Breaking News

‘मनोरंजन’@50; विदेशी थीम तिकडेच बरी…

पिक्चरच्या नावात मनोरंजन असले म्हणून ते पडद्यावर असेलच, दिसेलच असे नाही. बरं, ते दिसले तरी त्या पिक्चरची थीम विदेशी असेल, आपल्याकडच्या पारंपरिक मनोरंजन चित्रपटाच्या हुकमी पब्लिकला रूचणारी नसेल तर?
आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला कदाचित आश्चर्य वाटेल, एकेकाळी विदेशी चित्रपट आपला नाही असं मनोमन मानतच आपल्या मराठी व हिंदी चित्रपटावर एकेकाळी बेहद्द प्रेम केले जाई. अगदी आपल्या पिक्चरच्या गोष्टीची पाळेमुळे विदेशी असली तरी ती पचत नसत.
असाच एक पिक्चर ईगल फिल्म बॅनरखालील, एफ. सी. मेहरा निर्मित व शम्मी कपूर दिग्दर्शित मनोरंजन (मुंबईत रिलीज 4 एप्रिल 1974) अगदी अस्साच. त्याच्या रिलीजला पन्नास वर्ष पूर्ण झालीदेखील. (हा चित्रपट 4 जानेवारीला सेन्सॉर संमत झाला.)
शम्मी कपूरची उछलकूद, धसमुसळा रूपेरी प्रेमिक ही खासियत त्याचं शरीर बेढब झाल्यावर त्याच्यापासून दूर दूर गेली. पडद्यावर रोमान्स करण्याची प्रत्येक हीरोची आपली एक संस्कृती होती, पण वाढते वय व त्यामुळेच सुटणारे शरीर हा त्यात मोठाच स्पीड ब्रेकर. जी. पी. सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित ’अंदाज’ (1971)मध्ये हेमा मालिनीचा नायक साकारताना (आणि ’जिंदगी एक सफर है सुहाना’ या केवळ एका सुपर हिट गाण्यातून अख्खा चित्रपट राजेश खन्नाने आपलासा केल्यावर) शम्मी कपूरने नायक म्हणून पूर्णविराम घेतला. काही वर्षांतच बातमी आली, शम्मी कपूर चित्रपट दिग्दर्शनात! भुवया उंचावणारच आणि कौतुकही वाटणार. कपूर खानदानातील राज कपूरने अभिनेता, स्टुडिओ मालक (अर्थात चेंबूरचा आर.के. स्टुडिओ), निर्माता, दिग्दर्शक, संकलक आणि गीत संगीत व नृत्याची उत्तम जाण असलेला अशी ख्याती केव्हाच प्राप्त केलेली. राज कपूरचा पुत्र रणधीर कपूरनेही ’कल आज और कल’ (1971)चे दिग्दर्शन करताना आपले आजोबा पृथ्वीराज कपूर, वडील राज कपूर, प्रेयसी (मग पत्नीही) बबिता यांच्यासह स्वतः काम केलेले. त्यानंतर शम्मी कपूर चक्क चित्रपट दिग्दर्शनात ही बातमीच होती. चित्रपटाचे नाव मनोरंजन आणि प्रमुख भूमिकेत शम्मी कपूर, संजीवकुमार, झीनत अमान तसेच देवकुमार, फरयाल, मदन पुरी, पेंटल, असित सेन, आगा, मुराद वगैरे.
