Breaking News

दिव्या भारती स्मृतिदिन : ऐसी दीवानगी, देखी नही कहीं…

तहान भूक विसरून अक्षरश: झपाटल्यासारखे काम करणारे सर्वच क्षेत्रात असतात, पण काहींना हाच वेग, हीच घाई, हेच झपाटलेपण दुर्दैवाने घातक ठरते… त्यात नशीब-कमनशीबाची खेळी किती नि कशी हे ठरवता येणे खूपच अवघड.
दिव्या भारती अगदी अशीच होती. वेग हा तिचा जणू स्वभाव होता. यश तिच्यावर मेहरबान होते. फॅन्सची संख्या झपाट्याने वाढत होती. ’ऐसी दीवानगी देखी नही’ असा जणू झपाटा होता. मला आठवतंय, राज कंवर दिग्दर्शित ’दीवाना’ (1992)मध्ये शाहरुख खान तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागतो तेव्हा दिव्या खरंतर आपल्या पतीच्या (ऋषि कपूर) निधनानंतर आपलं आयुष्य जगत असते (क्लायमॅक्सला समजते की तिचा पती जिवंत आहे. ती गोष्ट वेगळी) आणि अशातच शाहरूख दिव्याचं सौंदर्य पाहून पागल होतो. मला आजही आठवतंय, ही ’प्रेमाची दीवानगी’ पब्लिकच्या टाळ्या आणि शिट्ट्या वसूल करणारी ठरली. शाहरूख खान व दिव्या भारती ‘दीवाना’च्या यशाने स्टार झाले…
खरंतर ती वयात येताच चित्रपटात आली, दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांतून तिने लक्षवेधक सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणेच ती हिंदीत आली. ती आली, चित्रपट रसिकांनी तिला पाहताच ते ’तिचे दीवाने’ झाले. यश हेच चलनी नाणे असते अशा अलिखित नियमानुसार तिला धडाधड चित्रपट मिळू लागले. ती देश-विदेशातील शूटिंग सत्रात सतत बिझी राहू लागली. तिने उमलत्या वयातच निर्माते सादिक नडियादवाला याच्याशी लग्न करून सर्वांनाच आश्चर्याचा जोरदार धक्काच दिला आणि अशातच 5 एप्रिल 1993 रोजी रात्री असं काय घडलं की तिचं आयुष्य संपावे? तिचा मृत्यू आत्महत्या होती की खून याचे उत्तर कधीच मिळाले नाही. ते एक गूढ म्हणूनच कायम राहिलंय. पहिली बातमी अशी होती की, सात बंगला, वर्सोवा येथील तुलसी बिल्डिंगमधील पाचव्या मजल्यावरील आपल्या घरातील खिडकीत ती बसली असता तिचा तोल जाऊन ती पडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मग हळूहळू कुजबुज सुरू झाली की, हिंदी चित्रपटसृष्टी व अंडरवर्ल्ड यांच्या संबंध-हितसंबंधाच्या तिला माहीत असलेल्या गोष्टींमुळे कोणाचा तरी घात होईल, बिंग फुटेल या भीतीने तिची कोणीतरी हत्या केली, पण कोणी आणि खरंच का? त्या काळातील दुपारच्या वृत्तपत्रातून (विशेषत: इंग्लिश सायंदैनिक) अशा ’घटनेमागील गोष्टीं’च्या बातम्या येत. दिव्या भारतीचे असे अनपेक्षित दुर्दैवी निधन झाले तेव्हाचे सामाजिक सांस्कृतिक माध्यम वातावरण अतिशय गढूळ झाले होते. डिसेंबर 1992 व जानेवारी 1993मधील जातीय दंगलीच्या भीतीच्या सावटातून जरा कुठे आपण सगळेच बाहेर येत असतानाच 12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेल्या बारा बॉम्बस्फोटातील एक आरोपी म्हणून संजय दत्तचे नाव गाजत होते. चित्रपटसृष्टी व अंडरवर्ल्ड यांच्या कथित संबंधातून चित्रपटसृष्टीची प्रतिमा डागाळत होती. ’चोली के पीछे क्या है’ (खलनायक) या गाण्याने श्लील- अश्लील वाद गाजत होता आणि अशातच 6 एप्रिल 1993च्या सकाळीच मुंबई आकाशवाणीवर बातमी आली की, दिव्या भारतीचे धक्कादायक निधन. तोपर्यंत मोबाईल फोन आले नव्हते. लॅण्ड लाईनच्या त्या युगात बातमी पोहचायला उशीर होत गेला. सुरुवातीला या बातमीवर फार कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हते. ही अफवाच असावी असेच वाटत होते.
