Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

15,896 विद्यार्थ्यांनी घेतला होता सहभाग
लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोशिश फाऊंडेशन आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व आंतरशालेय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 15) सायंकाळी पनवेल शहरातील फडके नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या स्पर्धेत 16 विद्यालयातील 15 हजार 896 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातील बक्षीसपात्र विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी प्रमुख मान्यवर लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देत व त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत त्यांचे भरभरून कौतुक केले.
पारितोषिक वितरण कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, विविध शाळांचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी ’आज्जीबाई जोरात’ या पहिल्या एआय महाबालनाट्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे या वेळी विद्यार्थ्यांना मनोरंजनाचाही आनंद मिळाला.
वक्तृत्व स्पर्धेतून सार्वजनिक भाषणकला आत्मविश्वास वाढवते, नेतृत्वगुण विकसित करते आणि भविष्यातील संधींना दिशा देते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी मिळाली पाहिजे हाच उद्देश घेऊन कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी हा महत्त्वपूर्ण उपक्रम आयोजित केला. आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धेत तब्बल 15,896 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उदंड प्रतिसाद दिला होता. अत्यंत सुनियोजनातून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सर्वांत मोठे व्यासपीठ ठरला.
स्पर्धा इंट्रा क्लास राउंड, इंटर डिव्हिजन राउंड आणि महाअंतिम फेरी या तीन मुख्य टप्प्यांमध्ये पार पडली आणि त्यामधून विद्यार्थ्यांना आपली वक्तृत्व कला, आत्मविश्वास, विचारशक्ती आणि प्रभावी संवाद कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली. 15,896 स्पर्धकांमधून अंतिम 114 स्पर्धकांसाठी भव्य अंतिम फेरीत निवड झाली आणि यातून अंतिम 45 विजेत्यांना तसेच शाळा व परीक्षकांना शनिवारी झालेल्या भव्य सोहळ्यात गौरविण्यात आले.
या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष व पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, सुप्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर, माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, महापालिकेचे शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण, भाजपचे जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, स्पर्धा प्रमुख व मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, अक्षय सिंग, कोशिश फाऊंडेशनचे सचिव अ‍ॅड. चेतन जाधव, खजिनदार अभिजित जाधव, सदस्य सत्यवान नाईक, प्रीतम म्हात्रे, गणेश जगताप, स्पर्धा समन्वयक अयुफ अकुला आदी उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले. पाल्यामध्ये सभाधीटपणा येण्यासाठी पालकांचे प्रोत्साहन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पनवेल परिसराला मोठे भवितव्य आहे आणि युवा पिढी घडविण्यासाठी वक्तृत्व विकास महत्त्वाचा असतो. त्या अनुषंगाने या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला पंख देण्याचे काम होत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी सांगितले की, कोशिश फाऊंडेशन स्थापन करताना युवावर्गाचा व्यक्तिमत्व विकास तसेच समाजोपयोगी कार्य करणे व विविध उपक्रम राबविण्याचा दृष्टिकोन ठेवण्यात आला. त्या अनुषंगाने वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धा, ध्वनी प्रदूषणाचा विचार करून ’ये दिवाली शांतिवाली’, घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा यांसारख्या स्पर्धांचे आयोजन नियमितपणे करण्यात येत आहे. गायकांना व्यासपीठ मिळावे याकरिता पनवेल शहरातील प्रसिद्ध वडाळे तलाव या ठिकाणी सूर पनवेलचा कार्यक्रमांतर्गत मैफिल भरवली गेली असून विद्यार्थीवर्गाला शिक्षणाबरोबरच विविध कलागुणांचा विकास करता आला पाहिजे यासाठी यापुढेही असे विविध उपक्रम आणि प्रकल्प राबविले जातील, असेही परेश ठाकूर यांनी नमूद केले.
विद्यार्थी अभिव्यक्त झाला तर त्याच्या आयुष्याला दिशा मिळते. त्यामुळे शेवटच्या बाकावरील विद्यार्थीही बोलता झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला चालना मिळाली पाहिजे यासाठी कोशिश फाऊंडेशनचा हा उपक्रम महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण यांनी केले. या सोहळ्याचे प्रास्ताविक मयुरेश नेतकर, तर सूत्रसंचालन वैभव बुवा यांनी केले.

