आजही रात्री नऊ ते साडेदहा या वेळेत सोनी मनोरंजन उपग्रह वाहिनीवर पहावे तर अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीच्या खेळात समोरच्या स्पर्धकाचे वय, वागणे, सुख, दु:ख, आनंद, अपेक्षा या सगळ्याचा विचार करत करत
रंग भरतोय…
अमिताभ बच्चन म्हणा वा बीग बी. 11 ऑक्टोबर रोजीच्या ब्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना सर्वप्रथम ही गोष्ट सांगावीशी वाटते. अमिताभ बच्चन म्हणजे बरेच काही. अख्खे एक वृत्तपत्रही त्याच्या चौफेर कर्तृत्वाची दखल घेण्यास कमी पडावे.
अमिताभ बच्चन होणे अजिबात सोपे नाही. त्यात त्याची गुणवत्ता, मेहनत, व्यावसायिकता, सकारात्मक दृष्टिकोन आणि वक्तशीरपणा यांचा वाटा आहे. आजही सकाळी नऊच्या शिफ्टला त्याच वेळेस स्टुडिओत येणे हे त्याने जपलंय. अमिताभ बच्चन म्हणून वाटचाल करणे, स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे, स्वतःचे साम्राज्य निर्माण होणे हेही सोपे नाही. नशीबाने त्याला सगळे मिळालयं असं म्हणणं अजिबात योग्य नाही. नशीबाची साथ त्याला मिळाली असेलही, पण तेच म्हणजे त्याचे यश नाही.
जगभरातील भारतीय चित्रपटसृष्टीची ओळख म्हणून सत्यजित राय, लता मंगेशकर, दिलीपकुमार तसेच आशा भोसले आणि अमिताभ बच्चन अशी टॉप फाईव्ह नावे आपण अतिशय आदराने घेतली जातात. या प्रत्येकाचे हे मोठेच देणे.
अशा चौफेर, बहुस्तरीय, अष्टपैलू अशा बीग बीच्या वाटचालीचा एक पैलू म्हणजे, त्याचे मराठी कनेक्शन. त्याने एकदा अतिशय संयमाने आणि आदराने मराठीत भाषण केले आहे. (गुगलवर सर्च केल्यास ते आपणास पहायला मिळेल. सर्वच मराठी उपग्रह वाहिनीवर ते लाईव्ह दाखवले आणि सगळ्यांचाच टीआरपी वाढला.)
तो योग आला होता, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे जुलै 2015 मध्ये. म्हणजेच नऊ वर्ष झालीदेखील. निमित्त होते, व्ही. शांताराम फाऊंडेशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ’शतकमहोत्सवी मराठी चित्रसंपदा 3 मे 1913 ते 3 मे 2013’ या संग्राह्य सूचीचे तसेच विवेकच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची माहिती देणारी पुस्तिका या दोन्हीचे प्रकाशन. यातील सूची मराठी चित्रपटसृष्टीसाठी आणि चित्रपटाचा अभ्यास करणार्या सर्वांनाच उपयुक्त ठरतेय. चित्रपटावर अशा गंभीर लेखनाची अथवा संदर्भ ग्रंथाची गरज आहेच. चित्रपट म्हणजे फक्त गॉसिप्स गप्पा नि गंमत नव्हे.
व्यासपीठावर तात्कालिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वनमंत्री सुधीर मनगुंटीवार, खासदार पूनम महाजन, व्ही. शांताराम फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण शांताराम आणि अमिताभ बच्चन… एक अविस्मरणीय क्षण. माझ्या तर कायमच लक्षात राहिलाय.
सोहळ्यात एकेक प्रकाशन होत जाते, भाषणे होतात आणि अशातच अमिताभ बच्चनच्या भाषणाचा योग येतो. मराठी चित्रपटाच्या सुचीचे संपादन मी केले असल्याने मला या गोष्टीचा विशेष आनंद. माझ्या कारकिर्दीतील हायपॉईंट. माझ्यासाठी मोठाच क्षण. (ही सूची-4 साईझ 464 पाने इतकी मोठी आहे. दुसरी आवृत्तीही एव्हाना संपलीय. अनेकांनी संग्रही ठेवली… विदेशातही गेली आहे.)