ती अफवा नव्हती, वस्तुस्थिती होती. अफाट लोकप्रियता, सतत नवीन चित्रपटांच्या ऑफर्स, नवीन चित्रपटांचे मुहूर्त, मोठ्या बॅनरच्या चित्रपटात मोठ्या नायकांसोबत भूमिका, कोणत्या ना कोणत्या गॉसिप्समध्ये नाव असा एकूणच झक्कास नि वेगवान सुरू असलेला दिव्या भारतीचा झंझावात अचानक वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षीच थांबला होता. (जन्म 25 फेब्रुवारी 1974) तिचा धक्कादायक मृत्यू तिचे कुटुंबिय, चाहते, चित्रपटसृष्टी आणि मीडियासाठी आघात ठरला. तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय याचा रहस्यभेद आजही झालेला नाही…
दिव्याने वयाच्या चौदाव्या वर्षीच चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले, पण नंदू तोलानी निर्मित ’गुनाहो का देवता’मध्ये मिथुन चक्रवर्तीची नायिका म्हणून तिच्यापेक्षा संगीता बिजलानीची निवड करण्यात आली. ’राधा का संगम’साठीही तिला विचारले, पण गोविंदाची नायिका म्हणून तिच्याऐवजी जुही चावलाची निवड झाली. हिंदीत संधी मिळत नाही असे दिसताच ती दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांकडे गेली. तिकडचा तिचा पहिला तेलगू चित्रपट डॉ. डी. रामा नायडू दिग्दर्शित ’बोब्बिली राजा’ (1990). व्यंकटेश तिचा पहिला हीरो. त्याचबरोबर तिचा ’नील्ला पेन्ने’ हा तमिळ चित्रपटही पडद्यावर आला. मग तमिळ भाषेतील असेम्बी राऊडी (1991. मोहन बाबू नायक), ’राऊडी अल्ल्यूडू’ (चिरंजीव नायक) अशा चित्रपटात ती भूमिका साकारत असतानाच हिंदी चित्रपटसृष्टीचे या नवीन हॉट केककडे लक्ष जाणे अगदी स्वाभाविक. गुलशन रॉय निर्मित व राजीव रॉय दिग्दर्शित मल्टी स्टार कास्ट ’मोहरा’ तिने साईन केलेला पहिला चित्रपट, पण तिचा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट ठरला डेव्हिड धवन दिग्दर्शित ’शोला और शबनम’ (त्यात गोविंदा तिचा हीरो होता). तो ज्युबिली हिट ठरला आणि दिव्या भारतीची स्पेस वाढत गेली.
दिव्या भारती म्हणजे अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्व. जणू डाळिंबच. प्रत्यक्षात असो की पडद्यावर असो. दिव्या भारतीच्या एकूणच वावरण्यात, देहबोलीत चैतन्य असे. चेहर्‍यावर एक प्रकारची रागाची, तर कधी जिद्दीची छटा दिसे. मग तो असरानी दिग्दर्शित ’दिल ही तो है’चा मेहबूब स्टुडिओतील मुहूर्त असो अथवा नरीमन पॉईंट येथील एका पंचतारांकित हॉटेलमधील ’मोहरा’ची पार्टी असो. सिनेपत्रकार म्हणून हजर राहताना हे लाईव्ह अनुभव घेतले.
दिव्या भारती आईच्या बाजूने महाराष्ट्रीय. आईचे माहेरचे आडनाव वाळिंबे. त्यामुळे दिव्या भारतीलाही मराठी चांगले येत असे याची मला कल्पना असल्यानेच अंधेरीतील सेठ स्टुडिओतील राजू मावानी निर्मित व दीपक आनंद दिग्दर्शित ’बलवान’च्या सेटवर तिच्याशी मराठीतच बोलून मुलाखतीचे विचारले. तिने आपली दृश्य किती आहेत, दरम्यान किती वेळ मोकळा आहे याचा अंदाज घेत आपल्या स्पॉटबॉयकडून सिगारेट घेतली, ती पेटवून पहिला धूर सोडला आणि म्हणाली, काहीही विचारा… दिव्या भारती अतिशय फटकळ आणि बेधडक. त्यामुळेच खरी कसोटी माझी होती. आणि कोणत्याही कलाकाराच्या खासगी गोष्टीपेक्षा त्याची रूपेरी पडद्यावरील वाटचाल महत्त्वाची असे मानणारा मी. मग त्यावरच फोकस ठेवत आमची मुलाखत छान रंगली.