’आज्जीबाई जोरात’च्या प्रयोगातून शिक्षणासह मनोरंजनाची पर्वणी
’आज्जीबाई जोरात’ हे मराठी रंगभूमीवरील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरून साकारलेले महाबालनाट्य आहे. लेखक आणि दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांनी या नाटकाची संकल्पना साकारली. नाटकात सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत, अभिनय बेर्डे, पुष्कर श्रोत्री, मुग्धा गोडबोले आणि जयवंत वाडकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. नाटकात एक आज्जीबाई आपल्या नातवाला मोबाईल गेम्स आणि इंग्रजी माध्यमांच्या प्रभावापासून मराठी भाषेची गोडी लागावी म्हणून विविध नाना क्लुप्त्या करते. नाटकात अ‍ॅनिमेशन, नृत्य, गाणी आणि जादूचा समावेश करून मुलांना मराठी संस्कृतीची ओळख करून दिली गेली आहे. विशेषत्वाने नव्या तंत्रज्ञानाचा वापर केलेले हे नाटकाने विद्यार्थी आणि पालकांवर प्रकाश टाकणारे आहे. त्यामुळे नाटक प्रेक्षकांना आकर्षित करणारे आहे. त्या अनुषंगाने या नाटकाच्या आयोजनाबद्दल विद्यार्थी आणि विशेषतः पालकांनी कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांचे आभार मानले.

आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धेतील विजेते
इयत्ता दहावी गट (मराठी) ः प्रथम क्रमांक समृद्धी श्रीकांत मोरे, द्वितीय श्रेया अनिल सोलणे, तृतीय यथार्थ संदीप दुबे; इयत्ता नववी गट (मराठी) ः प्रथम सुकन्या रवीकरण पायघन, द्वितीय अनुष्का संतोष गिड्डे, तृतीय आदित्य नागेश तरडे; इयत्ता आठवी गट (मराठी) ः प्रथम वेदांत नितीन शिंदे, द्वितीय आर्या जनार्दन मोरे, तृतीय मानव मधू मंगल; इयत्ता सातवी गट (मराठी) ः प्रथम अधिराज विनोद गाडे, द्वितीय अमृता भारत ढोले, तृतीय गार्गी मिताली म्हात्रे.
इयत्ता दहावी गट (इंग्रजी) ः प्रथम क्रमांक श्रावणी रिकामे, द्वितीय श्रेया बुकटे, तृतीय कनिश म्हात्रे; इयत्ता नववी गट (इंग्रजी) ः प्रथम आर्या निलेश तेलगे, द्वितीय राशी विनोद गुप्ता, तृतीय अनित्य राजू संगीता; इयत्ता आठवी गट (इंग्रजी) ः प्रथम मान्यता अनुमोले, द्वितीय लावण्या सोनावणे, तृतीय दर्शन नरवडे; इयत्ता सातवी गट (इंग्रजी) ः प्रथम ऋतुजा आप्पासाहेब चव्हाण, द्वितीय निर्मयी संदीप फुलसुंदर, तृतीय हृदयांश निलेश अब्बीराव.
महापालिका शाळा इयत्ता पहिली गट ः प्रथम क्रमांक फातिमा इनामदार, द्वितीय सावली पाटील, तृतीय आर्यन ताज; इयत्ता दुसरी गट ः प्रथम खादीजा खान, द्वितीय साजिदा शेख, तृतीय कुसुम राजपुरोहित; इयत्ता तिसरी गट ः प्रथम मेघना, द्वितीय अनुष्का प्रजापती, तृतीय कालसा कोळी; इयत्ता चौथी गट ः प्रथम आनंद परमार, द्वितीय कीर्ती चक्वदिय, तृतीय सिद्रा सय्यद; इयत्ता पाचवी गट ः प्रथम आसावरी लाड, द्वितीय दुर्वा मांडवकर, तृतीय डॉली यादव; इयत्ता सहावी गट ः प्रथम महेंद्र कोळी, द्वितीय स्वरा भोईर, तृतीय पारस लुहा; इयत्ता सातवी गट ः प्रथम देवराज कालसगेरा, द्वितीय प्रियांशी पवार, तृतीय फलकिन्शा अन्सारी.

Check Also

प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

घरे नियमित करण्याबाबत सिडकोला निर्देश देण्याची आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी …

Leave a Reply