अमिताभ आपली शाल सावरतो. (त्याला उत्तम ड्रेस सेन्स आहे. हे अनेकदा ’दिसून’ येते. तो फॅशन आयडॉल म्हणूनही ग्रेट आहेच. त्यासाठी त्याला पुरस्कार द्यावा) एकदा सभोवार बघतो. (ती त्याची खासियत) एकदा माईककडे बघतो. (ही त्याची स्टाईल), एक नजर आपल्या हातातील कागदावर टाकतो (दिग्दर्शकाच्या सूचना अंमलात आणणारा अभिनेता ही त्याची ओळख आहेच) आणि… आणि चक्क मराठीत भाषण करू लागताच व्यासपीठावरचे सगळेच आणि समोरचा सगळा प्रेक्षकवर्ग क्षणभर अचंबित होतो आणि मग उत्फूर्तपणे टाळ्या वाजवतो. मी तर असा शहारलो की आजही ते माझ्या लक्षात आहे. या प्रतिसादाने अमिताभचा मुळात असलेला आत्मविश्वास आणखी वाढतो. दृढ होतो. अतिशय शुद्ध आणि स्वच्छ शब्दोच्चार (ती त्याची खासियत आहेच, मग भाषा कोणतीही असू देत. खरं तर तो ’आवाजानेही/उच्चाराने अभिनय करतो. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ’बावर्ची’, आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ’लगान’ अशा अनेक चित्रपटांच्या सुरुवातीला त्याचे असलेले निवेदन ऐकताना माझ्या म्हणण्याचा सकारात्मक प्रत्यय येईल.) थोडंसं सावधपणे साधारण पंधरा मिनिटं हे तो मराठीत भाषण करतो. खरंतर तो हे भाषण वाचतो, पण अष्टपैलू अभिनेता असल्याने हे वाचन नसते तर ते स्वाभाविक वाटते. तो अभिनय वाटत नाही. तो कसलेला अभिनेता असूनही त्याचे हे मराठी वाचन खरे वाटते. त्याच्याकडे हीदेखील एक कला आहे. तोही एक वेगळाच विषय. त्यासह मराठी शब्दांचा पोत लक्षात घेत एक्सप्रेशनही देत होता… सगळं कसे आजही लख्खपणे आठवतेय. जणू समोरच घडतेय. वा पुन्हा घडावे.
आपल्या कारकिर्दीतील हे पहिलेच मराठीत भाषण आहे हे आपल्या अॅपिरियन्समधून त्याने कुठेही दाखवून दिले नाही आणि तेथेच त्याला दाद मिळाली. गोष्ट छोटी वाटते, पण खूप महत्त्वाची आहे आणि हीच अमिताभची खासियत. अमिताभच्या प्रगती पुस्तकात अशा अगणित छोट्या छोट्या गोष्टी आणि मोठ्या माणसांच्या छोट्या गोष्टीही मोठ्याच ठरतात. त्याला शहेनशाह, एबी, बीग बी म्हणणे मला फारसे आवडत नाही. अमिताभ बच्चन या नावाला प्रचंड मोठी उंची ओळख आहेच आहे.
या सोहळ्याची एकूणच पार्श्वभूमी पाहून आपण मराठीतच भाषण करायची त्याने आवर्जून तयारी केली. ती कशी? तर त्याने लेखक आणि अभिनेता अभिराम भडकमकर याच्याशी या भाषणासाठी संपर्क साधला. अभिरामने अमिताभचे व्यक्तिमत्व आणि सोहळ्याचे स्वरूप या दोन्हीचा मेळ घालत भाषण लिहून दिले. त्याने अभिरामकडून प्रत्येक शब्दाचा अर्थ, वाक्याचा ओघ हे सगळे समजावून घेतले. मग काही रिहर्सल केल्या आणि मग अतिशय उत्तम परफॉर्म्स केला. कसलेला कलाकार कोणतीही गोष्ट गृहीत धरत नाही अथवा ऑल्सो रन समजत नाही याचे हे उत्तम उदाहरण. माणसे उगीच मोठी होत नसतात हो. त्यांच्यात अनेक चांगले
घटक असतात.
आपला अमिताभ आणि त्याचे आपले मराठी कनेक्शन याबाबत आणखी अनेक गोष्टी आहेत.
