खारघर : प्रतिनिधी
कर्करोगाच्या पेशींवर तत्काळ घाव घालण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या प्रोटॉन थेरपीला खारघरमधील टाटा रुग्णालय येथे लवकरच सुरुवात होणार आहे. या प्रोटॉन थेरपीच्या दुसर्या उपचार कक्षाची प्रोटोकॉल चाचणी शुक्रवारी (दि.21) रोजी यशस्वी झाली. लवकरच संबंधित कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असल्याने शेकडो रुग्णांना या अद्ययावत उपचार पद्धतीचा लाभ होणार आहे.
टाटा मेमोरियल सेंटर एक्ट्रेक्ट, आयबीए बेल्जीयम यांनी कक्षाची यशस्वी चाचणी केली. या वेळी एक्ट्रेक्टचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, डॉ. सिद्धार्थ लस्कर, आयबीए इंडियाचे संचालक राकेश पाठक उपस्थित होते. टीएमसीमार्फत सुरू करण्यात येणारी प्रोटॉन थेरपी देशातील सार्वजनिक भागीद्वारे सरू करण्यात आलेली ही पहिलीच अद्ययावत उपचार पद्धती आहे. एका वर्षात 800 रुग्णांना या ठिकाणी थेरपी देण्याचा मानस रुग्णालय प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
टाटा कॅन्सर रुग्णालयाने सुरू केलेल्या खारघर येथील केंद्रामध्ये हेड्रॉन बीम थेरपी (प्रोटॉन) यंत्र आणण्यात आले आहे. हे यंत्र केवळ शरीरामध्ये असलेल्या कॅन्सरच्या पेशींचा नाश करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
एआयबीएचे भारतातील संचालक राकेश पाठक यांच्या टीमच्या माध्यमातून प्रोटॉन थेरपीची यंत्रणा बसविण्याचे काम मागील काही काळापासून खारघर टाटा एक्ट्रेक्ट सेंटरमध्ये सुरू आहे.