त्या काळात चित्रपट निर्मितीचा वेग काहीसा संथ होता. अडीच- तीन वर्षांत एक चित्रपट पूर्ण होताना त्याच्या शूटिंगच्या आणि गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या बातम्या व फोटो प्रसिद्ध होत. चित्रपट हळूहळू प्रेक्षकांपर्यंत येत राही आणि त्यात एक गंमत होती. चित्रपट रसिक यावर गप्पा मारत. त्यातून चित्रपटाबद्दलचे कुतूहल वाढत असे. ’मनोरंजन’चे झीनत अमानचे धाडसी फोटो पाहून नेमकं काय बरे चित्रपटात असणार हा प्रश्न वाढत गेला. देव आनंद अभिनित व दिग्दर्शित ’हरे राम हरे कृष्ण’ (1972)मुळे ’दम मारो दम गर्ल’ म्हणून मॉडर्न इमेज झालेली झीनत अमान पाश्चात्य वळणाचे मोकळे ढाकळे व्यक्तिमत्व म्हणून गाजत होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील पारंपरिक नायिकेच्या परंपरेला हा मोठाच धक्का होता. झीनत अमान गॉसिप्स मॅगझिनमधील आपली धाडसी फोटो सेशन आणि देव आनंद अभिनित व दिग्दर्शित ’हीरा पन्ना’तील कलरफुल बिकीनी रूप, नासिर हुसेन दिग्दर्शित ‘यादों की बारात’ (1973)मधील चुरा लिया है तुमने जो दिल को गाण्यातील मादक मोहक रूप असा एक प्रकारचा सांस्कृतिक धक्काच देत होती. मनोजकुमार दिग्दर्शित ’रोटी कपडा और मकान’ (यात मनोजकुमार व शशी कपूरची नायिका), शक्ती सामंता दिग्दर्शित ’अजनबी’ (पहिल्यांदाच राजेश खन्नासोबत), ब्रीज दिग्दर्शित ’चोरी मेरा काम’ (शशी कपूर नायक), बी. आर. इशारा दिग्दर्शित ’प्रेम शास्त्र’ (देव आनंद नायक) वगैरे अनेक चित्रपट तिला मिळाले होते. अभिनयात जेमतेम असूनही तिला निर्माते, दिग्दर्शक साईन करीत. झीनत अमान पर्व जणू सुरू झाले होते. आणि त्याच वातावरणात तिने ’मनोरंजन’साठी काही बोल्ड दृश्य दिल्याची गॉसिप्स मॅगझिनमधून चर्चा. ही ग्लॉसी पेपरवरील मासिके खरंतर आंबटशौकीनांना पर्वणीच, पण मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या घरात यांना स्थान नव्हतेच. त्यातील शक्य तितका मसाला मराठीत भाषांतर होत प्रसिद्ध होई. त्यातून काही गोष्टी समजत. एक प्रकारचे ’मनोरंजन’ होई.
’मनोरंजन’मध्ये नेमकं काय बरे असेल, दिसेल याची उत्सुकता असतानाच दोन गोष्टी घडल्या. चित्रपटाच्या गाण्याची तबकडी रिदम हाऊस इतरत्र विक्रीला आली. आनंद बक्षी यांच्या गीतांना राहुल देव बर्मनचे संगीत. आणि गाणी एकदम भारी. ‘आरडीं’चा तो विलक्षण चलतीचा काळ. आया हू मै तुझको ले के जाऊंगा (पार्श्वगायक किशोरकुमार), गोयाके चुनांचे (लता मंगेशकर व मन्ना डे), दुल्हन मै की चली (आशा भोसले, लता मंगेशकर व उषा मंगेशकर), चोरी चोरी सोला सिंगार करूंगी (आशा भोसले). ही गाणी इराणी हॉटेलमधील ज्यूक बॉक्सपासून रेडिओ सिलोनवरील बिनाका गीतमालापर्यंत पोहचलीसुद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे, मिनर्व्हा थिएटरच्या एका शोकेसभरची ’मनोरंजन’ची लॉबी कार्ड्स पाहण्यासाठी आम्ही त्या काळातील फिल्म दीवाने गर्दी करू लागलो. दाढीधारी आणि पोक्त शम्मी कपूर, पोलिसांच्या निळ्या हाफ पॅन्टमधील संजीवकुमार व अतिशय पाश्चात्य वस्त्रातील अल्ट्रा मॉडर्न लूकमधील झीनत अमान ही केमिस्ट्री वेगळीच वाटत होती. त्या काळातील पारंपरिक मनोरंजक चित्रपटाच्या चौकटीबाहेरचा काही तरी मसाला मिक्स प्रकार आहे हे दिसत तर होते, पण नेमकं काय असावे? अशातच समजले, बिल्ली वार्ल्डर दिग्दर्शित इरमाला डूस या इंग्लिश चित्रपटावर शम्मी कपूरने ’मनोरंजन’ बेतलाय. आता हा इंग्लिश चित्रपट पाहिलाय कोणी? त्या काळात इंग्लिश चित्रपट म्हणजे दक्षिण मुंबईतील रिगल, इरॉस, स्टर्लिग, न्यू एम्पायर येथे रिलीज होणारे आणि ज्यांना फारच हायफाय इंग्लिश समजते त्यांचे चित्रपट. आम्ही परीक्षेत इंग्लिशमध्ये पस्तीस-चाळीस गुण मिळवण्याचे ध्येय कायम ठेवणारे. आम्हाला फक्त समजायचे, डर्टी हॅरी या विदेशी चित्रपटावरून खून खून हा चित्रपट घेतलाय. चक्क गुलजार दिग्दर्शित ’परिचय’ची थीम साऊंड ऑफ म्युझिक या विदेशी चित्रपटावर आधारित आहे एवढेच समजे आणि मूळ चित्रपट पाहिला नसल्यानेच हिंदी चित्रपट एन्जॉय करायचो.