आमचे गिरगावकर दिग्दर्शक मनमोहन देसाई निर्मित व दिग्दर्शित ’कुली’ (1983)च्या बंगलोर येथील चित्रीकरणाच्या वेळी मारहाण दृश्यात पुनीत इस्सारचा एक ठोसा चुकवायच्या प्रयत्नात अमिताभच्या पोटात टेबलाचा एक कोपरा लागला आणि तो प्रचंड विव्हळत पडला. लगोलग स्थानिक इस्पितळात त्याला दाखल करण्यात आले. दुसर्याच दिवशी त्याला विमानाने मुंबईत आणण्याचा निर्णय घेतला गेला. इकडे अमिताभला डॉ. भुलाभाई देसाई मार्गावरील (नेपियन सी रोड) ब्रीच कॅन्डी इस्पितळात दाखल करण्याचा निर्णय घेतला गेला. सांताक्रूझ विमानतळावरून ब्रीच कॅन्डीला अमिताभला न्यायचे तर तशी (अमिताभच्या उंचीचा विचार करुन) रुग्णवाहिका हवी. अमिताभचा सेक्रेटरी शीतल जैन यांनी याबाबत प्रयत्न केला असता शिवसेना डॉ. भडकमकर मार्ग शाखा यांच्याकडे तशी मोठ्या आकाराची रुग्णवाहिका असल्याचे समजले आणि मग तीच वापरायचा निर्णय घेतला गेला. त्या काळात मुंबईत रुग्णवाहिकांची संख्या कमीच होती.
अमिताभने या गोष्टीची पूर्णपणे जाणीव ठेवली आणि याच आमच्या गिरगाव परिसरातील शिवसेना शाखेच्या 20 एप्रिल 1984 रोजी धोबीतलावच्या रंगभवन येथे साजरा झालेल्या वर्धापन दिनाला तो विशेष पाहुणा म्हणून उपस्थित राहिला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ बच्चन एकाच व्यासपीठावर एकत्र पाहण्याचा हा पहिलाच योग. अमिताभ संपूर्ण अंगभर शान लपेटून आला होता हे आजही डोळ्यासमोर आहे. मराठी वृत्तपत्रातील ही एक महत्त्वाची बातमी ठरली. गजानन वर्तक तेव्हा नगरसेवक होते. अरविंद नेरकर शाखाप्रमुख.
नव्वदच्या दशकात निर्माते सतिश कुलकर्णी यांनी आपल्या तुलसी प्रॉडक्सन्सच्या ’एकापेक्षा एक’ च्या रौप्य महोत्सवी सोहळ्यास अमिताभला प्रमुख पाहुणा म्हणून खूप मेहनतीने आमंत्रित केले. दिग्दर्शक सचिन पिळगावकरसाठीही ही सुखद घटना होती. आजही मला आठवतंय, जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या सोहळ्यास अमिताभ अतिशय शांतपणे आला, अंगावर शाल होती (हे अपेक्षित होतेच), अतिशय उत्तम हिंदी भाषेत त्याने शुभेच्छा दिल्या (भाषेवरचे त्याचे प्रभुत्व ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. त्याचे हे वैशिष्ट्य आवर्जून शिकण्यासारखे आहे), त्याच्या हस्ते एकापेक्षा एकच्या सर्वच कलाकारांना ट्रॉफी स्वीकारताना होत असलेला आनंद त्यांच्या चेहरावर पटकन दिसत होता, तेव्हा मराठी कलाकारास झालेला आनंद आजही आठवतोय. तो क्षणच तसा होता. अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अर्चना जोगळेकर, सुकन्या कुलकर्णी, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, आशालता बावगावकर अशी स्टार कास्ट या चित्रपटात होती. याच दिवशी (म्हणजे 1 फेब्रुवारी 1991) अमिताभची भूमिका असलेला मुकुल आनंद दिग्दर्शित ’हम’ प्रदर्शित झाला, पण पूर्णपणे व्यावसायिक वृत्तीने कायमच वावरत असलेल्या अमिताभने आपल्या यावेळच्या छोट्याशा भाषणात ’हम’चा अजिबात उल्लेख केला नाही. आपले मुद्देसूद आटोपशीर असे कौतुकाचे भाषण होताच काही मिनिटातच तो आपल्या चालण्याच्या विशिष्ट शैलीत तो निघालाही… त्याच्या त्या चालण्यातही डौल होता. निर्माते सतिश कुलकर्णी यांच्या विशेष प्रयत्नात अमिताभ या सोहळ्यास आल्याची आठवण ते सांगतात.
