Breaking News

चवदार तळ्याच्या सौंदर्यीकरण व जलशुद्धीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे

आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष

मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त
महाड येथील चवदार तळ्याचे सौंदर्यीकरण व जलशुद्धीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले.
महाड येथील चवदार तळ्याची दुरवस्था झाली असून त्यातील पाणी पिण्यायोग्य राहण्यासाठी आवश्यक ती देखभाल न केल्यामुळे पाण्यावर शेवाळे साठून दुर्गंधी पसरल्याने पाणी प्रदुषित होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. या तळ्याकरिता लाखो रुपये खर्च करण्यात येऊनही चवदार तळ्याचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने महाड नगर परिषदेने चवदार तळे शुद्धीकरण व सौंदर्यीकरणाचा 65 कोटी रुपयांचा सादर केलेला प्रस्ताव गेल्या तीन वर्षापासून शासनाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, का? असल्यास या प्रकरणी शासनाने चौकशी करून तळ्याचे सौंदर्यीकरण व जलशुद्धीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दाखल केला होता.
या प्रश्नाला लेखी उत्तरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, महाड नगरपरिषदेच्या हद्दीतील चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी मे. ऑरगॅनिक बायोटेक प्रा.लि. मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत दरमहा मायक्रोबाएबल कल्चरचे मिश्रण तलावात सोडून त्याद्वारे पाणी शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तथापि, या पद्धतीने पाणी पिण्यायोग्य राहत नसल्याने पंजाब राज्यातील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर ओझोन प्रक्रिया करून चवदार तळे सौंदर्यीकरण व जलशुद्धीकरणाचा रु.65.52 कोटी रकमेचा सविस्तर प्रकल्प अहवाल सहायक आयुक्त, समाज कल्याण, रायगड यांच्याकडे सादर केला आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने काही मुद्द्यांची पूर्तता करण्याच्या सूचना त्यांच्याकडून प्राप्त झाल्या असून त्याची पूर्तता नगर परिषदेकडून करण्यात येत आहे. चवदार तळ्यास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असून त्याची देखभाल व दुरुस्ती नगर परिषदेच्या स्वनिधीतून व शासनाच्या विविध योजनेंतर्गत प्राप्त अनुदानातून करण्यात येते. नगर परिषदेने चवदार तळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालास समाजकल्याण विभागाकडून मान्यता प्राप्त झाल्यानंतर तळे व आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे नगर परिषदेचे नियोजन आहे.

 

Check Also

रायगड क्रिकेट असोसिएशनला सर्वतोपरी मदत करणार -आशिष शेलार

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए)ला सर्वतोपरी मदत करणार, असे आश्वासन भारतीय क्रिकेट …

Leave a Reply