’मनोरंजन’ला मात्र विदेशी कल्पना मारक ठरली. चित्रपटाची नायिका (झीनत अमान) वेश्या असून सिधा साधा चड्डीवाला म्हणून ओळखला जात असलेला पोलीस हवालदार (संजीवकुमार) तिच्याकडे आकृष्ट होतो वगैरे वगैरे गोष्टी आपल्या चित्रपट रसिकांना अजिबात रूचल्या नाहीत. ही आपली गोष्ट नाहीच असाच फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच्या पब्लिकचे मत पडले आणि पिक्चर फ्लॉप झाला. अ‍ॅडव्हान्स बुकिंगला पहिल्या तीन दिवसांची तिकीटे विकली गेल्याने ते खेळ हाऊसफुल्ल ठरले तरी ब्लॅक मार्केटमधील तिकीटांचा भाव कोसळला होता. सोमवारपासून बुकिंग क्लर्क प्रेक्षकांची वाट पाहत बसला. गंमत म्हणजे, ’मनोरंजन’चे निर्माते एफ. सी. मेहरा आणि शम्मी कपूर यांच्या मालकीचे मिनर्व्हा थिएटर असूनही अवघ्या चारच आठवड्यात पिक्चर उतरला. पब्लिकला थीमच आवडली नाही म्हटल्यावर काय हो? पब्लिक पसंत, नापसंत हीच तर मोठी खेळी. आपण त्यांना जे दाखवू ते पाहतील असे कधीच होत नसते.
’मनोरंजन’चे लेखन अब्ररार अल्वी यांच्यासारख्या अतिशय अनुभवी पटकथा व संवाद लेखकाचे होते. गुरुदत्तच्या ’कागज के फूल’, ’चौदहवी का चांद’, ’साहिब बीवी और गुलाम’ (याचे दिग्दर्शनही त्यांचेच) यांच्यासह प्रोफेसर, सूरज, बहारे फिर भी आयेगी, छोटी सी मुलाकात, संघर्ष, साथी अशा अनेक चित्रपटांनंतर अब्ररार अल्वी यांनी ’मनोरंजन’ लिहिला, पण थीमच रसिकांना पचनी पडणारी नव्हती तेथे कोण काय करणार? मनोरंजन स्ट्रीट या रेड लाईट एरियातील ही गोष्ट. त्यात इमोशन्सपेक्षा ग्लॅमर व धाडसी दृश्य जास्त होती. शम्मी कपूर दिग्दर्शनात राज कपूर टच देऊ शकला नाही. वांद्य्रातील मेहबूब स्टुडिओ आणि अंधेरीतील नटराज स्टुडिओत मोठे सेट लावून बरेच दिवस शूटिंग केले. ते सुरू असतानाच सेन्सॉर काही दृश्यांवर कात्री चालवेल अशी कुजबूज होतीच. झीनत अमान त्या काळात पीन अप अ‍ॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाई. कोणी इरॉटीक स्क्रीन प्रेझेन्स असंही म्हणे. अशा उपाधी देण्यात त्या काळात मीडियात चुरस असे. अनेक चित्रपटांच्या पूर्वप्रसिद्धीत मीडियाची भूमिका खूपच महत्त्वाची असे. ते दिवसच वेगळे होते. अब्ररार अल्वीचे लेखन असल्यानेच दिल ए भितारी, घंटा ए चौबिश, जवानी इ हरीभरी, जिस्म ए दिलकश असे उर्दूमिश्रित शब्द आले.