दिव्याची रूपेरी घोडदौड हेमा मालिनी दिग्दर्शित ’दिल आशना है’ (शाहरूख खानने साईन केलेला पहिला चित्रपट), जे. पी. दत्ता दिग्दर्शित ’क्षत्रिय’, लॉरेन्स डिसोझा दिग्दर्शित ’दिल का क्या कसूर’ वगैरे चित्रपटातून खुलत फुलत होती. तरी त्याचा टेक ऑफ पॉईंट ठरला राज कंवर दिग्दर्शित ’दीवाना’ (1992). शाहरूख खान व दिव्या भारती हे या चित्रपटाच्या जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील मुहूर्तालाच कमालीच्या आत्मविश्वासाने वावरताना दिसले. शाहरूख दूरदर्शनवरील सर्कस, फौजी या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहचलेला आणि ’आणखी मोठे होण्याचे स्वप्न’ डोळ्यांत आणि डोक्यात ठेवलेला मुरब्बी कलाकार. दिव्या भारतीने झपाटल्यागत आणखी काही हिंदी व दक्षिण भारतीय प्रादेशिक भाषेतील चित्रपटांतून भूमिका साकारली. निवांतपणा असा नाहीच.
कोणत्याही कलाकाराचे अचानक निधन होताच सर्वांत मोठा अडचणीचा प्रश्न असतो आता सेटवर असलेल्या चित्रपटांचे काय? जे चित्रपट अर्धेअधिक पूर्ण झालेत त्यांचे तर पुरते वांदे. ज्यांचे थोडेफार शूटिंग झाले आहे, ते रद्द करुन अन्य कलाकाराची निवड करुन रिशूटींगचा मार्ग असतो. (राजीव रॉय दिग्दर्शित ’मोहरा’त दिव्या भारतीच्या जागी रविना टंडन, राज कंवर दिग्दर्शित ’कर्तव्य’मध्ये दिव्याच्या जागी जुही चावला आणि राज कंवर दिग्दर्शितच ’लाडला’मध्ये दिव्याच्या जागी श्रीदेवी असे बदल करावे लागले.), तलत जानी दिग्दर्शित ’रंग’चे 99 टक्के शूटिंग झाले होते. एका गाण्यात लॉन्ग शॉट वापरून मार्ग काढला गेला. या चित्रपटात जितेंद्र व अमृता सिंग यांनी दिव्या भारतीच्या आई-वडिलांची भूमिका होती. अमृता सिंगच्या जागी अगोदर अश्विनी भावेला ती भूमिका ऑफर झाली होती, पण अजून आपण नायिका साकारतोय म्हणून ही भूमिका नको असा तिने विचार केल्याचे वृत्त होते.
दिव्या भारतीच्या अल्पायुषी आयुष्यावर एखाद्या चरित्रपटाला अर्थात बायोपिकला आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीकडून नक्कीच उत्तम प्रतिसाद मिळेल. याचं कारण एखाद्या यशस्वी स्टारच्या आयुष्यातील क्षणभंगुरता कशी असते, का असते याचे उत्तर त्यात मिळेल. मनोरंजन क्षेत्रात वावरताना आपण कोणाशी किती संबंध ठेवावेत, का ठेवावेत, कसे ठेवावेत याची उत्तरे त्यातून कदाचित मिळतीलही. दिव्या भारती म्हणून जगणे, असणे हे सोपे नाही. तिचा झंझावात, तिचं ग्लॅमर दिसत होते, पण त्यापलिकडील आयुष्य? काही कलाकारांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी अनाकलनीय असतात, हेच खरे. त्याची उत्तरे कधीच मिळत नसतात. ती मिळतील याची अपेक्षाही ठेवू नये.
दिव्या भारती अशा अनेक गोष्टींसह कायमच लक्षात राहिल. प्रत्येक कलाकाराचे प्रगती पुस्तक गुणदोषांनी भरलेले असतेच, पण दिव्या भारतीच्या भरभराटीत अचानक गाडीचे ब्रेक नादुरुस्त होऊन गाडी कड्यावरून खूपच खाली पडली आणि एक स्वप्न भंगले.

– दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply