विनाकारण फिरल्याने पनवेल, उरणमध्ये कारवाई

पनवेल, उरण : वार्ताहर
जागतिक आणीबाणीच्या काळात कोरोनासारख्या महामारीला सामोरे जाताना आपण सगळे आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहेत. परंतु त्यातही काहीजण प्रामुख्याने तरूण वर्ग कोणतेही गांभीर्य नसल्यासारखे फक्त मौजमजा व फेरफटका मारण्यासाठी मोटरसायकल घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. अशांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, पोलीस निरीक्षक क्षत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक विजय तायडे व त्यांच्या पथकाने भा.दं.वि. कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यास सुरवात केली आहे. पनवेल शहरात विनाकारण मोकळ्या रस्त्यावर दिवसा व रात्री काही कारण नसताना किंवा खोटी वैद्यकीय कागदपत्रे जवळ बाळगून अनेक तरूण वर्ग आपल्या मोटरसायकली घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. अशा वाहचालकांविरूद्ध पनवेल शहर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असून त्या अंतर्गत वेगवेगळ्या नाक्यावर मोटरसायकली थांबवून वाहनचालकांंकडे घराबाहेर पडण्याचे कारण विचारून गाडीचे कागदपत्रे तपासणी करण्यात येत आहे. अशावेळी त्यांनी सांगितलेल्या कारणांमध्ये विसंगती आढळल्यास त्यांच्याविरूद्ध भा.दं.वि. कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात येत असून ही वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. तसेच उरण नगरपालिकेच्या नागरी हद्दीत विनाकारण फिरत असताना व्यक्ती आढळून आल्या त्यांच्या वर उरण पोलिसांनी शुक्रवारी (दि. 3) एप्रिल रोजी कारवाई केली आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शन खाली संतोष कृष्णा नाईक (रा. म्हतावली), विश्वास पांडुरंग नागे (रा. कोटनाका), साई दिलीप पवार (रा. बौध्दवाडा), सिद्धार्थ मोरेश्वर कोळी (रा. भवरा), कामेश सुरेश कोळी (रा. उरण) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या गुन्हयात बाईक एमएच 06 सीबी 4636 2)एमएच 46 बीजी 6937, एमएच 46 बीएस 5770, एमएच 46 एम 9209 आदी मोटार बाईक(वाहन) जप्त करण्यात आल्या अशी माहिती उरण पोलीस ठाणे यांच्या कडून देण्यात आली.
वाहनचालकांनी व मालकांनी विनाकारण आपली वाहने रस्त्यावर आणू नयेत व कायद्याचा भंग करू नये. सध्या प्रत्येक नागरिकाने घरात राहणे महत्त्वाचे आहे. अत्यावश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा व शक्यतो वाहने रस्त्यावर आणू नका, अन्यथा अशांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल.
-राजेंद्र जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पनवेल