निर्माते एफ. सी. मेहरा त्या काळातील खूपच मोठे प्रस्थ. ओ.पी. रल्हन दिग्दर्शित ’मुजरीम’ (शम्मी कपूर व गीता बाली) या 1958च्या चित्रपटांपासून चित्रपट निर्मितीत एफ.सी. मेहरांनी सातत्य ठेवले. नरेश सैगल दिग्दर्शित ’उजाला’ (राजकुमार, शम्मी कपूर व माला सिन्हा), लेख टंडन दिग्दर्शित ’प्रिन्स’ (शम्मी कपूर व वैजयंतीमाला), सुशील मुजुमदार दिग्दर्शित ’लाल पत्थर’ (राजकुमार, हेमा मालिनी, राखी), के. रमणलाल दिग्दर्शित ’ऐलान’ (विनोद मेहरा, रेखा, विनोद खन्ना) असे चित्रपट निर्माण करीत असतानाच त्यांनी व शम्मी कपूरने भागीदारीत डॉ. भडकमकर मार्गावरील जुने मिनर्व्हा चित्रपटगृह विकत घेऊन नवीन भव्य दिव्य दिमाखदार मिनर्व्हा थिएटर उभे केले. प्रेक्षक संख्या तब्बल 1499. पहिलाच चित्रपट लाल पत्थर आणि त्यानंतर मनोरंजन, खून खून इत्यादी बरेच. त्यांचे सुपुत्र उमेश मेहरा व राजीव मेहरा चित्रपट दिग्दर्शक झाल्यावर तर ईगल फिल्म बॅनरखालील चित्रपट निर्मिती फारच वाढली… हमारे तुम्हारे, चमत्कार, अशांती, एक जान है हम, शिकारी इत्यादी.
’मनोरंजन’च्या गुणात्मक व म्हणूनच व्यावसायिक अपयशाची चर्चा कायमच होत राहिली. एका मुलाखतीत शम्मी कपूरने यावर म्हटले, एकदा लंडनला असताना तो व बिल्ली वार्ल्डर या दोघांनी एकत्र एक फ्रेंच नाटक पाहिले. त्यावरुन बिल्ली वार्ल्डरने काही वर्षातच ’इर्माला डूस’ बनवला, तो जगभर गाजला. आपण मग या चित्रपटावरुन ’मनोरंजन’ बनवला, पण तेव्हा तो काळाच्या खूपच पुढचा चित्रपट होता. चित्रपटाची नायिका वेश्या असणे आणि तिचं हायफाय जगणे रसिकांना रूचले नाही. म्हणून चित्रपट फ्लॉप झाला असे शम्मी कपूरचे म्हणणे होते. अर्थात, एकदा रसिकांनी चित्रपट नाकारल्यावर असे कितीही कोणी काहीही म्हटले तरी त्याचा उपयोग नसतो. शम्मी कपूरने त्यानंतर राजेश खन्ना व सुलक्षणा पंडित या जोडीच्या बंडलबाज या फॅण्टसी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्याचेही राहुल देव बर्मनचे संगीत लोकप्रिय झाले, पण पिक्चर फसला. मेन थिएटर सुपरवरून असाच चार आठवड्यांत उतरलादेखील. सुपर फ्लॉप.
शम्मी कपूर चित्रपट दिग्दर्शनात प्रेक्षकांचे ’मनोरंजन’ करू शकला नाही हेच खरे. तो त्याचा फंडा नव्हताच. झीनत अमानने मात्र फारच शरीरसौंदर्य घडवले. त्यात नवीन ते काय? ’मनोरंजन’नंतरही तिने राज कपूर दिग्दर्शित ’सत्यम शिवम सुंदरम’, संजय खान दिग्दर्शित ’अब्दुल्ला’, फिरोझ खान दिग्दर्शित ’कुर्बानी’ इत्यादीतही तेच तिने केले… त्यातील काही चित्रपट चक्क सुपरहिटही झाले. तेच तर महत्त्वाचे आहे.

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply