लीड्स : वृत्तसंस्था
अखरेच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अफगाणिस्तानची कडवी झुंज मोडून काढत पाकिस्तानने सामन्यात बाजी मारली आहे. लीड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर तीन गडी राखून मात केली. 228 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला अखेरच्या षटकात विजयासाठी सहा धावांची गरज होती. इमाद वासिम आणि वहाब रियाज जोडीने या धावा पूर्ण करीत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह पाकिस्तानचे या स्पर्धेतले आव्हान अजूनही कायम राहिलेले आहे.
228 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाची सुरुवात खराब झाली. मोहम्मद नबी आणि मुजीब उर रेहमान यांनी केलेल्या भेदक मार्याच्या जोरावर पाकिस्तानचे तीन फलंदाज लवकर माघारी परतले. सलामीवीर फखार झमानला मुजीबने पहिल्याच षटकात बाद करीत पाकिस्तानला धक्का दिला. यानंतर इमाम उल-हक आणि बाबर आझम यांनी छोटेखानी अर्धशतकी भागीदारी रचत पाकिस्तानचा डाव सावरला, मात्र मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात हक बाद झाला. यानंतर थोड्याच वेळात बाबर आझम मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. मोहम्मद हाफीजनेही हारिस सोहेलसोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला, मात्र मुजीबने त्याला माघारी धाडत पाकिस्तानला आणखी एक धक्का दिला. यानंतर सोहेल आणि कर्णधार सरफराजही फार काळ तग धरू शकले नाही.
पाकिस्तानचा संघ संकटात सापडलेला असतानाच इमाद वासिम आणि शादाब खान यांनी झटपट धावा काढत अर्धशतकी भागीदारीची नोंद केली. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नैबच्या गोलंदाजीवर पाकिस्तानने खोर्याने धावा काढत सामन्यात रंगत निर्माण केली, मात्र चोरटी धाव काढण्याच्या प्रयत्नात शादाब खान धावचीत होऊन माघारी परतला. अखेर तळातील फलंदाजांनी संयमी फलंदाजी करीत पाकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अफगाणिस्तानकडून मुजीब उर-रेहमान आणि मोहम्मद नबीने प्रत्येकी दोन बळी टिपले, तर राशिद खानने एक गडी बाद केला. त्याआधी, शाहीन आफ्रिदी-इमाद वासिम यांच्या भेदक मार्याच्या जोरावर पाकिस्तानने अफगाणिस्तानला 227 धावांवर रोखण्यात यश मिळविले. नाणेफेक जिंकून अफगाणि संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रहमत शाह आणि कर्णधार गुलबदीन नैब यांनी संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. शाहीन आफ्रिदीने नैबला माघारी धाडत अफगाणिस्तानला धक्का दिला. यानंतर अफगाणिस्तानचे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. मधल्या फळीत असगर अफगाण, नजिबउल्ला झरदान यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा सामना केला, मात्र त्यांची झुंजही अपयशी ठरली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने चार, इमाद वासिम आणि वहाब रियाझने दोन, तर शादाब खानने एक गडी बाद केला.