अमिताभचे मेकअपन दीपक सावंत यांनी आक्का (1994) या मराठी चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा त्यात पाहुणे कलाकार म्हणून बच्चनसाहेब असणार हे अगदी स्वाभाविक होते. त्यानुसार चित्रपटातील श्रीगणेश पूजनाची आरती अमिताभ आणि जया बच्चन यांच्यावर चित्रीत झाली. गोरेगावच्या चित्रनगरीत याचे शूटिंग झाले. तेव्हा ही ब्रेकिंग न्यूजच तर ठरली. दीपक सावंत यांनी त्यानंतर गंगा इत्यादी काही भोजपुरी चित्रपटांची निर्मिती केली तेव्हा त्यातही अमिताभने पाहुणी भूमिका साकारत मराठी माणसालाच मदत केलीय. याचीही बातमी झाली.
अमिताभचा यानंतर मराठीशी योग आला तो ’मी सिंधूताई सकपाळ’ आणि ’ढोलकी’ या मराठी चित्रपटाच्या फस्ट लूकचे अनावरण करण्याच्या सोहळ्यात! ’ढोलकी’च्या वेळी सिध्दार्थ जाधव, तर अमिताभला स्टेजवर भेटताच एकदम भावूक झाला. त्याला ही भेट जणू स्वप्नवत वाटत होती. त्याने अमिताभला आपण लहानपणापासून त्याचे चित्रपट कसे मनापासून पाहिले आणि आज प्रत्यक्ष भेटताना कसे वाटतेय हे स्टेजवरच भरभरून सांगितले. सिद्धार्थ जाधवसाठी हा क्षण खूपच मोलाचा ठरला.
मिलिंद लेले दिग्दर्शित एबी आणि सीडी या मराठी चित्रपटात अमिताभने भूमिका साकारलीय. या चित्रपटात विक्रम गोखले, सुबोध भावे इत्यादी कलाकार आहेत. सुबोध भावेलाही अमिताभची भेट, त्याची कार्यशैली, निष्ठा, मेहनतीची तयारी हे सगळे प्रभावी करणारे. असे सुबोध भावेने अनेक मुलाखतीत म्हटले.
अमिताभ कधी चक्क मराठीत ट्वीट करतो आणि आपले महाराष्ट्राशी असलेले नाते अधोरेखित करतो… मुंबईचा तो पंचावन्न त्रेपन्न वर्षे रहिवासी आहे म्हटल्यावर मराठीशी त्याचे असे नाते जुळायलाच हवे.
त्याच्या वाढदिवसानिमित्त बरेच काही लिहिता/सांगता/बोलता/ऐकता येईल. त्यात त्याचा ’मराठी टच’ नक्कीच वेगळा ठरतोय.
अमिताभचे मुंबईतील बंगले (प्रतीक्षा, जनक, जलसा) यापासून अमिताभचे बंद पडलेले चित्रपट (जवळपास चाळीस… अबब म्हणावी अशीच ही संख्या… त्यातील शिनाख्त, रुद्र, राम की गीता श्याम की गीता, बंधुआ, रिश्ता, आलिशान अशा त्याच्या काही चित्रपटांचे मुहूर्त शूटिंग रिपोर्टिंगच्या निमित्ताने मी मीडियात असल्याने अनुभवलेत. त्याही छान आठवणी. त्या मी नेहमीच लिहितो.) अशा अगणित गोष्टींतून अमिताभ सामावलाय. संचारलाय. विस्तारलाय. त्यासाठी मोजमाप, फूटपट्टी, कम्प्युटर नाही.
अमिताभ बच्चनच्या एकूणच प्रवासाचा हा टीझर वा ट्रेलर. मेन पिक्चर सांगायलाच नको. अमिताभ बच्चन म्हणजे एका महामालिकेचा प्रवास. किती नि काय काय सांगावे याला शेवट (द एण्ड) नाही. अमिताभ बच्चन नावाची एक स्वतंत्र उपग्रह वाहिनी झालेच एक ओटीटी प्लॅटफॉर्म असायला
काय हरकत आहे? वाढदिवसानिमित्त आपण त्याला शुभेच्छा देताना ही सकारात्मक दृष्टिकोनातून
अपेक्षा ठेवू यात.
-दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …