही लोकांसाठी करीत राहता. म्हणून पवारसाहेब बोलतात आम्हाला कुणाला जमत नाही ते रामशेठना कसे जमते. त्यामुळे कृपा करून टीकाकारांनी चांगल्या गोष्टीत राजकारण आणू नये.
-मधुकर भावे, ज्येष्ठ पत्रकार

Check Also

पनवेलमधील विजेचा प्रश्न निकाली

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दोन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील छत्रपती …

Leave a Reply