Breaking News

‘लोकांच्या मनात मोदींची हवा नाही, तर तुफान होते’

मुंबई ः प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर 2014ची निवडणूक जिंकली, मात्र आता मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच्या कामावर 2019ची निवडणूक आम्ही जिंकली आहे. नरेंद्र मोदींची हवा नाही, असे म्हणणार्‍या गांधी परिवाराचा करिष्मा देशातून संपला असून, जनतेच्या मनात मोदींची केवळ हवा नव्हती, तर तुफान होते हे या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

रामदास आठवले यांच्या वांद्रे येथील संविधान बंगल्यावर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि लाडू वाटप करून एनडीएच्या महाविजयाचे जल्लोषात स्वागत केले. या जल्लोषात रामदास आठवले, सीमाताई आठवलेही सहभागी झाले होते. महाराष्ट्रात महायुतीने प्रचंड विजय मिळविल्याबद्दल रामदास आठवले यांनी राज्यातील आंबेडकरी जनतेचे

मनपूर्वक आभार मानले आहेत.

महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होण्यास आता सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि विरोधकांच्या अपप्रचाराला देशभरातील दलित बहुजन जनतेने अजिबात भीक घातली नाही. मोदी आणि एनडीएला देशभरातील आंबेडकरी जनतेने, तसेच दलित बहुजनांनी भरीव मतदान करून खंबीर साथ दिल्याबद्दल दलित बहुजन आंबेडकरी जनतेचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आभार मानले आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसला साथ देणे योग्य नव्हते, तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अनावश्यक टीका करायला नको होती. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याने काँग्रेससोबत राहण्यापेक्षा एनडीएमध्ये यायला हवे. त्यांच्यासारख्या नेत्याने एनडीएसोबत राहिले पाहिजे. त्यानुसार भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही एनडीएचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचे आवाहन केले असल्याची आठवणही या वेळी रामदास आठवले यांनी करून दिली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply